Pages

Tuesday, August 4, 2015

बाल विकास व शिक्षण केंद्राचे व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्याससक्रमाचा शुभारंभ


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास विभागातर्फे दि ३ ऑगस्‍ट ते ३ नोव्‍हेंबर या तीन महिने कालावधीत बाल विकास व शिक्षण केंद्राचे व्‍यवस्‍थापन या प्रमाणपत्र अभ्‍यासक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन अभ्‍यासक्रमाचे उद्घाटन दि ३ ऑगस्‍ट रोजी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी प्राचार्य प्रा विशाला पटणम, डॉ रम्‍मना देसेट्टी, डॉ जया बंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

   उद्घाटनपर भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, आजचे बालक हे उद्याचे नागरिक असुन त्‍यांच्‍या विकासात पालक व‍ बालशिक्षकाची भुमिका महत्‍वाची आहे. शास्‍त्रोकरीत्‍या बालसंगोपनाचे महत्‍त्‍व लक्षात घेऊन समाजाच्‍या गरजेनुसार या अभ्‍यासक्रमाची आखणी करण्‍यात आली असुन राष्‍ट्रीय पातळीवर नावलौकीक प्राप्‍त झालेल्‍या विभागामार्फत राबविल्‍या जात, याचा प्रशिक्षणर्थ्‍यांना निश्चितच लाभ होणार असे सांगुन प्रमुख समन्‍वयीका प्राचार्या प्रा विशाला पटणम यांच्‍या नेतृत्‍वाखाली तयार करण्‍यात आलेल्‍या अभ्‍यासक्रमाबाबत त्‍यांनी प्रशंसा केली.

   या तीन दिन महिन्‍याच्‍या अभ्‍यासक्रमाचा उद्देश्‍य उत्‍कृष्‍ट पालक व बालशिक्षक निर्माण करणे हा असुन या अभ्‍यासक्रमाव्‍दारे प्रशिक्षणार्थींना दर्जेदार बाल विकास व शिक्षण केंद्र जसे की, पाळणाघर, प्‍ले स्‍कुल, नर्सरी स्‍कुल, किन्‍डर गार्डन, बाल विकास केंद्र, पुर्व प्राथमिक शाळा, बाल छंद वर्ग आदी सुरू करण्‍यासाठी किंवा अश्‍या केंद्रात संगोपक शिक्षकांची नौकरी करून अर्थार्जन करण्‍यासाठी सक्षम केले जाणार आहे. यावेळी प्राचार्या प्रा विशाला पटणम लिखित प्रायोगिक पुर्व प्राथमिक शाळेच्‍या दर्जेदार माहितीघडीपत्रिकेचे विमोचन कुलगुरूंच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. सदरिल कार्यक्रमात प्राचार्य प्रा विशाला पटणम यांनी बाल विकास व शिक्षणाचा दर्जा उंचावण्‍याची गरज यावर मार्गदर्शन केले. डॉ रम्‍मना देसेट्टी यांनी उत्‍तेजनात्‍मक वातावरणातुन बालविकास कसा घडवावा याविषयी तर डॉ जया बंगाळे यांनी बालकांच्‍या विकासात्‍मक गरजा व‍ त्‍यांची पुर्तता या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विभागाच्‍या प्राध्‍यापीका, प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उ‍पस्थित होते.