Pages

Thursday, April 16, 2015

सघन लागवड फळबागेत सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍याचा संतुलित वापर करा....... कृषि शास्‍त्रज्ञ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांची झरी येथे फळबागेस भेट
मराठवाड्यातील बरेच शेतकरी अधिक उत्‍पादनासाठी फळबागेत सघन लागवड पध्‍दतीचा अवलंब करीत आहेत. सदरिल फळबागेत सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍यांचे योग्‍य व्‍यवस्‍थापन न केल्‍यास फळपीकांमध्‍ये समस्‍या निर्माण होत आहेत. झरी येथील प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री सुर्यकांतरावजी देशमुख यांच्‍या पेरु व मोसंबी बागेस दि. १४ एप्रिल रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या नेतृत्‍वाखाली फळबाग शास्‍त्रज्ञ डॉ. ए एस कदम, वनस्‍पती विकृतीशास्त्रज्ञ डॉ. जी. पी. जगताप, फळबागतज्ञ प्रा. बी. एम. कलालबंडी व संशोधन सहाय्यक डॉ. चव्‍हाण व श्री राम शिंदे यांनी भेट दिली.
    सदरिल फळबागेतील पेरु पिकाची १८ महिन्‍याचे ललित या वाणाची सधन लागण पध्‍दतीने ३ x ३ मीटर अंतरावर लागवड करण्‍यात आलेली असुन काही झाडांचे पान लाल होऊन कालांतराने झाड वाळत असलेले आढळले. ही समस्‍या जमिनीच्‍या सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍यांच्‍या  कमतरतेमुळे होते असल्‍याच्‍या शास्‍त्रज्ञांनी निदान केले. यामध्‍ये मुख्‍यत: जस्‍त अन्‍नद्रव्‍याची कमतरता कारणीभूत असुन जमिनीच्‍या सामु ८.५ टक्‍के पेक्षा अधिक असणा-या जमीनीत या प्रकारची समस्‍या मोठ्या प्रमाणात आढळते. यासाठी उपाययोजना म्‍हणुन ५० ग्रॅ. झिंक सल्‍फेट अधिक २५ ग्रॅ. कळीचा चुना एकत्र करुन फवारणी करण्‍याचा सल्‍ला शास्‍त्रज्ञांनी दिला. तसेच जमीनीतून जस्‍त, तांबे, बोरॉन व लोह एकत्रीत सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍य प्रति झाड देण्‍याबाबत मार्गदर्शन केले. झाडांची मर थांबण्‍यासाठी कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड ३० ग्रॅ. प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळून प्रभावीत झाडाभोवती आळवणी करणे व झाडावरील फळांची विरळणी करण्‍याचे मार्गदर्शन केले.