Pages

Monday, September 12, 2016

सुप्रसिध्‍द कवि प्रा. इन्‍द्रजित भालेराव यांच्‍या कवितांनी कृषीच्‍या विद्यार्थ्‍यात चढले स्‍फुरण

परभणी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यी आयोजीत गणेशोत्‍सवाच्‍या व्‍याख्‍यनमालेचे प्रा. इन्‍द्रजित भालेराव यांनी गुंफले दुसरे पुष्‍प
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या वतीने गणेशोत्‍सवानिमित्‍त विविध विषयावर व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक ८ सप्‍टेबर रोजी या व्‍याख्‍यानमालेचे दुसरे पुष्‍प सुप्रसिध्‍द कवी प्रा. इन्‍द्रजित भालेराव यांनी गुंफले. ाविद्यालयाच्‍या या परभणी येथी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले होते तर प्राचार्य डॉ. विलास पाटील, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. आर. डी. आहीरे, डॉ. पी. आर. झंवर, गणेशोत्‍सव समिती अध्‍यक्ष प्रविण पोपळघट, उपाध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर कदम यांची व्‍यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमात कवी प्रा. इन्‍द्रजित भालेराव यांनी कवितेच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांचे अर्थशास्‍त्र, समाजशास्‍त्र, मानसशास्‍त्र आदिंची मांडणी केली. कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यापीठ गीतांनी केली,  
शेती संस्‍कृतीचे कुळ
शेती संस्‍कृतीचे कुळ शेती जीवनाचे मूळ
आम्‍ही लावितो कपाळी रान मळयातली धुळ
इथे शिकवितो आम्‍ही कसे वाढावे झाडाने
इथे ठरवितो आम्ही कसे पिकावे पाडाने
आम्‍ही संशोधनातून देश नेतो पुढे पुढे
शेतकरी बांधवांना आम्‍ही शिकवितो धडे
कसे होतील हिरवे आज सुकलेले माळ

लढायला शिक
शिक बाबा शिक लढायला शिक
कुणब्‍याच्‍या पोरा आता लढायला शिक
जातील हे दीस आणि होईलही ठीक
उद्या तुझ्या शेतामधी उधाणेल पीक
गाळलेल्‍या घामासाठी रस्‍त्‍यावर टीक
कुणब्याच्‍या पोरा आता लढायला शिक’  

या कवितेच्‍या माध्‍यमातुन कवीने शेतक-यांना लढणाचा संदेश दिला

दोस्‍ता
ही कविता सादर करून गावाकडील परिस्थितीचे भान करून दिले

काटयाकुटयाचा तुडवित रस्‍ता
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्‍ता
जेव्‍हा दुष्‍काळ, दुष्‍काळ घिरटया घाली
तव्‍हा गावाला, गावाला कुणी ना वाली
कसे सुगीत घालतात गस्‍ता माझ्या गावाकडं.....
या भूमीचा, भूमीचा मूळ अधिकारी
बाप झालाय, झालाय आज भिकारी
गाव असून झालाय फिरस्‍ता, माझ्या गावाकडं...

आधी घडवा चरित्र आपले
घडवा आपला गाव
मग घ्‍या छत्रपतीचे नाव

या कवितेतुन विद्य‍ार्थ्‍यांना आपले चरित्र घडविण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.


अध्‍यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. डि एन गोखले म्‍हणाले की, प्रा इन्‍द्रजित भालेराव कवितेच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांचे असलेले विदारक चित्र सर्वस्‍तरापर्यंत पोहचविण्‍याचे मोठे कार्य करीत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केदार यांनी केले तर प्रमुख व्‍यक्‍त्‍यांचा परिचय ज्ञानेश्‍वर शिंदे यांनी दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप खरबळ यांनी केले तर आभार स्‍वप्‍निल भोसले यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्या‍र्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.