Pages

Wednesday, February 26, 2014

आदिवासी विकास प्रकल्‍पांतर्गत मौजे टोव्‍हा शेतकरी मेळावा संपन्‍न

आदिवासी विकास प्रकल्‍पांतर्गत कळमनुरी तालुक्‍यातील मौजे टोव्‍हा (जि. हिंगोली) येथे विद्यापीठाने विकसित केलेल्‍या रब्‍बी ज्‍वार वाणाच्‍या प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्रास भेटी प्रसंगी ज्‍वार पैदासकार डॉ. एच. व्‍ही. काळपांडे, गावाच्‍या सरपंचा सौ. छायाताई शेळके, तालुका कृषि अधिकारी श्री. डी. बी. काळेज्‍वार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे व ज्‍येष्‍ठ नागरीक श्री. देविकांतराव पतंगे आदी
***************************************
कळमनुरी - वसंतराव नाईक मराठवाड कृषि विद्यापीठ, परभणी व हैद्राबाद येथील ज्‍वार संशोधन संचालनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आदिवासी विकास प्रकल्‍पांतर्गत कळमनुरी तालुक्‍यातील मौजे टोव्‍हा (जि. हिंगोली) येथे शेतकरी मेळावा व व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन दि. 25 फेब्रुवारी 2014 रोजी करण्‍यात आले होते. मेळाव्‍याचे अध्‍यक्षस्‍थानी गावाच्‍या सरपंचा सौ. छायाताई शेळके होत्‍या तर तालुका कृषि अधिकारी श्री. डी. बी. काळे, ज्‍वार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे व ज्‍येष्‍ठ नागरीक श्री. देविकांतराव पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यापीठाने विकसित केलेल्‍या ज्‍वार वाणाच्‍या प्रात्‍याक्षिक प्रक्षेत्रास शेतक-यांनी भेट दिली. या परिसरात रब्‍बी ज्‍वारीच्‍या कृषि विद्यापीठाने प्रसारीत केलेल्‍या सुधारीत वाणाची पहिल्‍यांदाच लागवड होत असल्‍याने पिकांवर मावा किड व चिकट्याचा प्रादुर्भाव दिसुन आला नाही हे विशेष. प्रात्‍यक्षिकातील रब्‍बी ज्‍वारीची पीक परिस्थिती पाहुन आजुबाजुच्‍या परिसरातील आलेले शेतकरी प्रभावीत झाले. यापुर्वी या दुर्गम आदिवासी भागात इतकी चांगली रब्‍बी ज्‍वारी कधी पाहिली नव्‍हती, अशी प्रतिक्रीया उपस्थित शेतक-यांनी व्‍यक्‍त केल्‍या.
मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना ज्‍वार पैदासकार डॉ. एच. व्‍ही. काळपांडे म्‍हणाले की, सुधारीत वाण व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्‍यास निश्चितच फायदा होतो, हे विद्यापीठाच्‍या प्रात्‍यक्षिकावरून लक्षात येते, तरी या भागातील शेतक-यांनी विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. ज्‍वार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांनी रब्‍बी ज्‍वार लागवडीच्‍या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली तर तालुका कृषि अधिकारी श्री. डी. बी. काळे म्‍हणाले की, आदिवासी भागातील शेतक-यांकडे उपलब्‍ध असलेली अपुरी साधनसामुग्री व तंत्रज्ञानाचा अभाव हया शेती समोरील मुख्‍य अडचणी असुन कृषि विभाग व कृषि विद्यापीठ या भागातील प्रगती करण्‍यासाठी कटिबध्‍द आहे. हे प्रात्‍यक्षिक बघुन निश्चितच या भागातील शेतकरी ज्‍वारी पिकाकडे वळतील, अशी प्रतिक्रीया गावाच्‍या सरपंचा सौ. छायाताई शेळके व श्री देविकांतराव पतंगे यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केल्‍या.  
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री अनिल मुंढे तर आभार प्रदर्शन श्री सातपुते बी. आर. यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी कृषि सहाय्यक श्री एन. बी. काळे, श्री एम. एन. पोटे, श्री जी. आय. कांबळे, श्री. टी. एन. हरन व श्री. आर. डी. जाधव आदींनी परिश्रम घेतले.
श्‍ेातकरी मेळाव्‍या मार्गदर्शन करतांना ज्‍वार पैदासकार डॉ. एच. व्‍ही. काळपांडे, व्‍यासपीठावर गावाच्‍या सरपंच सौ. छायाताई शेळके, तालुका कृषि अधिकारी श्री. डी. बी. काळे, ज्‍वार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे व ज्‍येष्‍ठ नागरीक श्री. देविकांतराव पतंगे आदी.
आदिवासी विकास प्रकल्‍पांतर्गत कळमनुरी तालुक्‍यातील मौजे टोव्‍हा (जि. हिंगोली) येथे विद्यापीठाने विकसित केलेल्‍या रब्‍बी ज्‍वार वाणाच्‍या प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्रास भेटी प्रसंगी ज्‍वार पैदासकार डॉ. एच. व्‍ही. काळपांडे, गावाच्‍या सरपंचा सौ. छायाताई शेळके, तालुका कृषि अधिकारी श्री. डी. बी. काळेज्‍वार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे व ज्‍येष्‍ठ नागरीक श्री. देविकांतराव पतंगे आदी.

