Pages

Monday, August 19, 2013

सोयाबीन पैदासकार डॉ के एस बेग वसंतराव नाईक कृषीशास्त्रज्ञ पुरस्कारानी सन्माननीत

   वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सोयाबीन पैदासकार डॉ के एस बेग यांना पुसद येथील वसंतराव नाईक स्‍मृती प्रतिष्‍ठानाचा वसंतराव नाईक कृषीशास्‍त्रज्ञ पुरस्‍काराने सन्‍माननीत करण्‍यात आले. डॉ. बेग हे गेल्‍या 15 वर्षापासुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कार्यरत असुन सध्‍या ते सोयाबीन पैदासकार म्‍हणुन काम करित आहेत. त्‍यांनी केलेल्‍या सोयाबीन पिकातील संशोधनाबाबतच्‍या उल्‍लेखनिय कार्यासाठी त्‍यांना या पुरस्‍काराने सन्‍माननीत करण्‍यात आले. 
     दि. 18 ऑगस्‍ट रोजी हरित क्रांतीचे प्रणेते मा कै वसंतराव नार्इक यांच्‍या 34 व्‍या स्‍मृतिदिनानिमित्‍त प्रतिष्‍ठानाच्‍यावतीने आयोजीत कार्यक्रमात त्‍यांना जलसंपदा मंत्री मा ना श्री सुनिल तटकरे यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्‍हणुन अन्‍न व औषधी प्रशासन मंत्री मा ना श्री मनोहरराव नाईक उपस्थित होते तर प्रतिष्‍ठानाचे अध्यक्ष कृषिभुषण श्री दिपक आसेगांवकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
     सन 2009 मध्‍ये विद्यापीठाने शिफारस केलेल्‍या सोयाबीनचे एमएयुएस-158 हे वाण विकसित करण्‍यात त्‍यांचा मोलाचा वाटा असुन हा वाण खोडमाशी, सुक्ष्‍मजंतुचे पुरळ यास सहनशील असुन 15 दिवसापर्यत शेंगा शाररिक पक्‍कतेनंतर फुटत नाहीत. तसेच सोयाबीनचे दुसरे वाण एमएयुएस-162 हे विकसित करण्‍यात त्‍यांचे योगदान असुन हा वाण 100 ते 103 दिवसात तयार होउन यंत्राव्‍दारे काढणीस वाण योग्‍य आहे. डॉ बेग हे सोयाबीन संदर्भात शेतक-यांना सतत मार्गदर्शन करतात. 
      या पुरस्‍कारानिमित्‍त त्‍यांचे विद्यापीठाचे मा कुलगूरू डॉ किशनराव गोरे, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी अभिनंदन केले.