Pages

Wednesday, August 13, 2014

कापुस लागवडीचे यांत्रिकीकरण शेतक-यांना किफायतीशीर असावे ..... कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवि व मोसॅन्‍टो यांच्‍यातील सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्‍पास प्रारंभ

यंत्राव्‍दारे कापुस लागवड व वेचणीच्‍या प्रात्‍यक्षिक प्रकल्‍पाचे उदघाटन
वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठ व मोसॅन्‍टो इंडिया लिमिटेड यांच्‍यात सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्‍पाचे उदघाटन करतांना वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
******************************
परभणी : कापुस वेचणीच्‍या यंत्राबाबत शेतक-यांकडुन मोठी मागणी होत आहे, परंतु हे यांत्रिकीकरण शेतक-यांना आर्थिकदृष्‍टया किफायतीशीर पाहिजे, असे प्रतिपादन वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठ व मोसॅन्‍टो इंडिया लिमिटेड यांच्‍यात सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्‍पातंर्गत दि. १२ ऑगस्‍ट रोजी यंत्राव्‍दारे कापुस लागवड प्रात्‍यक्षिकाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण, परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, मोंसॅन्‍टो इंडिया लि. चे मुख्‍य ज्ञान विस्‍तारक डॉ एस एस काजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कापुस वेचणीसाठी शेतकरी बांधवाना मोठया प्रमाणात मजुरांची समस्‍या भेडसावत असुन वेचणीसाठी मोठा खर्च होत आहे. यंत्राव्‍दारे कापुस वेचणीत येणा-या समस्‍याचे निराकरण या प्रात्‍यक्षिकात व्‍हावे तसेच यातच संपुर्ण फर्टिइरिगेशनचाही समावेश असावा, अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कापुस लागवडीचे यांत्रिकीकरण प्रकल्‍प सार्वजनिक-खाजगी भागीदारीतत्‍वावर आधारीत राबविणारे एकमेव विद्यापीठ असुन मोठया संख्‍येने शेतक-यांनी या प्रात्‍यक्षिकाची पाहणी करून ऐच्‍छीकरित्‍या पुढे येऊन याबाबत प्रतिक्रिया दयावीत म्‍हणजे या तंत्रज्ञानात अनुकूल बदल करता येतील.  
परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, कपाशीचे लागवड खर्चात बियाणावरील खर्च मोठा असल्‍यामुळे यंत्राव्‍दारे लागवड करण्‍यातांना याचा विचार व्‍हावा. प्रात्‍यक्षिकाचबाबत सविस्‍तर माहिती डॉ एस एस काजी व न्‍यु हॉलंडचे अधिकारी श्री अमित परदानिया यांनी उपस्थितांना माहिती दिली. डॉ एस एस काजी यांनी प्रात्‍यक्षिकाची माहिती देतांना सांगितले की, या प्रकल्‍पात यंत्राव्‍दारे वेचणीसाठी अनुकुल वाणाची लागवड यंत्राव्‍दारे सघन लागवड पध्‍दतीने करण्‍यात येऊन याची शेतक-यांच्‍या पारंपारीक कापुस लागवड पध्‍दतीशी पडताळणी करण्‍यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ आनंद गोरे यांनी केले, या उपक्रमास संशोधन उपसंचालक डॉ जी के लोंढे, रानडे अॅग्रोचे विभागीय व्‍यवस्‍थापक ए बी सयद, नावेद शेख, आर डी भोरे आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थितीत होते.
सदरिल प्रात्‍यक्षिक हे कृषिविदया विभागाच्‍या प्रक्षेत्रावर घेण्‍यात आलेली असुन यात तीन प्रकारच्‍या प्‍लॉटचे नियोजन असुन यात शेतक-यांची पारंपारीक कापुस लागवड पध्‍दत, संपुर्ण यांत्रिकीकरण म्‍हणजे यंत्राव्‍दारे लागवड व वेचणी, अर्ध यांत्रिकीकरण म्‍हणजे फक्‍त वेचणी यंत्राव्‍दारे करण्‍यात येणार आहे.
कापुस लागवड यंत्राची माहिती देतांना 
प्रकल्‍पांतर्गत यंत्राव्‍दारे कापुस लागवड करतांना