Tuesday, February 25, 2014

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश अशतः ढगाळ राहुन तुरळक ठिकाणी दिनांक २७ व २८ फेब्रुवारी रोजी हलक्‍या स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २९.० ते ३३.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान १५.० ते २२.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी ५.० ते २९.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २८.० ते ५९.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १३.० ते २९.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात आकाश आकाश अशतः ढगाळ ढगाळ राहुन तुरळक ठिकाणी दिनांक २७ व २८ फेब्रुवारी रोजी हलक्‍या स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.  

शेतकरी बांधवांना कृषि सल्‍ला
v  मागील आठवडयातील अवकाळी वारा व पाउसामुळे गव्‍हाचे पिक कोळमले आहे अशा परिस्‍थीतत उंदरांचा प्रादुर्भाव अधिक वाढतो म्‍हणुन त्‍याच्‍या नियंत्रणासाठी बिळे शोधुन झिंक फॉस्‍फाईटच्‍या गोळया ठेवून बिळे बंद करावीत.
v  काढणीस तयार झालेल्‍या हरभरा पिकाची कापनी करावी. कापणी केलेले हरभरा पीक जागेवर वाळु द्यावे.  वा-याने शेतावर उडून जाउ नये म्‍हणुन कडप्‍यावर वजन ठेवावे.
v  सुरू उसाच्‍या पिकात कोळपणी करावी व तणाचा बंदोबस्‍त करावा. सहा आठवडे झालेल्‍या पिकास नत्राची ४० टक्‍के मात्रा देउन पाणी द्यावे.
v  डाळींबावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. त्‍याच्‍या नियंत्रणासाठी ३० ग्रॅम सल्‍फर + फॉस्‍फोमीडॉम २० मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. तसेच पानातील रस शोषण करणा-या किडीच्‍या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस १५ मिली १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
v  फळाच्‍या वाढीसाठी मिकनेल- ३२ या सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍याची २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. पुर्ण वाढलेल्‍या बागेस नत्राचा दुसरा हप्‍ता ५०० ग्रॅम युरीया प्र‍ती झाड देवुन पाणी द्यावे.
v  फळाची वाढीसाठी मिकनेएल ३२ या सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍याची फवारणी करावी. बागेस नियमीत पाणी द्यावे.
v  उन्‍हाळी भेंडी, गवार, चवळी, दोडका, कारली, दिलपसंत इत्‍यादी भाजीपाल्‍याची लागवड करावी.
v  कोंबडयाच्‍या (मांसळ व अंडी देणा-या) शेडमध्‍ये (पक्षीघर) तापमान रात्री ८.०० नंतर ३०  ते ३२ अंश सेल्सिअस ठेवावे. ज्‍या पशुधनास तोंडखुरी पायखुरीचे लसीकरण केले नाही त्‍यांना लसीकरण करून घ्‍यावे.

सदर कृषि सल्‍ला पत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामिण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीच्‍या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्‍यात आला. 
सौजन्‍य
केंद्र प्रमुख
ग्रामिण कृषि मौसम सेवा
कृषि हवामानशास्‍त्र विभाग
पञक क्रमांकः ८१/२०१४ दिनांक  २५/०२/२०१४ 

