Pages

Saturday, July 4, 2015

तुरीवरील खोडमाशीचे वेळीच व्‍यवस्‍थापन करा.....विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले


मागील वर्षी तुरीला मिळालेल्‍या चांगल्‍या भावामुळे व यावर्षी आजपर्यंत झालेल्‍या कमी पावस पहाता तुर लागवडीकडे शेतक-यांचा कल वाढलेला दिसतो. विशेषत: ज्‍या शेतक-यांकडे पाण्‍याची उपलब्‍धता आहे अशांनी पुर्व हंगामी तुरीच ब-याच भागात लागवड केली आहे. सद्यस्थितीत बहुतेक ठिकाणी तुरीची शेंडे जळालेली किंवा करपलेली दिसुन येत असुन  शेतक-यांचा असा समज दिसतो की, कमी पावसामुळे अथवा वापरलेल्‍या काही खतांमुळे मर रोग दिसत आहे. परंतु सनपुरी (ता. जि. परभणी) शिवारातील शेतकरी नरेश शिंदे यांच्‍या शेतावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या समवेत कृषि विद्यावेत्‍ता प्रा. बी. एन. आगलावे, पिक रोग शास्‍त्रज्ञ प्रा. पी. एच. घंटे व किटकशास्‍त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांच्‍या चमूने भेट दिली असता, या ठिकाणी तुरीमध्‍ये खोडमाशी या किडीचा प्रादुभार्व दिसुन आला असुन ७० ते ८० टक्‍के झाडे प्रादुर्भावग्रस्‍त दिसुन आली आहेत. या किडीची मादी खोडावर स्‍वत: केलेल्‍या खाचेत अंडी घालते. अशा अंड्यातुन पिवळसर रंगाची अळी निघुन ती खोड पोखरुन आत शिरते. कोवळे खोड पोखरल्‍यामुळे रोपाचा शेंड्याकडील भाग वाळुन जातो. यामुळे झाडाच्‍या वाढीवर विपरीत परिणाम होऊन झाडास फुले व कळ्या कमी लागतात. पीक उगवल्‍यानंतर एक महिन्‍याच्‍या आत या किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्‍यास खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. सततचे आर्द्र वातावरण व कमी पाऊस या किडीच्‍या वाढीस पोषक असुन शेतक-यांनी वेळीच उपायायोजना करणे गरजेचे आहे. अश्‍या वेळी किडग्रस्‍त झाडे, फांद्या आतील किडीसह उपटुन नष्‍ट करावीत व पीकाची विरळणी करावी. प्रादुर्भाव जास्‍त असल्‍यास जमिनीतुन फोरेट १० टकके दाणेदार १ किलो अथवा क्‍लोरॅनट्रानीलिप्रोल ०.४ टकके दाणेदार (फरटेरा) १० किलो प्रति हेक्‍टरी जमिनीत ओल असतांना टाकावे किंवा ट्रायझोफॉस ४० टकके प्रवाही २० मि.ली. किंवा थायमि‍थोक्‍झाम २५ टक्‍के प्रवाही २ ग्रॅम किंवा अॅसिफेट ७५ टक्‍के पाण्‍यात मिसळणारी पावडर २० ग्रॅम १० लिटर पाण्‍यात मिसळुन साध्‍या पंपाने फवारावे. पावर पंपाकरीता किटकनाशकाची मात्रा तीन पट करावी. जेणे करुन किडीच्‍या प्रादुर्भवामुळे होणारे नुकसान टाळता येईल, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी केले आहे.