वनामकृविच्या
निदान चमुची फळबागांना भेट देऊन केले उपाय योजनेबाबत मार्गदर्शन
सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगांव व परिसरात मोठया प्रमाणावर संत्रा व मोसंबीच्या बागा आहेत, सलग दोन वर्ष कमी पाऊस झाल्यामुळे विहीर, बोअरचे पाणी संपले असुन फळबागांना पाण्याची कमतरता भासत आहेत. अशा परिस्थितीत किड व रोगांचाही प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या चमुने या भागातील फळबागांना प्रत्यक्ष भेट देऊन रोग व किडीचे निदान करुन शेतक-यांना मार्गदर्शन केले. या चमुत विस्तार कृषिविदयावेत्ता डॉ.यु.एन.आळसे, वनस्पती विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॅा.के.टी. आपेट, उदयानविदया शास्त्रज्ञ डॉ.एस.जे.शिंदे, किटकशास्त्रज्ञ प्रा.डी.डी.पटाईत आदींचा समावेश होता. या चमुने जिजाभाऊ सोळंके, बापु सोळंके, अमृता सोळंके, दादाराव सोळंके, गोविंदराव जोशी यांच्या संत्रा व मोसंबी बागेस भेट दिली असता त्या ठिकाणी बरचशे झाडे पिवळी पडलेली दिसुन आली, त्या ठिकणी शास्त्रज्ञांनी निरीक्षण केले असता सदर झाडावर जमिनीलगत साल पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसुन आला तसेच त्या ठिकाणी बुरशीची वाढ आढळुन आली व ब-याचशा झाडावर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव ही मोठया प्रमाणावर दिसुन आला. श्री गोविंदराव जोशी यांच्या शेतातील संत्रा बागेस भेट दिली असता त्या ठिकाणी झाडाच्या जुन्या फांदयावर खुप मोठया प्रमाणावर साल पोखरणा-या किडींचा प्रादुर्भाव दिसुन आला, त्यामुळे झाडांच्या फांदया मोठया प्रमाणात वाळतांना दिसत आहेत तसेच या बागेत डायबॅक रोगही दिसुन आला. यावेळी शास्त्रज्ञांनी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना किडींने प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या जुन्या फांदया काढुन टाकण्यास सांगुन ज्या ठिकाणी मुख्य खोंडाला किडीचा प्रादुर्भाव असेल त्या ठिकाणी डायक्लोरोव्हास 10 मिली 10 लिटर पाण्यात टाकुन किटकनाशक झाडाला झालेल्या छिद्रामध्ये भरुन छिद्र मातीने अथवा शेणाने लिपुन घ्यावे तसेच डिंक्या झालेल्या ठिकाणी बोर्डोपेस्ट लावावी व झाडाला कॉपर ऑक्झोक्लोराइडची आळवणी करावी जेणे करुन रोगांचे व्यवस्थापन करावे तसेच झाडांना पाणी देतांना पाणी खोडाला लागु देउु नये ही काळजी घ्यावी.
सध्या पाण्याच्या कमतरतेमुळेही बरीचशी झाडे मरु लागली आहेत अशा ठिकाणी झाडांना लागलेली 50% फळे व पाने व फांदयाची 25 ते 30 % विरळणी करावी. जमिनीलगत गवताचे, भुश्याचे अथवा प्लास्टीकचे आच्छादन करावे. केओलीन (8%) बाष्परोधक किंवा पोटॅशियम नायट्रेटची (1%) फवारणी करावी. सदरिल फवारणी मार्च ते मे महिन्यात 15 दिवसाचे अंतराने करावी, बागेच्या दक्षिण-पश्चिम बाजुस वारारोधकाची लागवड करावी. चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करु नये. लागवड केलेली असल्यास प्रति झाड 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा + 15 मि.ली अझॅटोबॅक्टर + 15 मि.ली स्फुरद विद्राव्य जिवाणू बहाराच्या वेळी दयावे. तसेच 0.5 % लोह 0.5 टक्के जस्त व 0.2 टक्के बोरॉनची एक ते दिड महिन्याच्या अंतराने मार्च ते मे दरम्यान फवारण्या कराव्यात. पाणी कमी असल्यास अंबिया बहार धरु नये. झाडाच्या बुंध्याला 10 % बोर्डोपेस्ट फेब्रुवारी महिन्यात लावावे. अशा उपाय योजना बाग जगवण्यासाठी कराव्यात असा सल्ला विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला.
टिप - सदरिल बातमी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणीचे केंद्र व्यवस्थापक यांच्या कडुन ईमेल व्दारे प्राप्त