Pages

Wednesday, January 14, 2015

कोरडवाहु शेतीचे तंत्रज्ञान शेतक-याच्‍या परिस्थितीस अनुकूल असावे....कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

एक दिवसीय कार्यशाळेत शेतकरी व कृषि शास्‍त्रज्ञ यांच्‍यात थेट संवाद

संशोधनाच्‍या आधारे कृषि विद्यापीठ शेतक-यांसाठी विविध तंत्रज्ञानाची शिफारस करते, परंतु हे तंत्रज्ञान अवलंब करतांना शेतक-यांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागते, त्‍यासाठी कृषि शास्‍त्रज्ञ व शेतकरी यांच्‍या प्रत्‍यक्ष चर्चा होणे गरजेचे आहे, म्‍हणजे कृषि शास्‍त्रज्ञांना शेतक-यांना अनुकूल तंत्रज्ञान देता येईल, असे प्रति‍पादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प व हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍था (क्रीडा) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कोरडवाहु शेतीसाठी उपयुक्‍त तंत्रज्ञानात सुधारणा करण्‍यासाठी एक दिवसीय सल्‍ला कार्यशाळेचे दि. १३ जानेवारी रोजी आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यशाळेच्‍या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते, यावेळी व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍थेचे (क्रीडा) प्रकल्‍प समन्‍वयक डॉ रविंद्र चारी, कुलसचिव डॉ डि एल जाधव, आत्‍माचे उपप्रकल्‍प संचालक श्री अशोक काळे, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ सुरेंद्र चौलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, की मराठवाडयातील शेती ही कोरडवाहु असल्‍यामुळे कोरडवाहु शेतीचा विकास म्‍हणजेच मराठवाडयातील शेतक-यांचा विकास होय. याभागात कापुस व सोयाबीन ही मुख्‍य पिके असुन यावर्षीच्‍या खरिप हंगामात कृषि विभाग व विद्यापीठाने सोयाबीन लागवडीसाठी रूंद वरंबा व सरी (बीबीएफ) पध्‍दतीचा मोठा प्रसार केला, यासाठी कृषि विभागाच्‍या वतीने बीबीएफ लागवड यंत्राचे वाटप करण्‍यात आले होते. ज्‍या शेतक-यांनी सोयाबीनची लागवड बीबीएफ पध्‍दतीने केली, त्‍यांना कमी पर्जन्‍यमानातही निश्चितच ब-यापैकी उत्‍पादन मिळाले.

डॉ रविंद्र चारी यांनी कोरडवाहु संशोधनाबाबत माहिती देतांना सांगितले, की कोरडवाहु शेतीसाठी विद्यापीठाने व क्रीडा संस्‍थेने अनेक तंत्रज्ञान शिफारसी दिल्‍या आहेत, परंतु या शिफारसी शेतक-यापर्यंत परिपुर्ण पोहचल्‍या आहेत का? त्‍यांचा अवलंब करतांना शेतक-यांना काय समस्‍या येतात? त्‍याच्‍या प्रसार व विस्‍तारासाठी कीती वाव आहे? हयासाठी याप्रका-याच्‍या कार्यशाळा आयोजीत करणे गरजेचे आहे. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले, की कोरडवाहु शेतीत अनेक आव्‍हाने आहेत, कमी पर्जन्‍यमानात तग धरू शकतील असे तंत्रज्ञान विकसित करण्‍यासाठी वेळोवेळी शास्‍त्रज्ञ, कृषि विस्‍तारक व शेतकरी यांचात संवाद होणे गरजेचे असुन अशा कार्यशाळेचे आयोजनावर विद्यापीठ भर देत आहे. कृषि विभागाने संपुर्ण राज्‍यात कोरडवाहु शेतक-यांसाठी साधारणत: सात हजार बीबीएफ लागवड यंत्राचे वाटप केल्‍याची माहिती आत्‍माचे उपप्रकल्‍प संचालक श्री अशोक काळे यांनी दिली.

कार्यशाळेत कोरडवाहु संशोधन केंद्राने विकसित केलेले तंत्रज्ञान जसे की, बीबीएफ लागवड पध्‍दत, जलसंधारण सरी, आंतरपिक पध्‍दती, विहीर पुर्नभरण, शेततळे व संरक्षित सिंचन आदींवर डॉ सुरेंद्र चौलवार, डॉ मदन पेंडके व वरिष्‍ट शास्‍त्रज्ञ डॉ आनंद गोरे यांनी सादरीकरणाव्‍दारे सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. याप्रसंगी या तंत्रज्ञानाबाबत शेतक-यांनी उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांना व समस्‍यांना कृषि शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली. याचर्चेत अकोला येथील डॉ महेंद्र नागदिवे, सोलापुर येथील डॉ विजय अमृतसागर, डॉ एम जी उमाटे, डॉ डि ए चव्‍हाण व प्रगतशील शेतकरी श्री सोपनराव अवचार, श्री उदयराव खेडेकर, श्री गिरीष पारधे यांच्‍यासह विविध भागातील शेतकरी, कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेत शेतक-यांनी दिलेल्‍या माहितीच्‍या आधारे वि़द्यापीठ शास्‍त्रज्ञ कोरडवाहु शेतीसाठी उपयुक्‍त तंत्रज्ञानात संशोधनाच्‍या आधारे सुधारणा करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पी एच गौरखेडे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ सुरेंद्र  चौलवार यांनी केले. कार्यशाळा यशस्‍वीतेसाठी डॉ जी के गायकवाड, श्रीमती सारिका नारळे, श्री माणिक समिद्रे, शेख सय्यद, सुनिल चोपडे आदींनी परिश्रम घेतले.