वनामकृवित अखिल भारतीय अन्नशास्त्र ज्ञ व तंत्रज्ञच्या चौव्वीसाव्या परिषदेचे उद्घाटन
कृषि अन्न प्रक्रिया औद्योगिक प्रदर्शनीचे उद्घाटन करतांना परभणीचे खासदार मा श्री संजय जाधव व इतर
|
वनामकृवित अखिल भारतीय अन्नशास्त्र ज्ञ व तंत्रज्ञच्या चौव्वीसाव्या परिषदेच्या स्मरणिकेचे विमोचन करतांना मान्यवर |
देश अन्नधान्यात स्वयंपुर्ण झाला परंतु कुपोषणाचा प्रश्न आजही
आहे, मनुष्याच्या चांगल्या आरोग्यसाठी अन्न पोषण सुरक्षेची गरज
असुन शेतक-यांसह अन्न शास्त्रज्ञ व अन्न प्रक्रिया उद्योग आदींना कार्य करावे
लागेल, असे प्रतिपादन म्हैसुर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान व संशोधन
संस्थाचे संचालक मा. प्रा. राम राजशेखरन यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठांतर्गत असलेल्या अन्नतंत्र महाविद्यालय व म्हैसुर येथील अखिल भारतीय
अन्नशास्त्रज्ञ व तंत्रज्ञ मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १८ व १९ डिसेंबर
रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय अन्नशास्त्रज्ञ व तंत्रज्ञांच्या चौव्वीसाव्या
परिषदेचे (फीस्ट २०१५) आयोजन करण्यात आले असुन दिनांक १८ डिसेंबर रोजी उद्घाटनप्रसंगी ते
बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन मुंबई
येथील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष मा
श्री शंतनु भडकमकर, म्हैसुर येथील अखिल भारतीय अन्नशास्त्रज्ञ व तंत्रज्ञ मंडळाचे
अध्यक्ष डॉ प्रतापकुमार शेट्टी यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर शिक्षण संचालक
डॉ अशोक ढवण, प्रा सुधीर वालदे, प्राचार्य प्रा. पी. एन. सत्वधर, प्रा. दिलीप मोरे यांची
प्रमुख उपस्थिती होती.
संचालक मा. प्रा. राम
राजशेखरन पुढे म्हणाले की, देशात भाजीपाला व फळाचे उत्पादन मोठया प्रमाणात होत असुन
खाद्यतेलात आजही आपण पिछाडीवर आहोत. देशातील शेतकरी हाच अन्न प्रक्रिया
प्रणालीतील प्राथमिक उत्पादक असुन एक महत्वाचा दुवा आहे, शेतक-यांच्या आर्थिक
विकासाकरिता त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय भाषणात
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु म्हणाले की, देश अन्नधान्य उत्पादनात
स्वयंपुर्ण झाला, परंतु अन्नधान्याची नासाडीचे प्रमाण मोठे आहे. त्यासाठी अन्न
प्रक्रिया उद्योगाचा विकास होणे गरजेचे आहे. देशातील कुपोषणामुळे ३० टक्के
बालकांच्या शारिरीक विकासावर परिणाम होतो, अन्न सुरक्षेसह अन्न पोषण सुरक्षा महत्वाची आहे. सकस आहारासाठी
सकस अन्नधान्य पिकवावे लागेल, त्यासाठी शेतक-यांची उत्पादक म्हणुन महत्वाची भुमिका राहणार
आहे. देशात संतुलित आहार निर्मितीसाठी अन्नशास्त्रज्ञांनी प्रयत्नशील असावे, असा सल्ला त्यांनी दिला.
मुंबई येथील महाराष्ट्र
चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष मा श्री शंतनु भडकमकर
म्हणाले की, संपुर्ण जग भारताच्या विकासाकडे पाहत असुन देशाच्या विकासात
शेतक-यांचा महत्वाचा वाटा आहे. दोन दिवस चालणा-या परिषदेतील शिफारसींचा उपयोग
धोरणकर्त्यांना होणार आहे. अन्न प्रक्रिया उद्योजगताच्या शेतक-यांकडुन कोणत्या
प्रकारच्या शेतमालाची अपेक्षा आहेत हे या प्रकारच्या परिषदेमुळे पुढे येतील, अशी अपेक्षा डॉ
प्रतापकुमार शेट्टी यांनी व्यक्त केली. शेतमाल मुल्यवर्धनाच्या माध्यमातुन
शेतक-यांचे सक्षमीकरण शक्य असल्याचे शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी सांगितले
तर प्राचार्य प्रा पी एन सत्वधर यांनी परिषदेचे महत्व विषद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
प्रा दिलीप मोरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ स्मिता खोडके यांनी तर आभार प्रदर्शन
उद्योजक श्री महंमद गौस यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठ कार्यकारणी परिषदेचे
सदस्य मा श्री रविंद्र देशमुख, मा श्री गोंविदराव देशमुख, मा डॉ पी आर शिवपुजे, विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव
आदीसह प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी, शास्त्रज्ञ मोठया संख्येने
उपस्थित होते.
सदरिल परिषदेचे म्हैसुर
केंद्रिय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था व डिफेन्स फुड रिसर्च लॅबोरॉटरी सह-आयोजक असुन यानिमित्ताने
दिनांक १८ ते २० डिसेंबर दरम्यान आयोजित अन्नप्रक्रिया औद्योगिक प्रदर्शनीचे
उद्घाटन परभणीचे खासदार मा. संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेच्या
यशस्वीतेसाठी अखिल भारतीय अन्नशास्त्रज्ञ व तंत्रज्ञ मंडळाचे पदाधिकारी प्रा डि
डि वाडीकर, श्री बी बी बोरसे, आशुतोष इनामदार, श्री साखरे यांचे सहकार्य लाभेल. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते
मंडळाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतक-यांसाठी कार्य करणा-या नाम प्रतिष्ठानला
एक्कावन हजार रूपयाचा धनादेश प्रगतशील शेतकरी श्री कांतराव देशमुख यांना सुपूर्द करण्यात आला व उद्योजक शेतक-यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात
आला. मंडळाच्या वतीने देणात येणा-या युवा अन्नशास्त्रज्ञ व अन्नशास्त्रातील
पदव्युत्तर विद्यार्थींना पारितोषिके वितरित करण्यात आले. परिषदेच्या तांत्रिक सत्रात
देशातील दीडशे पेक्षा जास्त अन्न शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ सहभागी होणार असुन ते
अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषयावर विचारमंथन करणार आहेत.