Pages

Wednesday, September 17, 2014

विद्यापीठाने पीकांची बाजारपेठ व अर्थकारण यावर मार्गदर्शन करावे...मा. डॉ. चारूदत्त मायी

रबी पीक शेतकरी मेळाव्‍यास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद
रबी पीक शेतकरी मेळाव्‍याचे उदघाटन करतांना भारतीय कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष मा. डॉ. चारूदत्‍त मायी, कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट, प्रसिध्‍द अर्थतज्ञ मा. डॉ एच एम देसरडा, कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कृषि सहसंचालक श्री के एन देशमुख, कुलसचिव डॉ डि एल जाधव, डॉ. साहेबराव दिवेकर आदी
रबी पीक शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना भारतीय कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष मा. डॉ. चारूदत्‍त मायी व्‍यासपीठावर कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट, प्रसिध्‍द अर्थतज्ञ मा. डॉ एच एम देसरडा, कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कृषि सहसंचालक श्री के एन देशमुख, कुलसचिव डॉ डि एल जाधव आदी
रबी पीक शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट
रबी पीक शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु
रबी पीक शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना प्रसिध्‍द अर्थतज्ञ मा. डॉ एच एम देसरडा
मराठवाडातील शेतक-यांच्‍या ८० टक्के क्षेत्रावर विद्यापीठाने निर्माण केलेल्‍या विविध पीकांच्‍या जाती असुन हीच विद्यापीठाची मोठी उपलब्‍धी आहे. विद्यापीठाचे विविध तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचले आहे, यापुढे विद्यापीठाने पीकांची बाजारपेठ व अर्थकारण यावर मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन भारतीय कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष व माजी कुलगुरू मा. डॉ. चारूदत्‍त मायी यांनी केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनानिमित्‍त आयोजित रबी पीक शेतकरी मेळावाच्‍या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
मेळाव्‍यास विशेष अतिथी म्‍हणुन महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट व प्रसिध्‍द अर्थतज्ञ मा. डॉ एच एम देसरडा उपस्थित होते तर अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु होते. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले, शिक्षण संचालक व अधिष्‍ठाता डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कृषि सहसंचालक श्री के एन देशमुख, कुलसचिव डॉ डि एल जाधव, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. साहेबराव दिवेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. चारूदत्‍त मायी पुढे म्‍हणाले की, मराठवाडयातील कोरडवाहु शेतीत आज उदासीनता आली आहे. ही कोरडवाहु शेती किफायतीशीर करावयाची असेल तर एकतर शेतक-यांना पाणी दया किंवा त्‍यांना प्रती माह एक हजार रूपये सबसिडी घ्‍या तसेच कोरडवाहु शेतक-यांच्‍या पीकांची आधारभुत किंमत ही ओलीताच्‍या शेतीपेक्षा जास्‍त दयावी लागेल तरच कोरडवाहु शेती टिकेल. शेती पुढील दुसरा मोठा प्रश्‍न हा मजुरांचा आहे, यासाठी यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही, गटशेतीला प्रोत्‍साहन दयावे लागेल. भाडेतत्‍वावर शेती अवचारे व यंत्राचे केंद्र स्‍थापन करण्‍यात यावीत, त्‍यामार्फत गरजेनुसार शेतकरी तेथुन यंत्र भाडेतत्‍वावर घेतील. निजाम राजवटीतुन मराठवाडा मुक्‍त झाला, आता मराठवाडयातील शेती समस्‍या मुक्‍त होण्‍यासाठी काम करा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.  
कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांट दांगट आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषिक्षेत्र हे चिंतेचे क्षेत्र नाही, ते चिंतनाचे क्षेत्र आहे. शेतक-यांच्‍या प्रश्‍नावर चिंता नको, त्‍यावर चिंतन करूनच तोडगा काढता येईल. शेतक-यांच्‍या प्रत्‍येक प्रश्‍नाकडे डोळसपणे बघावे लागेल. देशातील पहिल्‍या हरितक्रांतीने आपण अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झालो आहोत, शेतीची उत्‍पादकाता वाढली, परंतु शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढले नाही, यासाठी दुस-या हरितक्रांतीची गरज आहे. बाजारात विकणारे शेतक-यांना पिकवावे लागेल. आजच्‍या जा‍गतिकीकरणात शेती प्रश्‍नाना तोंड देण्‍यासाठी मंत्र, तंत्र, यंत्र, कौशल्‍य व व्‍यवस्‍थापन या पंचसुत्रीचा अवलंब शेतक-यांना करावा लागेल. यातील मंत्र म्‍हणजे शास्‍त्रीय ज्ञान याची कास शेतक-यांना धरावी लागेल. मराठवाडाला निसर्गाने भरपुर दिले आहे, त्‍याचे आर्थिक समृध्‍दीत रूपांतर आपण करू शकलो नाही. यावर्षी महाराष्‍ट्र शासनाच्‍या कृषि विभागाने कोरडवाहु शेतीमध्‍ये रूंद वरंबा व सरी तंत्रज्ञानाचा विस्‍तार केला, यासाठी राज्‍यात सहा हजार बीबीएफ यंत्राचे वाटप शेतक-यांना केले गेले. शेतक-यांनीही गटशेतीच्‍या माध्‍यमातुन त्‍याचा मोठा वापर केले. शाश्‍वत उत्‍पादनासाठी एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करावा लागेल. शेतीमध्‍ये आज प्रचंड संधी असुन शेती प्रक्रिया उद्योगावर भर दयावा लागेल. सकारत्‍मकपणे व कष्‍टाने शेती करावी लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अर्थतज्ञ डॉ एच एम देसरडा यांनी आपल्‍या भाषणात स्‍वावलंबी शेती, स्‍वाभीमानी शेती, सेंद्रीय शेती, आनंदाची शेती करण्‍यासाठी शेतकरी, सरकार, बाचार व निसर्ग यांना एकत्र यावे लागेल असे सांगितले.
समारोपीय भाषणात विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, महाराष्‍ट्रातील शेतकरी डाळींब, द्राक्ष आदी पिके घेऊन फलोत्‍पादनात पुढे येत आहेत, मराठवाडयातही शेतकरी सकारत्‍मक दृष्‍टीकोन ठेऊन शेती करतांना दिसत आहे. शेतक-यांच्‍या असलेल्‍या विद्यापीठाकडीलच्‍या अपेक्षा पुर्ण करण्‍याचा विद्यापीठ प्रयत्‍न करिल असे आश्‍वासन त्‍यांनी दिले.
प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले यांनी विद्यापीठाच्‍या  विस्‍तार कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. राकेश आहीरे यांनी केले. मेळाव्‍यास प्रगतशील शेतकरी सुर्यकांतराव देशमुख, सोपानराव अवचार, नाथराव कराड, उदयवराव खेडेकर, बजाज यांच्‍यासह शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थिती होते.
याप्रसंगी विद्यापीठाच्‍या शेतीभाती मासिकाचे व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्तिकेचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तसेच कृषि प्रदर्शनीचे तसेच विद्यापीठाच्‍या रबी पीकांच्‍या बियाणे विक्रीचे ही उदघाटन उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
तांत्रिक सत्रात सद्यपरिस्थितीमध्‍ये कपाशी व सोयाबीन पीकांतील किड व रोग व्‍यवस्‍थापनाबाबत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी तर दर्जेदार डाळिंब व्‍यवस्‍थापन बाबत संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी मार्गदर्शन केले. विविध पीक लागवडी बाबत डॉ यु. एन आळसे, डॉ व्हि डी सोळंके, डॉ एस बी घुगे, डॉ डी के पाटील, डॉ के एस बेग, डॉ जी पी जगताप, डॉ उदय खोडके, डॉ आनंद गोरे, प्रा अरूण गुट्टे आदीनी मार्गदर्शन केले तसेच विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांच्‍या विविध शेतीबाबतच्‍या विविध शंकाचे समाधान केले. 

शेतीभाती मासिकाचे विमोचन करतांना
कृषि प्रदर्शनीचे उदघाटन करतांना
विद्यापीठाने विकसित केलेल्‍या रबी पीकांच्‍या विविध वाणाच्‍या बियाणे विक्रीचे उदघाटन करतांना