Pages

Sunday, October 9, 2016

शेतक-यांनी कृषी तंत्रज्ञानाचा सामुदायीकरित्‍या व एकात्मिक पध्‍दतीने वापर करावा.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषी उपक्रमातंर्गत रबी हंगाम नियोजन व्‍यवस्‍‍थापन व शेतकरी मेळावा संपन्‍न 
शेतक-यांनी हवामान बदल व तंत्रज्ञान यांची योग्‍य सांगड घालुन शेती करावी. रबी हंगामाचे योग्‍य नियोजन करून उपलब्‍ध पाण्‍याचा योग्‍य वापर, बीजप्रक्रिया, एकात्मिक अन्‍नद्रव्‍ये व्‍यवस्‍थापन, कीड-रोग व्‍यवस्‍थापन आदी तंत्रज्ञानाचा अवलंब करून हरभरा, रबी ज्‍वारी, करडई आदी पिकांचे शाश्‍वत उत्‍पादन घ्‍यावे. कमी व अधिक पाऊस अशा दोन्‍ही परिस्थितीवर मात करण्‍यासाठी शेतक-यांनी तंत्रज्ञानाचा सामुदायीकरीत्‍या व एकात्मिक पध्‍दतीने वापर करावा, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषी उपक्रमातंर्गत दिनांक ५ ऑक्‍टोबर रोजी रबी हंगाम नियोजन व्‍यवस्‍‍थापन व शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन कोरडवाहु शेती संशोधन केंद्र येथे करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍‍थानावरून  ते बोलत होते. याप्रसंगी सहयोगी संचालक बियाणे डॉ व्‍ही डी सोळंके, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ बी व्‍ही आसेवार, प्रा. एम एस पेंडके, डॉ आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कृषी शास्‍त्रज्ञांनी रबी हंगामाबाबत शेतक-यांना योग्‍य ते मार्गदर्शन करावे. आज यांत्रिकीकरणाच्‍या दृष्‍टीने आधुनिक कृषी अवजारे व यंत्रे शेतकरी बांधवांना निक्रा या योजनेंतर्गत भाडेतत्‍वावरील अवजारे केंद्राच्‍या (कस्‍टम हायरींग सेंटर) माध्‍यमातुन उपलब्‍ध करून द्यावेत. शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील झालेले नुकसान रबी हंगामात भरून काढण्‍याचा दृष्‍टीने सर्तक रहावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.
कार्यक्रमात प्रात्‍यक्षिक घेणा-या निवडक शेतक-यांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते हरभरा, करडई, रबी ज्‍वारी आदी पिकांच्‍या विद्यापीठ विकसित विविध वाणाच्‍या बियाण्‍याचे वितरण करण्‍यात आले. विद्यापीठातर्फे अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या अंतर्गत हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषी उपक्रम गेली चार वर्ष मौजे बाभुळगांव (ता. जि. परभणी) येथे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत असुन कोरडवाहु शेती तंत्रज्ञानावर आधारित व विशेषत: हवामान बदलानुरूप तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्‍यक्षिकांचे आयोजन थेट शेतक-यांच्‍या शेतावर करण्‍यात येऊन शेतक-यांना वेळोवेळी मार्गदर्शन या उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन केले जात आहे. यावर्षी खरीप हंगामात बाभुळगांव येथील सत्‍तर शेतक-यांच्‍या शेतावर तंत्रज्ञान प्रात्‍यक्षिके राबविण्‍यात आली तर रबी हंगामातही एकुण पंच्‍चेचाळीस शेतक-यांच्‍या शेतावर तंत्रज्ञान प्रात्‍यक्षिके राबविण्‍याचे नियोजित केले आहे.  

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ बी व्‍ही आसेवार यांनी उपक्रमाचे माहिती दिली तर शेतकरी बाबासाहेब पारधे देउन गतवर्षी शेतक-या उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन प्रसार करण्‍यात आलेल्‍या विहीर पुनभर्रण, पोटॅशियम नायट्रेटची फवारणी, आंतरपीक पध्‍दती आदी तंत्रज्ञानाचा शेतक-यांना लाभ झाल्‍याचे मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सारीका नारळे यांनी केले तर आभार प्रा एम एस पेंडके यांनी मानले. तांत्रिक सत्रात रबी पीक व्‍यवस्‍थापनावर डॉ आनंद गोरे यांनी तर  डॉ एम एस पेंडके यांनी मृद व जलसंधारण व डॉ जी के गायकवाड यांनी रबी पिकांतील अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. यावेळी रामकिशन दळवे, विठ्ठलराव पारधे, ज्ञानेश्‍वर पारधे, काशीनाथ पारधे, नरहरी साखरे आदींसह शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी माणिक समिंद्रे, अभिजीत कदम, आर बी तुरे, एम डी सय्यद, एन आर भंडारे, चतुर कटारे आदींनी परिश्रम घेतले.