Pages

Wednesday, March 23, 2016

वनामकृवित ‘हवामान बदलामुळे जैविक व अजैविक ताणाच्या दुष्टीने शेती पिकांचे पैदास’ याविषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

दोन दिवसीय परिसंवादात देशातील तीनशेपेक्षा जास्‍त शास्‍त्रज्ञ व विद्यार्थ्‍यी संशोधक करणार विचारमंथन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयातील कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभाग व नवी दिल्‍ली येथील अखिल भारतीय अनुवंश व पैदासशास्‍त्र संस्था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २८ व २९ मार्च दरम्‍यान हवामान बदलामुळे जैविक व अजैविक ताणाच्‍या दुष्‍टीने शेती पिकांचे पैदासयाविषयावर राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले असुन परिसंवादाचे उद्घाटन दिनांक २८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. वाय. एस. नेरकर यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे राहणार असुन महात्‍मा फुले कृ‍षी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथ व नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. के. आर. क्रांती यांची प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थिती लाभणार आहे. शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले व प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदरिल दोन दिवसीय परिसंवादात देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडु, तेलंगाणा, गुजरात, हरियाणा, महाराष्‍ट्र आदी राज्‍यातुन तीनशे पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी संशोधक सहभागी होणार आहेत. देशातील व राज्‍यातील हवामान बदल व दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर सदरिल परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले असुन अन्‍न सुरक्षाकरिता हवामान बदलाचा शेतीवरील परिणाम कमी करण्‍यासाठी भविष्‍यात कृषी संशोधनातील प्राधन्‍यक्रम ठरविणे व कृती आराखडा निश्चित करण्‍यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले आहे. पिकांतील ताण प्रतिकारकाचे अनुवंश, जैविक व अजैविक ताणावर मात करण्‍यासाठी पारंपारिक पैदासशास्‍त्र, मॉलेकुलार पैदास पध्‍दती, कृषीविद्या पध्‍दती, हवामान बदलाच्‍या संबंधाने वनस्पती अनुवंश संसाधन व्‍यवस्‍थापन व किड-रोग प्रतिकारकता आदी विषयावर देशभरातील शास्त्रज्ञ संशोधनपर लेख सादर करून विचारमंधन करणार आहेत. परिसंवादाचे आयोजन विभाग प्रमुख डॉ डि बी देवसरकर व संस्‍थेचे सचिव डॉ संजय सिंह यांच्‍या नेतृत्‍वाखाली करण्‍यात आले असुन यशस्‍वीतेसाठी विविध समित्‍याचे गठण करण्‍यात आले आहे.