Pages

Saturday, November 29, 2014

पुणे येथे कृषि उद्योजकता विषयावर राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन

कृषि पदवीधर उद्योजकांच्‍या नावाची डिरेक्‍टरी होणार प्रसारित
राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठे आणि जर्नल ऑफ अॅ‍ग्रिकल्‍चर रिसर्च अँड टेक्‍नॉलॉजी यांच्‍या सयुक्‍त विद्यमाने पुणे, बिबवेवाडी येथील लोकशाहीर साठे नाटयगृहात १५ व १६ डिसेंबर २०१४ दरम्‍यान चारही कृषि विद्यापीठांच्‍या कुलगुंरूच्‍यामार्गदर्शनाखाली कृषि उद्योजगता, व्‍यापारातील जागतिक संधी या विषयावर राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या राष्‍ट्रीय परिसंवादामध्‍ये कृषि व्‍यवसाय व औद्योगिक क्षेत्रात उल्‍लेखनिय कार्य करणारे कृषि पदवीधर, कृषि संशोधक, कृषि शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी मोठया संख्‍येने सहभागी होणार आहेत. शेती व्‍यवसाय व कृषि उद्योगांच्‍या अनुषंगाने झालेल्‍या कामाचा मागोवा व कृषि उद्योग व्‍यवसायांना नवी दिशा देण्‍याच्‍या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या परिसंवादात कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन, कृषि निविष्‍ठा उद्योग, कृषि पणन, मुल्‍यवर्धन तंत्रज्ञान व कृषि उद्योजगता इत्‍यादी विषयांवर चर्चासत्रात भर देण्‍यात येणार आहे. कृषि क्षेत्राला कृषि व्‍यवसायाचे स्‍वरूप प्राप्‍त करून देण्‍यासाठी, कृषि व्‍यवसायांमध्‍ये कृषि पद‍वीधरांना असलेल्‍या संधी व वाव, कृषि व्‍यवसायांमध्‍ये कृषि पदवीधरांना आकर्षित करण्‍यासाठी उपाययोजना यावर अधिक भर या परिसंवादात दिला जाणार आहे. या राष्‍ट्रीय परिसंवादाचे औचित्‍य साधुन कृषि पदवीधर व्‍यावसायिकांची डिरेक्‍टरी / सुची प्रकाशीत करण्‍यात येणार आहे. राज्‍यातील ज्‍या कृषि पदवीधरांनी स्‍वत:चा कृषि व्‍यवसाय सुरू केलेला असेल त्‍यांचे नाव, पत्‍ता, कृषि व्‍यवसायाचे स्‍वरूप, संपर्क क्रमांक, ईमेल, वेबसाईट इत्‍यादी माहितीचा या डिरेक्‍टरी / सुचीमध्‍ये समावेश केला जाणार आहे. यामुळे कृषि व्‍यवसायात असलेल्‍या राज्‍यातील कृषि पदवीधरांची संपुर्ण माहितीची यादी एकाच ठिकाणी उपलब्‍ध होणार आहे. 
    राज्‍यातील सर्व कृषि पदवीधरांना आवाहन करण्‍यात येते की, ज्‍या कृषि पदवीधरानी स्‍वत:चा कृषि व्‍यवसाय सुरू केलेला आहे, त्‍यांनी या डिरेक्‍टरीमध्‍ये आपल्‍या नावाची नोंद करावी. या डिरेक्‍टरीमध्‍ये आपल्‍या नावाचा व व्‍यवसायाच्‍या माहितीचा समावेश करण्‍यासाठी www.sauagribusiness.com या संकेतस्‍थळावर जावुन आपली माहिती भरावी तसेच आपल्‍या कृषि महाविद्यालयाशी किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत येणा-या कृषि पदवीधरांनी जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांच्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि अधिष्‍ठाता डॉ भीमराव उल्‍मेक व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी केले आहे.