रब्बी ज्वारीवरील मावाचा प्रादुर्भाव

सध्‍या प्रतिकूल हवामानामुळे रब्‍बी ज्‍वारीवर मावा कीडाचा मोठा प्रादुर्भाव दिसुन येत असुन या किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने वेळोवेळी सांगीतलेल्‍या उपाययोजना शेतकरी बांधवानी कराव्‍यात.
मावा ही रब्‍बी ज्‍वारीवरील महत्‍वाची कीड असुन डिसेंबर-जानेवारी महिन्‍यात माव्‍याचा प्रादुर्भाव जास्‍त शक्‍यता असते. प्रादुर्भाव सर्व प्रथम सर्वात खालच्‍या पानावर आढळून येतो व वातावरण पोषक असल्‍यास दोन ते तीन आठवडयात संपुर्ण झाडांच्‍या पानावर वाढत जातो. पिकाच्‍या दाणे भरणीच्‍या अवस्‍थेत प्रादुर्भाव आढळल्‍यास उत्‍पादनात जास्‍त फरक पडत नाही. परंतु पीक जर निसवणीच्‍या किंवा त्‍या पुर्वीच्‍या अवस्‍थेत असेल तर धान्‍य व  कडबा उत्‍पादनात 20 ते 25 टक्‍यांपर्यंत घट आढळुन येते. माव्‍याचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात असल्‍यास पाने तांबडी पडुन करपा झाल्‍याप्रमाणे वाळुन जातात, पर्यायाने झाडाची वाढ खुंटते. ज्‍वारी पोटरी अवस्‍थेत असल्‍यास कणसे बाहेर पडत नाहीत अथवा काही कणसे अर्धवट बाहेर पडतात व अशा कणसात दाणे भरण्‍याचे प्रमाण अत्‍यंत कमी असते.
सध्‍या मावा चिकटा रोगाची प्रचंड प्रादुर्भाव दिसुन येत असुन ज्‍वारी काळवंडल्‍याची कारणे पुढील प्रमाणे आहेत.
1.   उशीरा झालेली पेरणी - रब्‍बी ज्‍वारीच्‍या पेरणीची योग्‍य वेळ ऑक्‍टोंबरच्‍या पहिल्‍या पंधरवाड्यात असते. परंतु यावर्षी लांबलेल्‍या पावसामुळे रब्‍बी ज्‍वारीच्‍या पेरण्‍या नोंव्‍हेंबर महिन्‍याच्‍या शेवटपर्यंत सुरु होत्‍या.
2.   ज्‍वारीच्‍या वाढीच्‍या अवस्‍थेत माव्‍याचा झालेला प्रादुर्भाव - माव्‍याचा प्रादुर्भाव साधारणपणे जानेवारीच्‍या दुस-या पंधरवाड्यात जास्‍त प्रमाणात आढळतो. या काळात ज्‍वारीचे पीक हे प्रामुख्‍याने दाणे पक्‍व होण्‍याच्‍या अवस्‍थेत असते. अशा अवस्‍थेतील पिकाचे किडीमुळे जास्‍त नुकसान होत नाही. परंतु या वर्षी ज्‍वारीची पेरणी ही ऑक्‍टोंबरच्‍या दुस-या पंधरवाडयात किंवा त्‍यानंतर झाल्‍या कारणाने ज्‍वारीचे पीक हे सध्‍या फुलो-यात किंवा दाणे भरण्‍याच्‍या अवस्‍थेत आहे. अशा अवस्‍थेतील पिकाचे माव्‍यामुळे जास्‍त नुकसान होते.
3.    माव्‍याच्‍या वाढीसाठी पोषक हवामान या वर्षी फेब्रुवारी महिन्‍यातील किमान तापमान 14 अंश सेल्‍सीअसच्‍या खाली असुन अशी परिस्थिती माव्‍याच्‍या वाढीसाठी पोषक असते. त्‍याचबरोबर ज्‍वारीच्‍या पेरणीचा कालावधी वाढत गेल्‍याने माव्‍याला ज्‍वारीवर प्रादुर्भाव करण्‍यासाठी जास्‍त वेळ मिळाला. तसेच रब्‍बी ज्‍वारीच्‍या शिवारामध्‍ये ओलीताखालील असलेल्‍या गहु, ऊस ई. पिकांमुळे हवामानातील आद्रता वाढते. त्‍यामुळे सुध्‍दा माव्‍याचा प्रादुर्भाव वाढण्‍यास मदत होते.
4.   ऊस पिकाची काढणी - ऊस हे रब्‍बी ज्‍वारीवरील माव्‍याचे सुध्‍दा प्रमुख भक्ष पीक आहे. सध्‍या ऊसाची काढणी होत असल्‍याने तसेच सध्‍या उशिराने पेरलेली ज्‍वारी ही वाढीच्‍या विविध अवस्‍थेत असल्‍याने हिरवी असल्‍याने पर्यायी भक्ष पीक म्‍हणुन ज्‍वारीवर माव्‍याचा प्रादुर्भाव वाढला आहे.

पिकाची वेळोवेळी पाहणीच्‍या आधारे या किडीचे योग्‍य वेळी नियंत्रण करुन संभावित नुकसान टाळता येते. भविष्‍यात मावा किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्‍यासाठी विद्यापीठाने वेळोवेळी सांगीतलेल्‍या पुढील उपाययोजना कराव्‍यात.
· उशिराने पेरणी झालेल्‍या ज्‍वारीवर माव्‍याचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात आढळुन येतो. त्‍यामुळे रब्‍बी ज्‍वारीची योग्‍य वेळी ऑक्‍टोंबरच्‍या पहिल्‍या पंधरवाडयात पेरणी करावी.
·   माव्‍यास प्रतिकारक्षम वाणांचा वापर करावा. उदा. एसपीव्‍ही-1595, परभणी ज्‍योती.
· थंडीचे प्रमाण वाढु लागताच पिकाची वेळोवेळी पाहणी करावी. पाहणी करतांना ज्‍वारीच्‍या खालील पानांच्‍या मागील बाजुचे निरीक्षण करावे व माव्‍याचा प्रादुर्भाव आढळून येताच 400 मिली मिथील डेमॅटॉन 25 टक्‍के प्रवाही किंवा 500 मिली डायमेथोएट 30 टक्‍के प्रवाही किंवा 150 ग्रॅम थायामेथेक्‍झाम 25 टक्‍के दाणेदार किंवा 140 मिली इमीडॅक्‍लोप्रिड 17.8 टक्‍के प्रवाही यापैकी एका किटकनाशकाची प्रति हेक्‍टरी मात्रे नुसार 500 लि. पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.
·   तसेच ज्‍वारीच्‍या पानावरील काळ्या बुरशीच्‍या नियंत्रणासाठी कार्बेडेन्‍झीम या बुरशीनाशकाची 10 ग्रॅम / 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

सौजन्‍य
डॉ. एच. व्‍ही. काळपांडे, प्रा. आर. डब्‍ल्‍यु. देशमुख, श्री पी. पी. आंबिलवादे
श्री आर.एल.औढेंकर
ज्‍वार संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी .
फोन क्रं. 02452 221148 



