Pages

Tuesday, January 6, 2015

एकात्मिक तण व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाचा काटेकोर अवलंब शेतक-यांच्‍या शेतावर होणे आवश्‍यक..... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

पीक उत्‍पादन वाढीसाठी तणनाशकाचा योग्‍य वापर या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

एकात्मिक तण व्‍यवस्‍थापनातील मशागतीय, रासायनिक व जैविक पध्‍दती तंत्रज्ञान शिफारशींचा काटेकोर अवलंब शेतक-यांच्‍या शेतावर होणे आवश्‍यक असुन हे तंत्रज्ञान अवलंब करतांना शेतक-यांच्‍या समस्‍या शास्‍त्रज्ञांनी जाणुन घ्‍याव्‍यात, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
केंद्रीय कृषि मंत्रालयाच्‍या सौजन्‍याने व वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी वि़द्यापीठाच्‍या संशोधन संचालनालय व कृषिविद्या विभाग यांच्‍या विद्यमाने पीक उत्‍पादन वाढीसाठी तणनाशकाचा योग्‍य वापर या विषयावर राज्‍याच्‍या कृषी विभागातील कृ‍षी पदवीधारक कर्मचारी, कृषि विद्यापीठातील, कृषि विज्ञान केंद्रातील कृषि विस्‍तारकांसाठी दि ६ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्‍यान आठ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन या प्रशिक्षणाच्‍या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, की जे कृषि विस्‍तारक प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर कार्य करतात त्‍यांनी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांशी आपले तण व्‍यवस्‍थापनातील अनुभवांची देवाणघेवाण करावी म्‍हणजे संशोधनास दिशा मिळेल. तणामुळे मोठयाप्रमाणात शेतक-यांचे नुकसान होते तसेच मजुरांची कमतरता व वाढती मजुरी यामुळे तण व्‍यवस्‍थापनाचा खर्च वाढत असुन आगामी काळात जैवतंत्रज्ञानव्‍दारे विविध पीकांची तण प्रतिकारक जनुकीयदृष्‍टया सुधारित - जीएम (जेनेटीकली मोडीफार्इड) वाणे येतील, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले आदींनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक समन्‍वयक डॉ अशोक जाधव यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ के डी जाधव व आभार प्रदर्शन डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ डब्‍ल्‍यु एन नारखेडे, डॉ पी बी केदार, डॉ डी एस पेरके, प्रा अवसरमल आदींनी परिश्रम घेतले.
आठ दिवसीय प्रशिक्षणात पीकांसाठी तणनाशकांचा वापर, खरेदी, हाताळणी, साठवणुक, तणनाशकांचे मिश्रण करणे, विविध तण व्‍यवस्‍थापन पध्‍दती, नगदी पीकातील तण व्‍यवस्‍थापन, तणनाशक फवारणी यंत्रे, तणांची ओळख, तणनाशकांचा कार्यक्षमरित्‍या वापर, जैविक किड नियंत्रण व एकात्मिक तण व्‍यवस्‍थापन आदीं विषयावर विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन प्रत्‍यक्ष प्रक्षेत्र भेटीचेही आयोजन करण्‍यात आले आहे.