Pages

Thursday, April 24, 2014

कोरडवाहू शेतीतील बिन खर्चाचे तंत्रज्ञानाचा प्रसार करावा....अतिरिक्त मुख्यसचिव (कृषि व पणन) मा. डॉ. सुधीरकुमार गोयल

वनामकृवि मध्‍ये कोरडवाहू शेती अभियानाच्‍या दोन दिवशीय कार्यशाळेचे उदघाटन  
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु 
मार्गदर्शन करतांना मा. डॉ. सुधीरकुमार गोयल
कोरडवाहू शेती अभियांनातर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळाच्‍या उदघाटन प्रसंगी कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट, महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा अभियानाचे मार्गदर्शक मा. डॉ. राजाराम देशमुख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. वेंकटेश्‍वरलु, महाबीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वानखेडे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आदी
 ************************************
देशाच्‍या अन्‍नधान्‍य उत्‍पादन वाढीचा दराच्‍या तुलनेत राज्‍याचा दर कमी असण्‍याचे कारण राज्‍यातील 83 टक्‍के शेती ही जिरायती असुन त्‍यासाठी राज्‍य शासनाकडुन कोरडवाहू शेती अभियान राबविण्‍यात येत आहे. शेतीतील बिन खर्चाचे तंत्रज्ञान जसे की उताराला आडवी पेरणी, सरी व वरंबा पध्‍दत, आंतर पिक व मिश्र पिक पध्‍दती आदींचा कृषि विस्‍तार कार्यक्रमात समावेश करावा, असे प्रतिपादन अतिरिक्‍त मुख्‍य सचिव (कृषि व पणन)  मा. डॉ सुधीरकुमार गोयल यांनी केले. ते महाराष्‍ट्र शासनाच्‍या कोरडवाहू शेती अभियांनातर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळाच्‍या उदघाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट, महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा अभियानाचे मार्गदर्शक मा. डॉ. राजाराम देशमुख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. वेंकटेश्‍वरलु, महाबीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वानखेडे व जिल्‍हाधिकारी मा. श्री. एस. पी. सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ सुधीरकुमार गोयल पुढे म्‍हणाले की, या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध विषयावर चर्चा करून येणा-या खरिप हंगामासाठी ठोस असा कृ‍ती आराखडा निश्चित करण्‍यात यावा. कृषि विभागाने विविध योजना 100 टक्‍के कार्यन्‍वीत करण्‍याचा प्रयत्‍न करावा तसेच मॉनिटरींग यंत्रणा बळकट करावी, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, महाराष्‍ट्र राज्‍य इतर राज्‍याच्‍या तुलनेत कोरडवाहू शेती अभियानासाठी मोठया प्रमाणात खर्च करित असुन या कार्यशाळातील चर्चाअंती जिरायती शेतीसाठीचे उपयुक्‍त तंत्रज्ञान देण्‍यात यावे. कोरडवाहू भागात शेतकरी आत्‍महत्‍याचे प्रमाण जास्‍त आहे. आंध्रप्रदेशात असे आढळून आले आहे की, ज्‍या भागात शेतीसोबतच पशुपालनाचा व्‍यवसाय शेतकरी करतात, त्‍या ठिकाणी आत्‍महत्‍या जवळपास होत नाहीत. त्‍यामुळे कोरडवाहू शेती अभियानात शेती जोडधंद्यावर देखिल भर दयावा. राज्‍यात काही भागात चांगल्‍या प्रमाणे शेततळे, जलसंधारण, पाणी पुनर्भरणाचे उदाहरणे आहेत त्‍यांची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात यावी.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. विना भालेराव यांनी केले. दोन दिवस होणा-या या कार्यशाळेत महाराष्‍ट्रातील कोरडवाहु शेती तंत्रज्ञानाची सद्य:स्थिती, सरंक्षीत लागवड व मुल्‍यवर्धन, हवामान बदल, आपत्‍कालीन पीक नियोजन व एकात्मिक शेती पध्‍दती, शेतीतील पाणी व्‍यवस्‍थापनाचे यांत्रिकीकरण तसेच खरिप २०१४ हंगामाचे नियोजन, बियाणे उपलब्‍धता व कोरडवाहु शेती तंत्रज्ञान आदी विषयांवर राज्‍यातील विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्‍यानुसार कोरडवाहु शेती अभियानातंर्गत राबविण्‍यात येणारे तंत्रज्ञान निश्चित करून ते राज्‍य शासनास हस्‍तां‍तरित करण्‍यात येणार आहे. यावेळी राज्‍यातील कृषि विभागातील विविध विभागाचे संचालक, सहसंचालक, सर्व जिल्‍हा अ‍धीक्षक कृषि अधिकारी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.