Pages

Wednesday, March 26, 2014

शेतक-यांच्‍या दृष्‍टीने उपयुक्‍त तंत्रज्ञानाचा प्रात्‍यक्षिकात समावेश करावा.... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

दोन दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु. 
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना हैद्राबाद येथील विभागीय प्रकल्‍प संचालक डॉ. एन. सुधाकर. 
*******************************************
कृषि विज्ञान केंद्राने विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानासोबतच या भागातील शेतक-यांच्‍या दृष्‍टीने उपयुक्‍त व अनुकूल देशात ईतरत्र उपलब्‍ध असलेल्‍या तंत्रज्ञानाचे प्रात्‍यक्षिकात समावेश करून त्‍याचा प्रसार करावा, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने आयोजित दोन दिवशीय (दिनांक 25 व 26 मार्च रोजी) कार्यशाळेच्‍या उद्घाटन ते प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्‍हणुन हैद्राबाद येथील विभागीय प्रकल्‍प संचालक डॉ. एन. सुधाकर हे उपस्थित होते तर मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. के. दत्‍तात्री, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाडा विभागात एकरा कृषि विज्ञान केंद्राच्‍या 2014-15 साठीच्‍या वार्षिक कृती आराखडा निश्चित करण्‍यासाठी हया कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.
मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू पुढे म्‍हणाले की, शेतक-यांच्‍या विद्यापीठाकडुन अनेक अपेक्षा असुन त्‍यापुर्ण करण्‍याची जबाबदारी प्रत्‍येकाची आहे. नैसर्गीक संकटाचा सामाना करण्‍यासाठी शेतक-यांना शास्‍त्राज्ञांनी मार्गदर्शन करावे. शेतक-यांपर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसारासाठी एसएमएस व मोबाईल सेवांचा वापर करण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी यावेळी दिला.
विभागीय प्रकल्‍प संचालक डॉ. एन. सुधाकर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, कृषि विज्ञान केंद्राची विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाचे शेतक-यांच्‍या शेतावर प्रात्‍यक्षिक घेऊन शेतक-यांच्‍या परिस्थितीनुसार त्‍यात बदल करण्‍याची महत्‍वाची भुमिका पार पाडत आहे, त्‍याचबरोबर ग्रामीण युवकांसाठी कृषी संलग्‍न उद्योग उभे करण्‍यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे.
प्रास्‍ताविकात डॉ. अशोक ढवण यांनी कृषि विस्‍तारात कृषि विज्ञान केंद्राची भुमिका विशद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ. राकेश आहिरे यांनी केले. या कार्यशाळेत मराठवाडा विभागातील अकरा कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयक व विषय तज्ञासह विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व अधिकारी सहभागी झाले आहेत.