Pages

Friday, June 28, 2013

मराठवाडा विभागासाठी एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये या आठवडयात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २९.० ते ३४.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान १८.० ते २४.० अंश सेल्‍सीअस राहील. वारे ताशी १३.० ते १९.० कि.मी. प्रति तास वेगाने नैऋत्‍य दिशेने वाहतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७०.० ते ७९.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८.० ते ५६.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश ढगाळ राहून हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. तसेच उगवुन आलेल्‍या खरीप पिकांवर रसशोषक व पाने खाणा-या किडीचा प्रादूर्भाव वाढण्‍याची शक्‍यता आहे.

कृषि सल्‍ला

सोयाबीनची पेरणी या आठवडयातच पूर्ण करावी. पेरणीसाठी एमएयुएस-७१, जेएस-३३५, एमएयुएस-१५८ या पैकी एका वाणाची निवड करावी. बियाण्‍यास रायझोबीयम व पीएसबी जैविक खताची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी.

डाळिंबाची लागवड करावयाची असल्‍यास उत्‍तम निचरा होणा-या हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरूपाच्‍या जमीनीची निवड करावी. डाळिंबाची लागवड ६० x ६० x ६० सें.मी. आकाराच्‍या खडयात ५ x ५ मिटर अंतरावर करावी. लागवडी सोबत २१ किलो शेणखत व १ किलो सुपर फॉस्‍फॅटचा वापर करावा. लागवडी सोबत प्रति खडा ५० ग्रॅम लींडेन पावडरचा अथवा इतर बुरशीनाशकाचा वापर करावा.       

चिकु फळपिकाच्‍या नविन कलमांची लागवड १०x१० मी. अंतरावर करावी. यासाठी कालीपत्‍ती, पीलीपत्‍ती, किक्रेटबॉल, छत्री इत्‍यादी पैकीएका वाणाची निवड करावी. लागवडीसोबत १ किलो सिंगल सुपर फॉस्‍फेट प्रति झाड वापर करावा. तसेच फुटलेल्‍या कलमावरील कोवळया पाणावरील रषशोषक किडींचा बंदोबस्‍त करावा.

जनावरांच्‍या अंगावरील व गोठयातील नियंत्रणासाठी करंज तेल, नीमतेलाचा वापर करावा. जनावरांच्‍या शरीरावर हिवाळा किंवा इतर कुठल्‍याही ऋतूमध्‍ये घाग-या गोचिडांची लागण प्रमाणाबाहेर होत असते. अशा वेळेस वनस्‍पतिजन्‍य गोचिडनाशकांचा वापर करावा. जनावरांचा गोठा मेटारायीझम द्रावणानी फवारून घ्‍यावा.

सौजन्य
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजना
कृषि हवामानशास्‍त्र विभाग, म.कृ.वि., परभ्‍णी
पञक क्रमांकः २३                                      
दिनांकः २८.०६.२०१३