Monday, February 24, 2014

कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांतर्फे रेशीम कोषाचे यशस्वी पीक काढणी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या आठव्‍या सत्रातील अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमाच्‍या सत्‍तावीस विद्यार्थ्‍यांनी दि 20 फेब्रुवारी रोजी रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे यांच्‍या मार्गदर्शनाखाली दुबार रेशीम कोषाचे यशस्‍वी पीक काढणी केली. यावेळी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी भोसले उपस्थित होते. विद्यार्थ्‍यांनी यात दुबार रेशीम किटक संकर वाणाच्‍या अंडीपुजाची उबवण, ब्‍लॅक बॉक्‍सींग, हॅचिंग, ब्रशिंग आदी बाबी पुर्ण केल्‍या. याप्रसंगी डॉ बी. बी भोसले म्‍हणाले की, रेशीम उद्योग हा इतर पिकांच्‍या तुलनेत दर माह वर्षभर पगारासारखा पैसा देणारा उद्योग असुन अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांनी रेशीम उद्योगाचे संपुर्ण कौशल्‍य प्राप्‍त करून भविष्‍यात या क्षेत्रात उद्योजक व्‍हावे. रेशीम उद्योग हमखास चांगले उत्‍पादन देणारा शेतक-यांसमोरील पर्यायी उद्योग असल्‍याचे सहभागी विद्यार्थ्‍यानी मत व्‍यक्‍त केले. या अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमाच्‍या आठव्‍या सत्रातील विद्यार्थी एन. डी.मोरे, विपुल कुमार, व्‍ही.पी.देशमुख, ऐ.यु.ढवळे, एस.के.जोगु, एस.बी. कळंबे, एस.ऐ.कादरी, प्रिती माला, रशमीकुमारी, एस.व्‍ही.ऊफाडे, एस.एस.गोरे, जी.पी.मुके, पी.के.धनवे, एस.एम.शिंदे, व्हि. एम.शिराळे, ए.एम.कुलकर्णी, एस.ए.शेख, डी.एम.हुडेकर, एम.आर.मस्‍के आदीचा समावेश होता.

हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय संस्था इक्रीसॅटच्या शास्त्रज्ञांची रब्बी ज्वारी प्रक्षेत्रास भेट

होप प्रकल्‍पांर्तगत मानवत तालुक्‍यातील मानोली येथे शेतक-यांच्‍या शेतावरील रब्‍बी ज्‍वारी प्रात्‍यक्षिकांची पाहणी करतांना हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था इक्रीसॅटचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. ए. अशोककुमार, डॉ. रविंद्र रेड्डी, डॉ. संतोष देशपांडे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्रकल्‍पाचे सल्‍लागार डॉ. सुभाष बोरीकर, डॉ. एच. व्‍ही. काळपांडे, प्रगतिशील शेतकरी श्री. मदन शिंंदे आदी
************************************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था इक्रीसॅट यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राबविण्‍यात येणा-या होप प्रकल्‍पांर्तगत मानवत तालुक्‍यातील मानोली येथे विद्यापीठाने विकसीत केलेल्‍या रब्‍बी ज्‍वारीच्‍या विविध वाणांच्‍या शेतक-यांच्‍या शेतावरील प्रात्‍यक्षिकांची पाहणी दि. 23 फेब्रवारी रोजी हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था इक्रीसॅटचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. ए. अशोककुमार, डॉ. रविंद्र रेड्डी, डॉ. संतोष देशपांडे तसेच विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्रकल्‍पाचे सल्‍लागार डॉ. सुभाष बोरीकर यांनी केली. तसेच महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळाच्‍या (महाबिज) सहकार्याने सिआरपी प्रकल्‍पांर्तगत परभणी जिल्‍हयात घेण्‍यात आलेल्‍या 250 एकर शेतक-यांच्‍या शेतावरील रव्‍बी ज्‍वारी बीजोत्‍पादन कार्यक्रमाची सनपुरी येथील प्रक्षेत्राची देखील शास्‍त्रज्ञांनी पाहणी केली.
भेटी दरम्‍यान प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. ए. अशोककुमार म्‍हणाले की, ज्‍वारी काढणीसाठी शेतक-यांना भेडसवणारा मजुरांच्‍या अभावाची समस्‍यावर संशोधन चालु असुन लवकरच इ‍ॅक्रीसॅट होप प्रकल्‍पांर्तगत ज्‍वारी काढणी यंत्र शेतक-यांना उपलब्‍ध देण्‍याचे प्रयत्‍न सुरू आहेत. तसेच संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी रब्‍बी ज्‍वारीच्‍या काढणी पश्‍चात प्रक्रियेची आवश्‍यकता असल्‍याचे मत प्रतिपादीत केली. मानोली परिसरातील शेतक-यांना होप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन भरघोस उत्‍पादन देणारे रब्‍बी ज्‍वारीचे वाण व लागवड तंत्रज्ञान उपलब्‍ध होऊ शकले, अशी प्रतिक्रीया प्रगतिशील शेतकरी श्री. मदन महाराज शिंदे यांनी व्‍यक्‍त केली.
होप प्रकल्‍पांर्तगत परभणी, बीड व जालना जिल्‍हयातील 4000 एकरवर शेतक-यांना प्रती एकरी सुधारीत वाणांचे बियाणे देण्‍यात येऊन वेळोवेळी पुर्वमशागत, बीजप्रक्रीया, पीक व्‍यवस्‍थापन, पिकांची काढणी व विक्रीपर्यंतच्‍या तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण देण्‍यात आले. यावेळी मोनाली येथील प्रकल्‍पाच्‍या लाभार्थी शेतक-यांनी यंदा भरघोस उत्‍पादन मिळण्‍याची आशा व्‍यक्‍त केली आहे.  
मानोली येथील शेतक-यांनी यशस्‍वीरित्‍या प्रात्‍यक्षिक राबविलेल्‍या बद्दल शास्‍त्रज्ञांनी समाधान व्‍यक्‍त केले. तसेच परभणी येथील ज्‍वार संशोधन केंद्राच्‍या वतीने शेतक-यांच्‍या शेतावरील रब्‍बी ज्‍वारीची उत्‍पादकता व सुधारीत वाणांच्‍या बियाण्‍याची उपलब्‍धता वाढविण्‍यासाठी करण्‍यात येणा-या प्रयत्‍नाबाबत व केंद्रात सुरू असलेल्‍या संशोधनाबाबत शास्‍त्रज्ञांच्‍या चमुने समाधान व्‍यक्‍त केले.
प्रक्षेत्र भेटीच्‍या यशस्‍वीतेसाठी ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एच. व्‍ही. काळपांडे, कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, प्रा. आर. डब्‍ल्‍यु. देशमुख, प्रा. अंबिका मोरे, श्री. नलावडे, श्री. सोरेकर, श्री. औढेंकर, श्री. मुंढे, श्री. अबु बकर, श्री शिंदे, श्री. जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Friday, February 21, 2014

जिरायती भागात सघन कापूस लागवडीसाठी एनएच-615 या वाणाचे क्षेत्र वाढविणे गरजेचे.......कुलगुरू मा डॉ बी. व्यंकटेश्वरलु

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या धनेगाव प्रक्षेत्रावरील प्रात्‍याक्षिकांची पाहणी करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, हैद्राबाद येथील प्रकल्‍प संचालक डॉ यु. एम. व्‍ही. रावकापुस विशेषज्ञ डॉ के. एस. बेग आदी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या धनेगाव प्रक्षेत्रावर अखिल भारतीय समन्‍वयीत कापुस सुधार प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन आदिवासी उपयोजनांतर्गत शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू, व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर डॉ यु. एम. व्‍ही. रावडॉ के एस बेग आदी
**********************************
नांदेड - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या धनेगाव प्रक्षेत्रावर अखिल भारतीय समन्‍वयीत कापुस सुधार प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन आदिवासी उपयोजनांतर्गत शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दि 20 फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते. मेळाव्‍याचे उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, हैद्राबाद येथील अखिल भारतीय कृषि हवामानशास्‍त्र योजनेचे प्रकल्‍प संचालक डॉ यु. एम. व्‍ही. राव यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रकल्‍पांतर्गत विद्यापीठातर्फे किनवड व माहुर तालुक्‍यातील 105 शेतक-यांच्‍या शेतावर एनएच-615 हा वाण लागवडीसाठी देण्‍यात आला होता. 
      मेळाव्‍या प्रसंगी कुलगूरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आदिवासी भागातील शेतक-यांना कपाशीचे अधिक उत्‍पादनाचे तंत्रज्ञानाचा विस्‍तार करणे गरज असुन जिरायती भागात सघन कापुस लागवडीसाठी एनएच-615 या वाणाच्‍या क्षेत्रात वाढ करावी लागेल, यासाठी विद्यापीठ व कृषि विभाग यांच्‍या सहकार्याने येत्‍या हंगामात प्रयत्‍न करावेत. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी आपल्‍या भाषणात येत्‍या हंगामात कपाशीच्‍या बीजोत्‍पादन कार्यक्रम कृषि विभागाच्‍या सहकार्याने विद्यापीठाने राबविण्‍याचे सुचविले.
तालूका कृषि अधिकारी श्री विजय चन्‍ना व (कुपटी) माहुर येथील प्रगतीशील शेतकरी श्री रामचंद्र डुकरे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कापुस विशेषज्ञ डॉ के. एस. बेग यांनी तर सुत्रसंचालन डॉ पी आर झंवर यांनी केले. प्रा ए डी पांडागळे यांनी उपस्थित शेतक-यांना कपाशी लागवडीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपविभागीय कृषि अधिकारी डॉ विजयकुमार भरगंडे, श्री पी एस मोरे, कृषि उपसंचालक श्री लाडके तसेच जिल्‍हयातील कृषि अधिकारी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. माहुर तालुक्‍यातील आदिवासी शेतक-यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते नांगर, सायकल कोळपे, खत कोळपे आदी औचारांचे वाटप करण्‍यात आले. तत्‍पुर्वी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व मान्‍यवरांनी प्रक्षेत्रावरील विविध कापुस प्रयोगांना भेट देऊन आढावा घेतला.
काय आहे सघन कापुस लागवड तंत्रज्ञान ?
राज्‍यातील कपाशीची लागवड मुख्‍यत: जिरायती असुन कापुस पिकाला बोंडे धरणे व पक्‍व होणे हा काळ साधारणता ऑक्‍टोबरमध्‍ये सुरू होतो. अशा वेळी पाऊस कमी झालास जमिनीतील ओल कमी पडुन हलक्‍या ते मध्‍यम प्रतीच्‍या जमिनीवर उत्‍पादन फार मोठी घट होते. अशा परिस्थितीत सघन कापुस लागवड पध्‍दतीमुळे आशा पल्‍ल्‍वीत झाल्‍या आहेत, असे मत डॉ के एस बेग व डॉ अरविंद पांडागळे यांनी व्‍यक्‍त केले. या तंत्राज्ञानाचे प्रात्‍यक्षिक नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या धनेगांव प्रक्षेत्रावर घेण्‍यात आले असुन यात सरासरी 60 बाय 10 सें.मी. अंतरावर कपाशीच्‍या सरळवाणांची लागवड करून हेक्‍टरी झाडांची संख्‍या वाढविण्‍यात येऊन हेक्‍टरी 1 ते 2 लाख झाडे ठेवण्‍यात येते. हलक्‍या जमीनीवर बीटी कपाशी ऐवढेच उत्‍पादन मिळत असल्‍याचे आढळुन येत आहे. लागवडीसाठी नागपुर येथुन केंद्रीय कापुस संशोधन संस्‍थेने एनएच 615, पीकेव्‍ही 081 व सुरज या वाणांची निवड केली असुन एनएच 615 हा वाण नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राव्‍दारे प्रसारीत करण्‍यात आला आहे. यापध्‍दतीत शिफारस करण्‍यात आलेले वाण बिगर बीटी असल्‍याने बोंड अळयांचे नियंत्रण करणे आवश्‍यक आहे.

