Pages

Tuesday, February 25, 2014

रब्बी ज्वारीवरील मावाचा प्रादुर्भाव

सध्‍या प्रतिकूल हवामानामुळे रब्‍बी ज्‍वारीवर मावा कीडाचा मोठा प्रादुर्भाव दिसुन येत असुन या किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने वेळोवेळी सांगीतलेल्‍या उपाययोजना शेतकरी बांधवानी कराव्‍यात.
मावा ही रब्‍बी ज्‍वारीवरील महत्‍वाची कीड असुन डिसेंबर-जानेवारी महिन्‍यात माव्‍याचा प्रादुर्भाव जास्‍त शक्‍यता असते. प्रादुर्भाव सर्व प्रथम सर्वात खालच्‍या पानावर आढळून येतो व वातावरण पोषक असल्‍यास दोन ते तीन आठवडयात संपुर्ण झाडांच्‍या पानावर वाढत जातो. पिकाच्‍या दाणे भरणीच्‍या अवस्‍थेत प्रादुर्भाव आढळल्‍यास उत्‍पादनात जास्‍त फरक पडत नाही. परंतु पीक जर निसवणीच्‍या किंवा त्‍या पुर्वीच्‍या अवस्‍थेत असेल तर धान्‍य व  कडबा उत्‍पादनात 20 ते 25 टक्‍यांपर्यंत घट आढळुन येते. माव्‍याचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात असल्‍यास पाने तांबडी पडुन करपा झाल्‍याप्रमाणे वाळुन जातात, पर्यायाने झाडाची वाढ खुंटते. ज्‍वारी पोटरी अवस्‍थेत असल्‍यास कणसे बाहेर पडत नाहीत अथवा काही कणसे अर्धवट बाहेर पडतात व अशा कणसात दाणे भरण्‍याचे प्रमाण अत्‍यंत कमी असते.
सध्‍या मावा चिकटा रोगाची प्रचंड प्रादुर्भाव दिसुन येत असुन ज्‍वारी काळवंडल्‍याची कारणे पुढील प्रमाणे आहेत.
1.   उशीरा झालेली पेरणी - रब्‍बी ज्‍वारीच्‍या पेरणीची योग्‍य वेळ ऑक्‍टोंबरच्‍या पहिल्‍या पंधरवाड्यात असते. परंतु यावर्षी लांबलेल्‍या पावसामुळे रब्‍बी ज्‍वारीच्‍या पेरण्‍या नोंव्‍हेंबर महिन्‍याच्‍या शेवटपर्यंत सुरु होत्‍या.
2.   ज्‍वारीच्‍या वाढीच्‍या अवस्‍थेत माव्‍याचा झालेला प्रादुर्भाव - माव्‍याचा प्रादुर्भाव साधारणपणे जानेवारीच्‍या दुस-या पंधरवाड्यात जास्‍त प्रमाणात आढळतो. या काळात ज्‍वारीचे पीक हे प्रामुख्‍याने दाणे पक्‍व होण्‍याच्‍या अवस्‍थेत असते. अशा अवस्‍थेतील पिकाचे किडीमुळे जास्‍त नुकसान होत नाही. परंतु या वर्षी ज्‍वारीची पेरणी ही ऑक्‍टोंबरच्‍या दुस-या पंधरवाडयात किंवा त्‍यानंतर झाल्‍या कारणाने ज्‍वारीचे पीक हे सध्‍या फुलो-यात किंवा दाणे भरण्‍याच्‍या अवस्‍थेत आहे. अशा अवस्‍थेतील पिकाचे माव्‍यामुळे जास्‍त नुकसान होते.
3.    माव्‍याच्‍या वाढीसाठी पोषक हवामान या वर्षी फेब्रुवारी महिन्‍यातील किमान तापमान 14 अंश सेल्‍सीअसच्‍या खाली असुन अशी परिस्थिती माव्‍याच्‍या वाढीसाठी पोषक असते. त्‍याचबरोबर ज्‍वारीच्‍या पेरणीचा कालावधी वाढत गेल्‍याने माव्‍याला ज्‍वारीवर प्रादुर्भाव करण्‍यासाठी जास्‍त वेळ मिळाला. तसेच रब्‍बी ज्‍वारीच्‍या शिवारामध्‍ये ओलीताखालील असलेल्‍या गहु, ऊस ई. पिकांमुळे हवामानातील आद्रता वाढते. त्‍यामुळे सुध्‍दा माव्‍याचा प्रादुर्भाव वाढण्‍यास मदत होते.
4.   ऊस पिकाची काढणी - ऊस हे रब्‍बी ज्‍वारीवरील माव्‍याचे सुध्‍दा प्रमुख भक्ष पीक आहे. सध्‍या ऊसाची काढणी होत असल्‍याने तसेच सध्‍या उशिराने पेरलेली ज्‍वारी ही वाढीच्‍या विविध अवस्‍थेत असल्‍याने हिरवी असल्‍याने पर्यायी भक्ष पीक म्‍हणुन ज्‍वारीवर माव्‍याचा प्रादुर्भाव वाढला आहे.

पिकाची वेळोवेळी पाहणीच्‍या आधारे या किडीचे योग्‍य वेळी नियंत्रण करुन संभावित नुकसान टाळता येते. भविष्‍यात मावा किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्‍यासाठी विद्यापीठाने वेळोवेळी सांगीतलेल्‍या पुढील उपाययोजना कराव्‍यात.
· उशिराने पेरणी झालेल्‍या ज्‍वारीवर माव्‍याचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात आढळुन येतो. त्‍यामुळे रब्‍बी ज्‍वारीची योग्‍य वेळी ऑक्‍टोंबरच्‍या पहिल्‍या पंधरवाडयात पेरणी करावी.
·   माव्‍यास प्रतिकारक्षम वाणांचा वापर करावा. उदा. एसपीव्‍ही-1595, परभणी ज्‍योती.
· थंडीचे प्रमाण वाढु लागताच पिकाची वेळोवेळी पाहणी करावी. पाहणी करतांना ज्‍वारीच्‍या खालील पानांच्‍या मागील बाजुचे निरीक्षण करावे व माव्‍याचा प्रादुर्भाव आढळून येताच 400 मिली मिथील डेमॅटॉन 25 टक्‍के प्रवाही किंवा 500 मिली डायमेथोएट 30 टक्‍के प्रवाही किंवा 150 ग्रॅम थायामेथेक्‍झाम 25 टक्‍के दाणेदार किंवा 140 मिली इमीडॅक्‍लोप्रिड 17.8 टक्‍के प्रवाही यापैकी एका किटकनाशकाची प्रति हेक्‍टरी मात्रे नुसार 500 लि. पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.
·   तसेच ज्‍वारीच्‍या पानावरील काळ्या बुरशीच्‍या नियंत्रणासाठी कार्बेडेन्‍झीम या बुरशीनाशकाची 10 ग्रॅम / 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

सौजन्‍य
डॉ. एच. व्‍ही. काळपांडे, प्रा. आर. डब्‍ल्‍यु. देशमुख, श्री पी. पी. आंबिलवादे
श्री आर.एल.औढेंकर
ज्‍वार संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी .
फोन क्रं. 02452 221148