Pages

Thursday, February 19, 2015

छत्रपतीचे विचार आजही उपयुक्‍त .........जेष्‍ट पत्रकार मा श्री अमर हबीब

वनामकृवित शिवजयंती उत्‍साहात साजरी



छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजच्‍या युगातही उपयुक्‍त असुन त्‍यांच्‍या विचारापासुन युवकांनी प्रेरणा घ्‍यावी, असे प्रतिपादन अंबेजोगाई येथील जेष्ट पत्रकार तथा विचारवंत मा श्री अमर हबीब यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाच्‍या वतीने शिवजयंतीनिमित्‍त शिवशाहीचे आजचे संदर्भ या विषयावर आयोजीत व्‍याख्‍यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डि एल जाधव, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटणम, डॉ पी एन सत्‍वधर, माजी कुलसचिव डॉ डि ए चव्‍हाण, डॉ दिलीप मोरे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
जेष्‍ट पत्रकार मा श्री अमर हबीब पुढे म्‍हणाले की, छत्रपती उच्‍चतम प्रशासक व सयंमी व्‍यक्‍तीमत्‍व होते. समाजातील प्रत्‍येक घटकांचा विचार ते करीत, अत्‍यंत महत्‍वाचा घटक म्‍हणुन शेतक-यांचा आदर करीत. छत्रपतींनी शेतक-यांची जमीन मोजण्‍याची पध्‍दत विकसीत केली होती व उत्‍पादनावर आधारीत शेतसारा देण्‍याची पध्‍दतीचा प्रारंभ त्‍यांनी केला. कोणावरही अन्‍याय व अत्‍याचार होणार नाही यासाठी महाराज विशेष लक्ष देत असत, सध्‍या राष्‍ट्रीय अखंडतेसाठी देशात सामाजिक एकोप्‍याचे प्रयत्‍न मोठया प्रमाणात होत असुन छत्रपतीचे स्‍वराज्‍य हे आपल्‍या समोरील एक आदर्श आहे. त्‍यांचे विचार सद्य: स्थितीतही उपयुक्‍त असुन ते आचरणात आणणे आवश्‍यक आहेत, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आशा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. याप्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्‍यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेची ढोलताशाच्‍या गजरात विद्यापीठाच्‍या वतीने शहरात मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.