बी टी कपाशीच्‍या तुलनेत सघन लागवड पध्‍दतीचे फायदे
सघन लागवडीसाठी हलक्‍या ते मध्‍यम प्रतीच्‍या जमिनीवर कपाशीची लागवड करता येऊन कापसाच्‍या सरळ वाणांचा वापर केल्‍यामुळे बियाणे खर्चात कपात होते. तसेच बियाण्‍यांची किंमत कमी असल्‍यामुळे धुळ पेरणी करणे शक्‍य आहे. निवडण्‍यात आलेल्‍या सरळ वाण रसशोषण करणा-या किडींना कमी बळी पडणा-या असुन रसशोषक किडीच्‍या नियंत्रण खर्चात बचत होते. मात्र, बीटी तंत्रज्ञानाने युक्‍त नसल्‍याने बोंडअळया नियंत्रणासाठी उपाय करणे गरजेचे असते. या तंत्रज्ञानाने कपाशीच्‍या उत्‍पादनात स्‍थैर्य येऊन बीटी कपाशीच्‍या तुलनेत समतुल्‍य निव्‍वळ नफा मिळु शकते, असे डॉ के एस बेग व प्रा. अरविंद पांडागळे यांनी सांगितले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या धनेगाव प्रक्षेत्रावर अखिल भारतीय समन्‍वयीत कापुस सुधार प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन आदिवासी उपयोजनांतर्गत औचारांचे वाटप करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरडॉ यु. एम. व्‍ही. रावडॉ के एस बेग आदी.

Wednesday, February 19, 2014

शिवजयंती उत्‍साहात साजरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांच्‍या विद्यार्थी कल्‍याण कार्यालयाच्‍या वतीने छत्रपती शिवाजी महा‍राज यांच्‍या 384 व्‍या जयंतीनिमित्‍त दि. 19 फेब्रवारी रोजी मिरवणुक काढण्‍यात आली होती. मिरवणुकीचा प्रारंभ शिवाजी महा‍राजांच्‍या प्रतीमेचे पुजन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या हस्‍ते करून करण्‍यात आला. याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा. विशाला पटनम, कृषि अभियांत्रीकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ.उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 


Tuesday, February 18, 2014

छत्रपतींनी शेतक-यांच्‍या हिताला व शेतीला प्राधान्‍य दिले... सुप्रसिध्‍द युवा व्‍यक्‍ते श्री बालाजी गाडे

वसंतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठात आयोजीत शिव जयंती निमित्‍त मार्गदर्शन करतांना पुणे येथील युवा व्‍यक्‍ते श्री बालाजी गाडे, व्‍यासपीठावर डॉ बी बी भोसले, प्रा विशाला पटणम, डॉ उदय खोडके, डॉ बी एम ठोंबरे, प्रा गुलभिले आदी
******************************************************************
कृषि क्षेत्राशी व शेतक-यांशी शिवाजी महाराजांचे आपुलकीचे संबंध होते, त्‍या काळात त्‍यांनी शेतक-यांच्‍या हिताला व शेतीला प्राधान्‍य दिले, असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिध्‍द तडफदार युवा व्‍यक्‍ते श्री बालाजी गाडे यांनी केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांच्‍या विद्यार्थी कल्‍याण कार्यालयाच्‍या वतीने दि. 18.02.2014 रोजी आयोजित 384 वी शिवजयंती निमित्‍त व्‍याख्‍याना प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले हे होते तर व्‍यासपीठावर गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा. विशाला पटनम, कृषि अभियांत्रीकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ.उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, प्रा गुळभीळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    श्री बालाजी गाडे पुढे म्‍हणाले की, शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्षता जपुन 7642 जातींना एकत्रीत आणण्‍याचे कार्य केले तसेच तरूणांच्‍या व्‍यसनमुक्‍तीसाठी ही कार्य केले.  
    शिवाजी महाराजांचे विचार मुर्तीपुजनाने सार्थ होणार नसुन युवकांनी त्‍यांचे विचार आचरणात आणुन व्‍यक्‍ती विकास घडवुन आणावा, असा सल्‍ला अध्‍यक्षीय भाषणात डॉ. बी. बी. भोसले यांनी दिला.
    कार्यक्रमाची सुरुवात सरस्‍वती व शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे पुजन करुन झाली. कार्यक्रमाची प्रास्‍ताविक दिनेश भोसले यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश टाले यांनी केले. आभार प्रदर्शन नितीन धाटबळे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा गुळभिळे, प्रा चव्‍हाण यांच्‍या मार्गदर्शनाखाली गणेश कंटुले, रवि पुरी, अविनाश दहातोंडे, महादेव काटे, देशमुख आदी विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले
वसंतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठात आयोजीत शिव जयंती निमित्‍त आयोजीत व्‍याख्‍यानाच्‍या प्रारंभी शिवाजी महाराजांच्‍या प्रतीमेचे पुजन  करतांना पुणे येथील युवा व्‍यक्‍ते बालाजी गाडे,  डॉ बी बी भोसले, प्रा विशाला पटणम, डॉ उदय खोडके, डॉ बी एम ठोंबरे, प्रा गुलभिले आदी

