Pages

Friday, October 14, 2016

वनामकृवित आयोजित अवर्षण व्‍यवस्‍थापनावरील आदर्श प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने व भारत सरकारच्‍या कृषी मंत्रालयाच्‍या कृषी व सहकार विभागाच्‍या सौजन्‍याने दिनांक १३ ते २० ऑक्‍टोबर दरम्‍यान शेतीतील अवर्षण व्‍यवस्‍थापनावर आठ दिवशीय आदर्श प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक १३ ऑक्‍टोबर रोजी संपन्‍न झाले. उद्घाटनास मुंबई येथील भारतीय हवामान विभागाचे उपमहासंचालक श्री. कृष्‍णानंद होसालीकर व बेंगलुर येथील कृषी विज्ञान विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ. एम. ए. शंकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर हे होते.
भारतीय हवामान विभागाचे उपमहासंचालक श्री. कृष्‍णानंद होसालीकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, यावर्षी मान्‍सुन चांगला असला तरी भविष्‍यात येणारे धोके लक्षात घेऊन वेळीच योग्‍यरीत्‍या जल व्‍यवस्‍थापन केल्‍यास दिर्घकालीन उपयोग होईल. हवामानशास्‍त्राचा उपयोग शास्‍त्रीय दृष्‍टीने केल्‍यास संभाव्‍य नुकसान टाळता येईल.
माजी संशोधन संचालक डॉ. एम. ए. शंकर मार्गदर्शनात म्‍हणाले की, ८० टक्के तेलबिया, दाळवर्गीय पिके कोरडवाहु क्षेत्रातुन उत्‍पादित केली जातात. अन्‍न व पोषण सुरक्षेचे उदिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी कोरडवाहु क्षेत्र महत्‍वाचे असुन हवामान बदलानुरूप तंत्रज्ञानाचा वापर करून कोरडवाहु शेती शाश्‍वत करणे ही काळाची गरज आहे. कृषिसह आर्थिक व सामाजीक अवर्षणावर मात करण्‍यासाठी एकात्मिक पध्‍दतीने व्‍यवस्‍थापन तंत्र अवलंबावे लागेल.
अध्‍यक्षीय समारोप करतांना संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, ज्‍वारी, बाजरी, तुर या सारखी हवामान बदलातही शाश्‍वत उत्‍पादन देणा-या पीकांचा पीक पध्‍दतीमध्‍ये समावेश करणे गरजेचे आहे. विद्यापीठाने विकसित केलेले कोरडवाहु शेती तंत्रज्ञान जसे विहीर पुनभर्रण, आंतरपीक पध्‍दती, कमी कालावधीत येणारे व पाण्‍याचा ताण सहन करणारे वाण आदींचा ज्ञान कृषी अधिका-यांनी प्रशिक्षणात अवगत करून शेतक-यापर्यंत प्रभावीपणे पोहचवावे. हवामान बदलात कमी व अधिक पर्जन्‍यमानावर मात करण्‍यासाठीचे तंत्रज्ञानावर विद्यापीठास अधिक संशोधन करावे लागेल. परतीच्‍या चांगल्‍या पावसामुळे रबी हंगाम निश्चितच यशस्‍वी होईल, अशी आशाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मुख्‍य शास्‍त्रज्ञ तथा प्रशिक्षण समन्‍वयक डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले. सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे यांनी केले तर आभार प्रा एम एस पेंडके यांनी मानले. तांत्रिक सत्रात उपमहासंचालक श्री कृष्‍णानंद होसाळीकर, माजी संशोधन संचालक डॉ एम ए शंकर, भारतीय हवामान विभागच्‍या श्रीमती शुभांगी भुते यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ आनंद गोरे, डॉ ए एस जाधव, डॉ डि एस चौहान, डॉ जी के गायकवाड, आर बी परीहार, सारीका नारळे, माणिक समींद्रे, अभिजीत कदम, आर बी तुरे, एम डी सय्यद आदींनी परिश्रम घेतेल.  
 गत दोन वर्षापासुन पडत असलेल्‍या अवर्षणामुळे देशातील अनेक राज्‍यातील शेती प्रभावीत झाली असुन दुष्‍काळाशी सामना करण्‍यासाठी कृषि विस्‍तारक व अधिका-यांमध्‍ये अवर्षण व्‍यवस्‍थापनाचे ज्ञान अवगत करण्‍याच्‍या उद्देशाने सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले आहे. प्रशिक्षणात देशातील कृषी क्षेत्रातील तज्ञ हवामान बदल, मान्‍सुनचे स्‍वरूप, पडणारा दुष्‍काळ, होणारे नुकसान, त्‍याचे मुल्‍यमापन व परिणाम, पाऊसाच्‍या पाण्‍याचे व्‍यवस्‍थापन, जलसंवर्धन व पाण्‍याचे पुर्नवापर, दुष्‍काळाची दाहृकता कमी करणारे तंत्रज्ञान, एकात्मिक शेती पध्‍दती, चारापीके व पशुपालन, कोरडवाहु फळ लागवड, सेंद्रिय शेती, पीकांची संरक्षीत पाण्‍यावरील लागवड, कोरडवाहु शेतीतील यांत्रिकीकरण आदी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणात महाराष्‍ट्र, तामीळनाडु व आंध्रप्रदेश राज्‍यातील कृषी विभागातील वीस कृषी अधिकारी व कृषी विस्‍तारक सहभागी झाले आहेत.
मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ दत्‍त्रप्रसाद वासकर
मार्गदर्शन करतांना भारतीय हवामान विभागाचे उपमहासंचालक श्री कृष्‍णानंद होसाळीकर
मार्गदर्शन करतांना बेंगलुर येथील कृषि विज्ञान विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ एम ए शंकर