Pages

Tuesday, February 9, 2016

शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या थोपवण्‍यासाठी सामुदायीक प्रयत्‍नांची गरज..........अर्थतज्ञ मा. प्रा. एच. एम. देसरडा

वनामकृवितील कृषि महाविद्यालयाच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांशी साधला संवाद

आज शेतकरी हतबल झाला आहे, कर्जाच्‍या डोंगराखाली आत्‍महत्‍याकडे रेटला जात आहे, हे थोपवण्‍यासाठी सामुदायीक प्रयत्‍नांची गरज आहे. दुष्‍काळ निर्मुलन आणि शाश्‍वत शेतीचा विकास हा लोकसहभागाशिवाय शक्‍य होणार नाही, यासाठी कृषि पदवीधरांनी योगदान दयावे, असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍य दुष्‍काळ निवारण व निर्मुलन मंडळाचे उपाध्‍यक्ष तथा प्रसिध्‍द अर्थतज्ञ मा. प्रा. एच. एम. देसरडा यांनी केले. शेती-पाणी-रोजगार संवाद यात्रेच्‍या निमित्‍त दिनांक 8 फेब्रुवारी रोजी कृषि महाविद्यालयाच्‍या वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृहात आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, श्री के. . हरिदाससौ. शंकुतला देसरडा, श्री साथी रामराव जाधव, श्रीराम पाटील, डॉ. बी. आर. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
          अर्थतज्ञ मा. प्रा. एच. एम. देसरडा पुढे म्‍हणाले की, संघटीतपणे गावपातळीवर पाणी आडवा, पाणलोट क्षेत्र विकास, समुचित पिक संयोजन यातुन शाश्‍वत शेती विकास व उत्‍पादन वाढ तसेच नैसर्गीक संकटात सुलभ विमा योजना यामार्गे शेतक-यांना चांगले जीवनमान गाठता येईल. मराठवाड्यात कोरडवाहु शेती उत्‍पादन अत्‍यंत कमी असुन ज्‍वारीसारखी पिके नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन घटत्‍या व साठवलेल्‍या ओलीवर घेणे आवश्‍यक आहे. त्‍याच बरोबर शेतीमध्‍ये कमीत कमी बाह्य निविष्‍ठांचा वापर करुन शाश्‍वत शेती करणे काळाची गरज आहे. शेतीमध्‍ये श्रम करणा-यांना समाजासह कृषि पदवीधरांनी प्रोत्‍साहन देणे आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन त्‍यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य  डॉ. डी. एन. गोखले यांनी केले. सुत्रसंचलन वसतीगृह अधिक्षक डॉ. बाबासाहेब  ठोंबरे यांनी तर आभार प्रदर्शन स्‍पर्धा मंच अध्‍यक्ष श्री कृष्‍ण वारकड यांनी केले.  कार्यक्रमास डॉ. विश्‍वनाथ खंदारे, डॉ. आनंद गोरे, डॉ. राजेश महाजन आदिसह पदव्‍युत्‍तर विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होतेसंवाद कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रकाश ठाकरे, बालाजी बोबडे, मधुकर मांडगे आदिसह स्‍पर्धा मंचाच्‍या सदस्‍यांनी परिश्रम घेतले.