Pages

Tuesday, March 17, 2015

दैठणा येथे गृहविज्ञान महाविद्यालयातर्फे महिला आर्थिक सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या गृहविज्ञान महाविद्यालय व कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा) परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि १० ते १३ मार्च दरम्‍यान दैठणा येथे शेतकरी महिलांचे जीवनमान उंचावण्‍यासाठी आर्थिक सक्षमीकरणयावर चार दिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न झाले. महिलांनी स्‍वत: अर्थाजन करून पैशांची बचत करणे व कुटुंबाचे जीवनमान उंचावणे हा या प्रशिक्षणाचा मुख्‍य उद्देश आहे. या प्रशिक्षणासाठी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी शुभेच्‍छा दिल्‍या. या प्रशिक्षणात मातांनी बालकांची काळजी घेणे, बांधणी तंत्राने कपडा रंगविण्‍याची कला, शेतकरी महिलांचे काबाडकष्‍ट कमी करण्‍याचे तंत्रज्ञान, पुष्‍पगुच्‍छ, पुष्‍पगाली व रिबन बॅजेस तयार करण्‍याचे प्रात्‍यक्षिकासहित मार्गदर्शन केले. यात ५० शेतकरी महिलांनी अधिकृतरित्‍या नोंदणी करूनही त्‍यापेक्षा अधिक महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या प्रशिक्षणात प्रात्‍यक्षिकेव्‍दारे मार्गदर्शन केल्‍यामुळे ज्ञान व कौशल्‍य वृध्दिंगत झाल्‍याचे मनोगत सहभागी प्रशिक्षणार्थींनी व्‍यक्‍त केले. प्रशिक्षणाच्‍या समारोपीय कार्यक्रमात कुलसचिव डॉ दिनकर जाधव व प्राचार्या प्रा विशाला पटनम यांनी मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थींना प्रशस्‍तीपत्र वितरित करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी आयोजक प्राचार्य प्रा विशाला पटनम यांच्‍या मार्गदर्शनात प्रा निता गायकवाड, डॉ जयश्री झेंड, संगीता नाईक, रेशमा शेख व मंजुषा रेवणवार आदींनी परिश्रम घेतले.