Pages

Sunday, October 4, 2015

गावपातळीवर शेतक-यांनी स्‍वत:ची बियाणे बॅक विकसीत करावी......संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर

हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रमातंर्गत शेतकरी मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पातंर्गत हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रमाच्‍या वतीने दिनांक ३० सप्‍टेंबर रोजी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर हे होते तर प्रगतशील शेतकरी श्री विठलराव पारधे, श्री. ज्ञानोबा पारधे, सहयोगी संचालक (बियाणे), डॉ. ही. डी. सोळंके, डॉ. डब्‍ल्‍यु. एन. नारखेडे, डॉ. ए. एस. कडाळे व डॉ. बी. व्‍ही. आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
   अध्‍यक्षीय भाषणात संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, कोरडवाहु शेतीत स्‍थैर्य आणण्‍यासाठी शेतकरी बांधवानी सामुहिक प्रयत्‍न करणे गरजेचे असुन पारंपारीक पिकासोबतच शेवंगा, हदगा, कडीपत्‍ता या बाजारात मागणी व मुल्‍य भाव असणा-या पिकांची लागवड करावी, शेतकरी बांधवांनी विद्यापीठ विकसीत बियाण्‍याचा वापर करून गावापातळीवरच स्‍वतःची बियाणे बॅंक विकसीत करावी, असा सल्‍लाहि त्‍यांनी दिला.
   बाभुळगांव येथील प्रगतशील शेतकरी श्री गिरीष पारधे आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, कोरडवाहु शेती यशस्‍वी करण्‍यासाठी उपलब्‍ध साधनसामुग्रीचा कार्यक्षम वापर, पीक पध्‍दतीतील बदल, पीक फेरपालट, आंतरपिक पध्‍दती, एकात्मिक अन्‍नद्रव्‍ये व्‍यवस्‍थापन, बीबीएफ व सरी वरंबा तंत्रज्ञान, ठराविक ओळीनंतर सरी काढणे, फवारणीतुन अन्‍नद्रव्‍यांचा वापर, विहीर पुनर्भरण, कुपनलिका पुनर्भरण, संरक्षित पाण्‍याचा वापर, शेततळे व त्‍यांचे व्‍यपस्‍थापन आदी विविध तंत्रज्ञान हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतकरी बांधवानी आत्‍मसात केले असुन उत्‍पादनात स्थिरता आणण्‍यात यश मिळविले आहे, असे अनुभव कथन केले.
   कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. बी. व्‍ही. आसेवार यांनी योजनेचे उदे्दश व स्‍वरूप विशद करून शेतकरी बांधवानी रब्‍बी हंगामात वेळेवर पेरणी करून  उपलब्‍ध ओलाव्‍याचे कार्यक्षम व्‍यवस्‍थापन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन डॉ. आनंद गोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. एम.एस. पेंडके यांनी केले.
   या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसीत बियाण्‍याचे व खताचे वाटप करण्‍यात आले. यात हरभरा (आकाश, विजय), रब्‍बी ज्‍वारी (परभणी मोती, परभणी ज्‍योती व मालदांडी), करडई (परभणी १२) आदी बियाणे वितरीत करण्‍यात आले. तांत्रिक सत्रात डॉ. आनंद गोरे यांनी रब्‍बी पीक व्‍यवस्‍थापनाबदल तर प्रा. मदन पेंडके यांनी कुपनलिका पुनर्भरण, शेततळयांची निगा व देखभाल, सं‍रक्षित सिंचन यावर मार्गदर्शन केले. यावेळी शिवार फेरीचेही आयोजनही करण्‍यात येऊन शेतकरी बाधवांनी कोरडवाहु ती संशोधन प्रकल्‍पाच्‍या विविध संशोधन प्रयोगांना भेटी दिल्‍या. यात पावसाचे खंड व्‍यवस्‍थापनावर आच्‍छादनाचा वापर व पोटॅशियम नायट्रेट फवारणीचे प्रयोगातील कपाशीची वाढ चांगली दिसुन आली. 
   मेळाव्‍यास मौजे बाभळगांव येथील शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी बांभुळगांव येथील श्री गिरीष पारधे, श्री विष्‍णु दळवे, श्री ओमप्रकाश दळवे, ज्ञानोबा पारधे आदींसह डॉ. मेघा सुर्यवंशी, डॉ. गणेश गायकवाड, श्रीमती सारीका नारळे, श्री. माणिक संमिद्रे, श्री सयद, श्री चतुर कटारे, श्री भंडारे आदींनी परीश्रम घेतले.
  सदर हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रम कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांचे मार्गदर्शनाखाली परभणी तालुक्‍यातील मौजे बाभळगांव येथे गेली तीन वर्षापासुन यशस्‍वीपणे राबविण्‍यात येत असुन या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन हवामान बदलानुरूप तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवाना उपयोग होतांना दिसुन येत आहे.