Pages

Wednesday, February 4, 2015

उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या विद्यार्थीनी –हदयस्‍पर्शी एकांकीका सादर करून जागवली शेतक-यांत उमेद

उपस्थितांचे डोळेही पाणावले, वनामकृविच्‍या उमेद उपक्रमातंर्गत कार्यक्रम
कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले
परभणी : मराठवाडात कमी पर्जन्‍यमानामुळे शेतमालाचे अपेक्षित उत्‍पादन न मिळाल्‍याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. शेतक-यांनी नाऊमेद न होता प्राप्‍त परिस्थितीला सामोरे जाण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने उमेदउपक्रम कुलगुरु मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या संकल्‍पनेने विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले व शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत आहे. उमेद उपक्रमांतर्गत परभणी येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने पुर्णा तालुक्‍यातील मौजे बलसा (बु) येथे दि. ३१ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्‍हणुन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले हे होते तर अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ. अरुण कदम तर डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. आनंद गोरे, डॉ. जी. पी. जगताप, प्रा. लोहकरे, मुख्‍याध्‍यापक श्री झंवर, कृषि सहाय्यक श्री मस्‍के आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या स्‍वयंसेवकांनी डॉ. व्‍ही. व्‍ही. भगत यांच्‍या मार्गदर्शनाखाली शेतक-यांच्‍या जीवनावरील आत्‍महत्‍याविषयीची –हदयस्‍पर्शी एकांकीका सादर केली, ही एकांकीका पाहुन उपस्थितीतांचे डोळेही पाणावले. या एकांकीकेव्‍दारे सद्यस्थितीत शेतक-यांनी नाऊमेद न होता प्राप्‍त परिस्थितीला धीराने सामोरे जाण्‍याचा संदेश देण्‍यात आला. तसेच राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या व गावातील शालेय विद्यार्थ्‍यामार्फत कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.पी. सोळंके यांच्‍या मार्गदर्शनाखाली गावामध्‍ये प्रभातफेरीचे काढण्‍यात आली, याचे उद्घाटन सरपंच सुरेशराव डुबे यांनी केले.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी शेतक-यांना शाश्‍वत शेतीबाबत मार्गदर्शन करतांना म्‍हणाले, की पिकांवरील विविध किड व रोग व्‍यवस्‍थानासाठी एकात्मिक पध्‍दतीने व्‍यवस्‍थापन करावे यामुळे फवारणीचा खर्च कमी करता येईल, किड व रोगाचे नियंत्रन योग्‍यरित्‍या होईल. याप्रसंगी शेतक-यांच्‍या विविध शेतीविषयक शंकाचे त्‍यांनी उत्‍तरे देवुन शेतक-यांचे समाधान केले. प्राचार्य डॉ अरूण कदम यांनी शेतीमध्‍ये कोरडवाहू फळ झाडाची लागवड व कमी खर्चात जास्‍त उत्‍पादनासाठीच्‍या उपायाविषयी मार्गदर्शन केले. प्रा. एम. आर. मोरे यांनी जलसंधारणाविषयी कविता सादर करुन मुळस्‍थानी पाण्‍याचे पुनर्भरण व नियोजनाविषयी माहिती दिली. शेतकरी भागवत भुसारे, ज्ञानेश्‍वर शिंदे, ज्ञानेश्‍वर डुबे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सोपानराव डुबे, बालासाहेब डुबे, शंकर जेडगे, मुंजा डुबे, शिवाजी डुबे, संतोष शिंदे, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेणुका पवार व शाम कुंवर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. बी. एम. कलालबंडी यांनी केले. कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकांकीका सादर करतांना राष्‍ट्रीय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक