Pages

Tuesday, December 29, 2015

जय किसान जय विज्ञान सप्ताहाची सांगता व ग्राम ज्ञानगंगा कार्यक्रमाचे आयोजन

कृषि विद्यापीठ विविध माध्‍यमाव्‍दारे कृषि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविते आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणुन सार्वजनिक - खाजगी भागीदारी तत्‍वावर रिलायंस फाउंडेशनशी सामजंस्‍य करार केला असुन अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचत आहे, याचा लाभ जास्‍तीस जास्‍त शेतक-यांनी घ्‍यावा. विद्यापीठाच्‍या कृषि विस्‍तार अधिक प्रभावी करण्‍यासाठी शेतक-यांनी अभिप्राय द्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने माजी पंतप्रधान माननीय चौधरी चरणसिंह यांची जयंती व माननीय अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवसानिमित्‍त २३ ते २९ डिसेंबर दरम्‍यान जय किसान जय विज्ञान सप्‍ताहांतर्गत विविध गावात गटचर्चा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्‍यात आले होते, या सप्‍ताहाची सांगता तसेच उद्योजक स्‍व. श्री धीरूभाई अंबानी यांच्‍या जयंतीनिमित्‍त वनामकृवि व रिलांयस फाउंडेशन माहिती सेवा यांचे संयुक्‍त विद्यमाने ग्राम ज्ञानगंगा कार्यक्रमातंर्गत शेतक-यांसाठी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक २९ डिसेंबर रोजी करण्‍यात आले होते, या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव श्री डी एस कच्छवे, रीलायंस फाउंडेशनचे विभागीय समन्‍वयक श्री दिपक केकान, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, बदलत्‍या वातावरणात शेतक-यांनी विद्यापीठाच्‍या कमी खर्चीक तंत्रज्ञानाचा वापर करावा. एकाच जमिनीत एकचएक पिक न घेता पिकांची फेरपालट करण्‍याचा सल्‍ला देऊन वॉटर बजेट ची संकल्‍पना मांडली. कार्यक्रमात विस्‍तार शिक्षण संचालनालय व रिलायंस फाउंडेशन निर्मीत हुमणी किडीचे व्‍यवस्‍थापन या विषयावर आधारित चित्रफितीचे विमोचन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. प्रगतशील शेतकरी श्री मदन महाराज, श्री पांडुरंग गलबे, श्री नरेश शिंदे आदींनी आपले मनोगत यावेळी व्‍यक्‍त केले.
तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ यु एन आळसे, प्रा डि डि पटाईत, प्रा प्रल्‍हाद जायभाये, प्रा मुंढे व  पशु वैद्यकिय अधिकारी डॉ कादरी आदींनी विविध विषयांवर शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक श्री दिपक केकान यांनी केले तर सुत्रसंचालन श्री नरेश डंबाळे व आभार प्रदर्शन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यक्रमास परभणी व जालना जिल्‍हातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.