शासकीय योजनात गृहविज्ञानाच्‍या पदवीधरांना प्राधान्‍य दिल्‍यास कार्य अधिक प्रभावी होईल ............कुलगूरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या माजी विद्यार्थ्‍यांचा स्‍नेहमिलन सोहळा उत्‍साहात संपन्‍न
गृहविज्ञान महा‍विद्यालयातर्फे आयोजित माजी विद्यार्थ्‍यांचा स्‍नेह‍मिलन सोहळाचे उदघाटन व्‍ि‍दपप्रज्‍वलणकरून करतांना विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ अशोक ढवण, डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्रा विशाला पटणम, डॉ बी बी भोसले, डॉ एस बी रोहीदास, डॉ हेमांगिनी सरंबेकर आदी   
************************************************************
महिला व बाल विकासाशी संबंधील शासकीय अनेक योजना असुन यात गृहविज्ञानाचा पदवीधरांना प्राधान्‍य दिल्‍यास हे कार्य अधिक प्रभावी होईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. ते गृहविज्ञान महा‍विद्यालयातर्फे दि 15 फेब्रुवारी रोजी आयोजित माजी विद्यार्थ्‍यांचा स्‍नेह‍मिलन सोहळाच्‍या उदघाटनाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा विशाला पटणम, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ बी बी भोसले, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रभारी डॉ एस बी रोहीदास यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, आज अन्‍न व पोषण या विषयाचे मानवाच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने महत्‍व प्राप्‍त झाले असुन या क्षेत्रात अनेक संधी गृहविज्ञान विषयातील पदवीधरांना आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी अनेक क्षेत्रात यशस्‍वी भरारी घेत असुन गृहविज्ञान विषयाची व्‍याप्‍ती लक्षात घेऊन विद्यार्थ्‍यांसाठी व्‍यावसायिक संधींची विविध क्षेत्रे खुली करण्‍याकरीता विद्यापीठ सदैव प्रयत्‍नशील राहील, असे आश्‍वासन ही त्‍यांनी दिले.
गृह विज्ञान महाविद्यालय समाज घडविण्‍याचे कार्य करीत असुन विशेषत: महिलांचे दु:ख कमी करण्‍यासाठी येथे संशोधनावर आधारीत तंत्रज्ञान विकसित केले जाते, असे मत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी महाविद्यालयातर्फे सध्‍या राबविण्‍यात येते असलेल्‍या गृह विज्ञान आपल्‍या दारी, कुटुंबाचे कल्‍याण करी या अभिनव अभियानाची आपल्‍या मनोगतात प्रशंसा केली.
प्रास्‍ताविकात गृ‍ह विज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा विशाला पटनम यांनी विद्यार्थ्‍यानी समाज घडविण्‍यासाठी स्‍वत: च्‍या पुर्णपणे उपयोग करण्‍याचे आवाहन आपल्‍या भाषणात केले, तर महाविद्यालयाच्‍या उन्‍नतीसाठी स्‍थापनेपासुन विद्यापिठातील वरिष्‍ठ अधिका-यांनी केलेल्‍या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल त्‍यांनी कृ‍तज्ञता व्‍यक्‍त केली.
स्‍नेहमिलन सोहळात सन 1976 पासुनचे माजी विद्यार्थी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते. यात माजी विद्यार्थ्‍यांचा परिचय मेळावा, मान्‍यवरांचे मार्गदर्शन, आजी माजी विद्यार्थ्‍याचा विविधरंगी सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे भरगच्‍च आयोजन करण्‍यात आले होते. अनेक वर्षानंतर मित्र-मैत्रिणीच्‍या व गुरूवर्यांच्‍या भेटीचा योग आल्‍याने त्‍यांच्‍या आनंदास उधाण दिसुन येत होते. महाविद्यालयाची प्रगती व भरभराट पाहुन अभिमान वाटत असल्‍याची भावना माजी विद्यार्थ्‍यानी आपल्‍या मनोगतात व्‍यक्‍त केल्‍या. तसेच गृह विज्ञानामुळे आमच्‍या ज्ञानाच्‍या कक्षा रूंदावल्‍या जावुन आनंदी व यशस्‍वी दैनंदिन जीवनात या विषयाचा मोलाचा वाटा असल्‍याची कबुलीही त्‍यांनी दिली. यानिमित्‍ताने महाविद्यालयाच्‍या ब्‍लॉगचेही उदघाटन करण्‍यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ माधुरी कुलकर्णी, डॉ जया बंगाळे, डॉ जयश्री झेंड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ हेमांगिनी सरंबेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वतीतेसाठी महा‍विद्यालयातील प्राध्‍यपक वर्ग, कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.
गृहविज्ञान महा‍विद्यालयातर्फे आयोजित माजी विद्यार्थ्‍यांचा स्‍नेह‍मिलन सोहळाचे उदघाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर डॉ अशोक ढवण, डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्रा विशाला पटणम, डॉ बी बी भोसले, डॉ एस बी रोहीदास आदी   

Monday, February 17, 2014

उस्‍मानाबाद तालुक्‍यातील पाडळी येथे दुध प्रक्रिया प्रशिक्षण संपन्‍न

प्रशिक्षणार्थीनां मार्गदर्शन करतांना भुम येथील प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब पाटील, व्‍यासपीठावर कार्यक्रम समन्‍वयक डॉ व्‍ही जी टाकणखार, संशोधन उपसंचालक डॉ गजेंद्र लोंढे, डॉ खंदारे, श्री पुरी आदी 
**************************************************
तुळजापुर - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्र व आत्‍मा, उस्‍मानाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने महाराष्‍ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्‍पातंर्गत दि 2 ते 8 फेब्रुवारी दरम्‍यान दुध प्रक्रिया उद्योग यावर सात दिवशीय प्रशिक्षण उस्‍मानाबाद तालुक्‍यातील पाडळी येथे संपन्‍न झाले, दुध प्रक्रिया उद्योगास चालना मिळण्‍यासाठी हे राबविण्‍यात आले. प्रशिक्षणाचे उदघाटन भुम येथील प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यात 30 दुध उदत्‍पादक शेतकरांनी सहभाग घेतला. यात संशोधन उपसंचालक डॉ गजेंद्र लोंढे, डॉ ए टी शिंदे व श्री गिते या तज्ञांनी दुध प्रक्रिया पदार्थाचे आहारातील महत्‍व, दुध प्रक्रियेचे फायदे, दुधापासुन विविध पदार्थ बनविण्‍याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. या दरम्‍यान यश‍स्‍वी विविध दुध संकलन संस्‍था व दुध प्रक्रिया उद्योगास भेटी देण्‍यात आल्‍या. या प्रशिक्षणाचे फलित म्‍हणजे पाडळी सहभागी दुध उत्‍पादकांनी लोकमंगल या नावाने दुध उत्‍पादक गट स्‍थापन करून साधारणता 250 लिटर दुध संकलनास प्रारंभ केला. प्रशिक्षणाचा समारोप दि 8 फेब्रुवारी 2014 रोजी झाला. कार्यक्रम यशसवीतेसाठी तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयक डॉ व्‍ही जी टाकणखार व उस्‍मानाबाद येथील आत्‍माचे संचालक श्री लोखंडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पशु संवर्धन व दुग्‍धशास्‍त्राच्‍या विषय विशेष तज्ञा डॉ अनिता जिंतुरकर, प्रा सौ मरवालीकर, प्रा कसबे, प्रा सुर्यवंशी, डॉ आरबाड, प्रा मंडलिक, श्री कालीदास साठे, बालाजी कदम, दिपक पवार, दत्‍ता पवार यांनी परिश्रम घेतले. 

Saturday, February 15, 2014

मौजे जांब ता परभणी येथे करडई शेती दिनाचे आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अखिल भारतीय समन्‍वयित करडई संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने परभणी तालुक्‍यातील मौजे जांब येथे दि 17 फेब्रवारी रोजी सकाळी 11.00 वा करडई शेती दिनाचे आयोजन करण्‍यात आले असुन कार्यक्रमाचे उदघाटन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या हस्‍ते होणार असुन अध्‍यक्षस्‍थानी सरपंच बाळासाहेब रेंगे पाटील राहणार आहेत. तसेच हैद्राबाद येथील तेलबिया संशोधन संचालनालयाचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ के अंजनी, डॉ पदमावती, डॉ लक्ष्‍मीनारायण, डॉ करविलु व सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर हेही उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी शास्‍त्रज्ञ शेतक-यांना मार्गदर्शन करणार असुन मौजे जांब येथे विद्यापीठाने विकसित केली करडई पिकाचे वाण परभणी 12 चे प्रात्‍याक्षिक प्रक्षेत्रास भेटीचे आयोजन केले आहे. कार्यक्रमास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवानी उपस्थित राहण्‍याचे आवाहन करडई संशोधन प्रकल्‍पाचे प्रभारी अधिकारी डॉ एस बी घुगे व डॉ जी एम कोटे यांनी केले आहे. 

Friday, February 14, 2014

धर्मापुरी येथे आळंबी उत्‍पादनावर मार्गदर्शन


     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अ‍‍खिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍प मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास आणि कृषि महाविद्यालय, परभणी च्‍या आळंबी उत्‍पादन अनुभवाधारीत प्रशिक्षण कार्यक्रम यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने धर्मापुरी येथे ग्रामीण युवकांसाठी एक दिवशीय आळंबी प्रक्रिया व उत्‍पादन या विषयावर प्रशिक्षण दि. 12 फेब्रुवारी रोजी देण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी तंटामुक्‍तीचे अध्‍यक्ष राजकर्ण कदम होते तर सरपंच नारायण रेंगे व पोलीस पाटील शेषराव कदम उपस्थिती होती. प्रा डॉ. कल्‍याण आपेट यांनी आळंबी तयार करण्‍यासाठी लागणारे बेड, स्‍पॉन, त्‍याचे बी उत्‍पादन या विषयी मार्गदर्शन केले तर वरिष्‍ठ संशोधिका प्रा. निता गायकवाड यांनी जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाराष्‍ट्र स्‍पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्‍प व आत्‍मा या विषयी सविस्‍तर माहिती दिली. ग्रामीण युवकांनी आळंबी उत्‍पादन सारख्‍या जोड व्‍यवसाय करण्‍याचे आवाहण केले. कृषि महाविद्यालयातील आळंबी उत्‍पादन अनुभवाधारीत प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांनी आळंबी तयार करण्‍याचे प्रात्‍यक्षीक दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहयोगी संशोधन रेश्‍मा शेख यांनी केले. कार्यक्रमास गावातील युवक, शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.