Pages

Monday, June 6, 2016

रुंद वरंबा - सरी पद्धतीने सोयाबीन लागवड करताना लक्षात घ्यावयाच्या विविध गोष्टी

वनामकृविच्‍या कृषि अभियंताचे मार्गदर्शन

गतवर्षी मराठवाडयातील अनेक शेतक-यांनी सोयाबीनच्‍या अधिक उत्‍पादनासाठी रुंद वरंबा - सरी पद्धतीचा अवलंब करून सोयाबीन लागवड केली परंतु लागवड करतांना अनेक समस्‍याना तोंड द्यावे लागेल, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियंता प्रा भुईभार व प्रा टेकाळे यांनी सदरिल पध्‍दतीने लागवड करतांना कोणत्‍या गोष्‍टी लक्षात घ्‍याव्‍यात याबाबत पुढील मुद्दे शेतक-यांना उपयुक्‍त आहेत.



१) रुंद वरंबा - सरी लागवड अवजारामध्ये ३० ते ४५ सें. मी. अंतराच्या बदलासह चार फण आणि ३० ते ६० सें. मी. रुंदीच्या सरीच्या बदलासह १५० ते १८० सें. मी. अंतरावर दोन सरीचे फाळ देण्यात आलेले असतात. रुंद वरंब्यावर ४५ सें. मी. अंतराच्या चार ओळीकरिता १३५ सें. मी. अंतराची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत सरीचा फाळ ४५ सें. मी. रुंदीच्या सरीकरिता बदल केलेला असल्यास कडेच्या ओळींच्या बाजूला वरंबा निर्माण होणार नाही. तसेच, फाळांची रचना कदाचित ४५ सें. मी. पेक्षा जास्त झालेली असल्यास किंवा फणाचा व फाळांचा, अवजाराच्या रुंदीवर योग्य मध्य साधलेला नसल्यास, पेरणी दरम्यान वरंबा अपुऱ्या रुंदीचा निर्माण होतो. बियाणे भूपृष्ठावर अथवा कमी खोलीवर पडते. कमी ओलाव्याच्या स्थितीत अशा प्रकारे पडलेल्या बियाण्यांची उगवण होत नाही. रोपांची संख्या अपुरी राहते. म्हणून अशा रचनेच्या पेरणी करिता, सरीच्या फाळांची न्यूनतम (३० सें. मी.) रुंदीची सरी पाडण्याच्या दृष्टीने बदल करावा. 

२) रुंद वरंब्यावर ३० सें. मी. अंतरावरील पिकाच्या चार ओळीं करिता अवजाराच्या सरीच्या दोन्ही फाळांमधील अंतर १५० सें. मी. ठेवावे. यामुळे पेरणी दरम्यान, वरंब्यावर बियाणे योग्य खोलीवर पडेल. कडेच्या ओळीच्या बाजूला ७.५ सें. मी. चा वरंबा राहील, तसेच सरीची रुंदी ४५ सें. मी. राहील. अशा प्रकारच्या रचनेमध्ये ६० सें. मी. रुंदीच्या सरीच्या तुलनेत, अनुत्पादित जागेचे प्रमाणकमी राहील. (आकृती - १). 

३) सोयाबीन - तूर आंतरपीक पद्धती करिता रुंद वरंबा - सरी अवजाराच्या, चार फणांपैकी कडेचे फण सोडून, कोणत्याही एका फणाद्वारे तुरीसारख्या आंतरपिकाची पेरणी करणे साध्य होईल. याकरिता आंतरपिकाकरिता ठरविलेल्या बियाण्याच्या कप्प्यातील, बियाणे वितरण चकती, निवड केलेल्या आंतरपिकाशी संबंधित वापरावी. 

