Pages

Thursday, June 2, 2016

वनामकृविचे बाभुळगाव येथे कुपनलिका पुनर्भरण प्रात्‍यक्षिक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पामार्फत परभणी तालुक्‍यातील मौजे बाभुळगाव येथे शेतक-यांच्‍या शेतावर हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रम मागील तीन वर्षापासुन राबविण्‍यात येत आहे. या संशोधन केंद्राद्वारे कुप‍नलिका पुनर्भरण तंत्रज्ञान विकसीत केले असुन हे तंत्रज्ञान बाभुळगाव येथील ५ शेतक-यांच्‍या शेतावर शेतक-यांच्‍या सहभागातुन राबविण्‍यात येत आहे. या कुपनलिका पुनर्भरण कार्यक्रमाचा शुभारंभ दि. १ जुन रोजी मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार व सरपंच पारधे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी कुपनलिका पुनर्भरणाचे महत्‍व कृषि अभियंता प्रा. मदन पेंडके यांनी सागितले, कार्यक्रमास बाभुळगाव येथील शेतकरी व ग्रामस्‍त मोठया संख्‍येने उपस्थित होते. तसेच याप्रसंगी खरीप पुर्व नियोजन बैठकीचे आयोजन करण्‍यात येऊन येणा-या खरीप हंगामामध्‍ये संशोधनात्‍मक पिक प्रात्‍यक्षिक घेण्‍याकरीता सर्वानुमते शेतक-यांची निवड करून सदरिल शेतक-यांच्‍या यादीस सर्वांनी अनुमती दिली. सदरील कार्यक्रमास संशोधन केंद्राचे डॉ. गणेश गायकवाड, माणिक समिद्रे, अभिजीत कदम, प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्‍वर पारधे, गिरीष पारधे, दळवे प्रसाद, दळवे विठल, विकास साखरे हे उपस्‍थीत होते. 
   मागील वर्षी विद्यापीठाने बाभुळगाव येथील १० शेतक-यांच्‍या शेतावर विहीर पुनर्भरण कार्यक्रम रा‍बविला होता व सदरिल विहीरींना कमी पावसात देखील मुबलक पाणी उपलब्‍ध झाले. नुकतेच या विहीर पुनर्भरण उपक्रमास परभणीचे पालक सचिव मा. श्री. एस. एस. संधु तसेच निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री. अभिमंन्‍यु बोधवड, उप विभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार संतोष रूईकर, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. के. दिवेकर यांनी भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली.