Pages

Thursday, August 15, 2013

हिंगोली जिल्हातील गोळेगांव ता. औंढे नागनाथ येथील घटक कृषि महाविद्यालयात मा. कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गोळेगांव ता. औंढे नागनाथ जि. हिंगोली येथील  घटक कृषि महाविद्यालयात 67 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्‍यात आला. या प्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव श्री का वि पागिरे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ विलास पाटील, सहयोगी संचालक डॉ डि बी देवसरकर, नियत्रंक श्री ना ज सोनकांबळे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ ना ध पवार, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा विशाला पटणम, अन्‍नतंत्र महाविद्यालयाचे डॉ पा नि सत्‍वधर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ शि बा रोहीदास, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, औंढे नागनाथ येथील प्रतिष्टीत नागरिक व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
याप्रसंगी मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार क्षेत्रात सर्वाच्‍या सहकार्याने उल्‍लेखनिय कार्य केले आहे. राष्ट्रिय पातळीवर विद्यापीठाच्‍या कार्यामुळे नावजले जात आहे. आपण सर्वांच्‍या सहकार्याने विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रिय पातळीवर नेण्‍यासाठी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना उच्‍च कृषि शिक्षणाची संधी उपलब्‍ध म्‍हणुन गोळेगांव ये‍थील कृषि महाविद्यालय गेल्‍या शैक्षणिक वर्षात सुरू करण्‍यात आले आहे. महाराष्‍ट्र शासनाने नुकतेच या महाविद्यालयसाठी 28 शिक्षकवर्गीय व 37 शिक्षकेत्‍तर असे एकुण 65 पदांना मान्‍यता दिली आहे. महाविद्यालयाच्‍या पायाभुत विकासासाठी पुढील पाच वर्षासाठी 38 कोटी रूपये अनुदान मंजुर केले आहे. शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा व पावित्र्य कायम ठेवण्‍याची जबाबदारी विद्यार्थी, प्राध्‍यापक व विद्यापीठावर आहे, सर्व प्राध्‍यापकवृंदानी आव्‍हाणाना सामोरे जाण्‍यासाठी आपल्‍या विषयातील अद्यावत ज्ञान प्राप्‍त करावे व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन करावे असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.