Pages

Friday, April 1, 2016

महाराष्ट्राचे काळे सोने म्हणुन उस्मानाबादी शेळीचे संवर्धन होणे आवश्यक आहे.... कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू

मराठवाड्यातील शेळी मेंढी संगोपन : भविष्‍यवेध या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण संपन्‍न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि महाविद्यालयाचे पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत मराठवाड्यातील शेळी मेंढी संगोपन : भविष्‍यवेध या विषयावर शेतकरी पशुपालक, अधिकारी-कर्मचारी यांचे एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ३० मार्च रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू हे होते तर कार्यक्रमास संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. शर्मीला माजी, कृषी म‍हाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गिरीधर वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मराठवाड्यात प्रसिध्‍द असलेली उस्‍मानाबादी शेळी व्‍यवसाय हा अल्‍पभुधारक शेतकरी व कष्‍टक-यांना आर्थिक स्‍त्रोताचे महत्‍वाचे साधन असुन महाराष्‍ट्राचे काळे सोने म्‍हणुन उस्‍मानाबादी शेळीचे संवर्धन व वृध्‍दी होणे आवश्‍यक आहे. शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी शेतकरी पशुपालकांना शेतीशी निगडीत शेळी व मेंढी पालन करण्‍याचे आवाहन केले तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले यांनी आपल्‍या भाषणात चविष्‍ठ मांसासाठी प्रसिध्‍द असलेली उस्‍मानाबादी शेळी ही मराठवड्यासाठी वरदान असल्‍याचे सांगितले. प्रशिक्षणास मराठवाड्यातुन ८५ शेतकरी पशुपालकासह कृषि विभागाचे दहा अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 
प्रशिक्षणात शेळी मेंढी अनुवंश सुधारणा, शेळी पालनाचे अर्थशास्‍त्र, करडांचे संगोपन, शेळीपालन आणि भविष्‍यवेध, शेळीचे आरोग्‍य या विषयावर डॉ. धनंजय देशमुख, डॉ. माणिक धुमाळ, डॉ. एम. एफ. सिध्‍दीकी, डॉ. आनंदराव पवार, डॉ. रेणुकादास बारबिंड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. अनंत शिंदे तर आभार प्रदर्शन प्रा. दत्‍ता बैनवाड यांनी केले.  कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी डॉ. शंकर नरवाडे, प्रा. नरेंद्र कांबळे, श्री प्रभाकर भोसले, श्री माधव मस्‍के, श्री नामदेव डाळ आदीसह पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीचे विद्यार्थींनी परिश्रम घेतले.