Pages

Monday, August 8, 2016

सद्यपरिस्थितीत घ्यावयाची खरीप पिकांची काळजी

मराठवाडयात सध्या सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत असुन सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. अशा वातावरणाचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसुन येतो, अशा परिस्थितीत शेतक-यांनी पुढील प्रमाणे खरीप पिकांची काळजी घेण्‍याचे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, विस्तार कृषिविद्यावेत्ता  डॉ.यू.एन. आळसे व सहाय्यक किटकशास्त्रज्ञ प्रा.डी.डी. पटाईत यांनी केले आहे.
1.   मुग व उडीद या पिकांवर भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 300 अंश गंधकाची भुकटी प्रती हेक्टरी 20 किलो या प्रमाणात धुराळावी किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.
2.   कपाशीमध्ये पावसाचे पाणी शेतात साचुन राहीले असल्यास दोन ओळीत ठरावीक अंतरावर सरी काढून पावसाचे पाणी शेताबाहेर काढून दयावे म्हणजेच निच-याची व्यवस्था करावी.
3.   जास्त पावसामुळे पाणी साठलेल्या ठिकाणी कपाशीच्या झाडाची वाढ खुंटून सुरवातीला पाने पिवळी पडतात व नंतर लाल होऊन मरायला लागतात. अशावेळी 10 लिटर पाण्यात 150 ग्रॅम युरिया व 150 ग्रॅम पोटॅश व त्यासोबत कॉपर ऑक्झीक्लोराईड 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून ड्रेचिंग (आळवणी) करावी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझीम 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून ड्रेचींग (आळवणी) करावी. यासाठी निचरा करुनच ड्रेचींग करावी.
4.   कपाशीमध्ये रसशोषण करणा-या किडींचा प्रादुर्भाव आढळुन आल्‍यास अॅसीफेट 75 टक्के 15 ग्रॅम किंवा थायामिथॉक्झाम 3 ग्रॅम किंवा फलोनीकॅमीड 50 टक्के 2 ग्रॅम किंवा असिटामाप्रीड 20 टक्के 3 ग्रॅम किंवा मिथिलडिमेटॉन २५ टक्‍के 8 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.
5.   सोयबीन पिकाची पाहणी केली असता असे आढळुन आले की, सोयबीनवर रिमझिम पाऊस सततचे ढगाळ वातावरण यामुळे उंटअळी या किडीसोबतच कोंडिका इलेकटा या पाने खाणा-या अळीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन आला आहे. त्यासोबतच ब-याच ठिकाणी चक्रीभुंगा या किडीच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली आहे. ही किड सोयबीनच्या खोडाला, फांदीला किंवा पानाच्‍या देठाला दोन खापा करुन त्यामध्ये अंडी घालते. त्यामुळे खापेच्या वरचा भाग सुकुन वाळलेला दिसतो. अंडयातुन अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ व खोड आतुन पोखरते व खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे अशा झाडाला शेंगा कमी लागतात व लागलेल्या शेंगा भरत नाहीत. तसेच पिक काढणीच्यावेळी खापा केलेल्या जागुन खोड तुटुन पडते व त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान होऊ शकते. अशावेळी चक्रीभुंग्याचा व पाने खाणा-या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोफेनोफॉस 50 टक्के 20 मिली किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के 13 मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 टक्के 3 मिली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पावर पंपाकरिता किटकनाशकाचे प्रमाणे 3 पट करावे.
6.   फुले लागल्यानंतर सोयबीनमध्ये तणनाशकाचा वापर करु नये. तसेच कळया व फुले लागल्‍यानंतर सोयबीनमध्‍ये अतिरिक्‍त युरियाचा वापर टाळावा. 
सोयाबीन वरील चक्रीभुंगा