४) रुंद वरंबा - सरी लागवड पद्धतीमध्ये, ओळीमधील अंतराच्या तुलनेत, सरीकरिता जरीथोडे-अधिक क्षेत्र व्यापत असते, तरी या अधिकच्या मोकळ्या क्षेत्राचा, वरंब्यावरील कडेच्या दोन ओळीतील पिकांवर अनुकूल परिणाम होतो. पर्यायाने एकूण उत्पादनात वाढ होते. 

५) रुंद वरंबा - सरी लागवडपद्धतीमध्ये सरीने व्यापलेल्या क्षेत्रात, सरी कायम राखण्याच्या दृष्टीने आंतर मशागत करण्यात येत नसल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव होतो. याकरिता, पारंपारिक क्षेत्राप्रमाणे, सर्व क्षेत्रावर समसमान आंतरमशागत करून, बैलाच्या कोळप्याच्या साह्याने सरी पुनर्निर्माण करण्यात यावी. ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा - सरी लागवड अवजाराच्या फणावर आंतरमशागतीचे घटक बसवून आंतरमशागत केल्यास आंतरमशागती बरोबरच, सरी पुनर्निर्माण करण्याचे कार्यही होते. परंतु, ट्रॅक्टरच्या साह्याने आंतरमशागत ही पेरणीनंतर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत करावी. 

६) रुंद वरंबा - सरी लागवड अवजारामध्ये या पद्धतीच्या गरजेनुसार फणांची व सरीच्या फाळांचीसंख्या वाढविणे उपयुक्त होणार नाही. काही अपरिहार्य परिस्थितीत किंवा आंतरपीक पद्धतीच्या गरजेनुसार फळांची संख्या वाढविणे आवश्यक असल्यास प्रचलित रुंद वरंबा - सरी लागवड अवजाराच्या एका बाजूचा सरीचा फाळ काढून, दोन फेरीमध्ये आठ ओळींची पेरणी करणे साध्य होईल. याकरिता अवजाराच्या सरीचाएक फाळ व चार फणांच्या रचनेसह, अवजारांच्या घटकांना लागणाऱ्या शक्तीनुसार ट्रॅक्टरचा जोडणी - मध्य साधून उपयोग करावा. 

७) कमी ओलाव्याच्या स्थितीत रुंद वरंबा - सरी लागवड अवजाराच्या साह्याने पेरणी करताना, अवजारामध्ये पेरणीमागे मातीने बियाणे झाकण्याच्या दृष्टीने लोखंडीपास, लोखंडी साखळी अथवा लोखंडी दांड्याचा उपयोग करावा. 

८) शेतीच्या विविध कामांकरिता ४५ ते ५० अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरचा वापर प्रचलित आहे. अशा ट्रॅक्टरांना विविध शेती कामानुसार इंधनाची कमी / अधिक मात्रालागते. रुंद वरंबा - सरी लागवड अवजाराच्या वापराकरिता अशा ट्रॅक्टराचा वापर अकार्यक्षम होणार नाही. 

९) रुंद वरंबा - सरी लागवड अवजाराच्या वापर करताना अवजाराच्या बियाणे वितरित करण्याच्या व्यवस्थेच्या प्लॅस्टिकच्या चकत्या, गिअर्स तुटण्याने, अवजार निकामी होऊन, पेरणीस अडथळा निर्माण होतो. स्थानिक बाजारातून अशा प्रकारच्या घटकांचा एखादा संच संग्रही असवा. यामध्ये, विविध पिकांच्या गरजेनुसार लागणाऱ्या बियाणे चकत्या असाव्यात.


१०) लागवड करताना जमिनीची मशागत, रुंद वरंब्याचे अंतर आणि अवजाराची योग्य मांडणी लक्षात घेतल्याने योग्य पद्धतीने पेरणी होऊन अपेक्षित उत्पादन मिळेल.




सौजन्‍य
कृषि अभियंता प्रा. भुईभार- ७५८८५७१५४५
कृषि अभियंता प्रा. टेकाळे -७५८८०८२८६७