Pages

Wednesday, April 29, 2015

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ही एक ज्ञानरूपी संस्था होती....... मा. न्या. सी एल थुल

वनामकृवित कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाच्‍या वतीने महात्‍मा ज्‍योतीबा फुले व भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या संयुक्‍त जयंती महोत्‍सव निमित्‍त व्‍याख्‍यान कार्यक्रम संपन्‍न
मार्गदर्शन करतांना राज्‍य अनुसुचित जाती जमाती आयोगाचे अध्‍यक्ष मा न्‍या सी एल थुल
महात्‍मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे पुजन करतांना 
भारतीय संविधानाचे शिल्‍पकार भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदे, अर्थशास्‍त्र, शेतक-यांचे प्रश्‍न, स्‍त्री सबलीकरण, लोकसंख्‍या, वीज व धरण निर्मिती, कामगारांचे प्रश्‍न अशा विविध क्षेत्रात कार्य केले, ते एक ज्ञानरूपी संस्‍थाच होती, त्‍यांच्‍या कार्याची दखल घेत कोलंबिया विद्यापीठातर्फे डॉ आंबेडकरांना जगातील शंभर विद्वांनाच्‍या यादीत प्रथम क्रमांक देऊन गौरविण्‍यात आले, असे प्रतिपादन राज्‍य अनुसुचित जाती जमाती आयोगाचे अध्‍यक्ष मा न्‍या सी एल थुल यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघच्‍या वतीने महात्‍मा ज्‍योतीबा फुले व भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या संयुक्‍त जयंती महोत्‍सव निमित्‍त दि २८ एप्रिल रोजी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु होते तर केंद्रीय मजुर युनियनचे सरचिटणीस मा जे एस पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, महासंघाचे अध्‍यक्ष डॉ जी के लोंढे, महासंघाचे सचिव प्रा ए एम कांबळे यांची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मा न्‍या सी एल थुल पुढे म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर निर्मीत संविधानामुळेच आज देशाचा कारभार चालु आहे. संविधानातील समता, स्‍वातंत्र्य, बंधुता व न्‍याय आदींमुळे भारतीय समाज एक संघ आहे. कामगारांच्‍या प्रश्‍नावर त्‍यांनी मोठे कार्य केले असुन देशाच्‍या आर्थिक विकासाकरीता कामगारांच्‍या कौशल्‍य वृध्‍दीसाठी त्‍यांनी प्रयत्‍न केले. श्रमाचे विभाजन करणारी जाती व्‍यवस्‍थेमुळेच श्रमिकांवर अन्‍याय होतात, असे त्‍यांनी सांगितले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचारांचे जीवनात आचरण करण्‍याचा सल्‍ला यावेळी त्‍यांनी दिला.
केंद्रीय मजुर युनियनचे सरचिटणीस मा जे एस पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या विचार व कार्यामुळेच मजुरांच्‍या संघटना निर्मिण झाल्‍या असुन या संघटना अधिक मजबुद करणे गरजेचे आहे. 
अध्‍यक्षीय समारोपीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशाच्‍या घटनेचा अभ्‍यास केला, पंरतु भारतीय परिस्थितीस अनुकूल अशी एक मजबुद संविधान तयार केले असुन त्‍याचा मुलभुत ढाचा कोणीही बदलु शकत नाही. घटनेमुळे देशातील कमजोर समाजास एक संरक्षण प्राप्‍त झाले आहे. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रामप्रसाद खंदारे व प्रा पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा निता गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी महासंघाच्‍या सर्व पदाधिकारी व सदस्‍यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाच्‍या कार्यालयाचे उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तसेच शैक्षणिक व क्रीडा स्‍पर्धे वि‍शेष प्राविण्‍या प्राप्‍त विद्यापीठातील कर्मचा-यांच्‍या पाल्‍याचा गुणगौरव मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु
मार्गदर्शन करतांना केंद्रीय मजुर युनियनचे सरचिटणीस मा जे एस पाटील