Pages

Friday, November 25, 2016

वनामकृवित विसाव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ क्रीडा स्‍पर्धेनिमित्‍त पत्रकार परिषद संपन्‍न




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विसावी महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्‍सवाचे आयोजन दिनांक २७ नोव्‍हेंबर ते १ डिसेंबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन त्‍यानिमित्‍त दिनांक २५ नोव्‍हेंबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, विद्यापीठ अभियांता श्री. ए. एल. रूमणे, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. डि. बी. देवसरकर, विभाग प्रमुख डॉ राकेश आहिेरे, मुख्‍य शिक्षण विस्‍तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, संशोधन उपसंचालक डॉ ए एस जाधव, डॉ. काळपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ महेश देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक खिल्‍लारे यांनी केले. सदरिल पत्रकार परिषदेत कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी पत्रकारांना संबोधीत केले. यावेळी स्‍पर्धेसाठी करण्‍यात येत असलेल्‍या मैदानाची सर्व उपस्थितांनी पाहणी केली.

प्रेस नोट

वनामकृवित विसाव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ अश्‍वमेध क्रीडा स्‍पर्धाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विसाव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतरविद्यापीठ क्रीडा स्‍पर्धांचे आयोजन दिनांक २७ नोव्‍हेंबर ते एक डिसेंबर दरम्‍यान करण्‍यात आले आहे. स्‍पर्धेचे उद्घाटन आंतरराष्‍ट्रीय धावपटू तथा अर्जुन पुरस्‍कार प्राप्‍त ललिता बाबर  नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. जी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या प्रमुख उपस्थित होणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु राहणार आहेत. स्‍पर्धेत राज्‍यातील २० विद्यापीठातील दोन हजार पेक्षा जास्‍त मुले  मुली विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होणार आहेत. स्‍पर्धा पाच खेळ प्रकारात होणार आहेत, यात कबड्डी, बास्‍केटबॉल, व्‍हॉलीबॉल, खो-खो व मैदानी स्‍पर्धा या खेळांचा समावेश राहणार आहे. विद्यापीठ क्रीडा संकुलावर मैदानी स्‍पर्धेसाठी ४०० मीटरचा धावप‍थ व विविध खेळांची मैदाने तयार करण्‍यात आले असुन काही मैदानावर फ्लडलाईंटचीही व्‍यवस्था करण्‍यात आली आहे.  या निमित्‍त विद्यापीठात मैदाने अद्ययावत करणे, निवास व भोजन व्‍यवस्‍था, रस्‍ते व इमारती दुरूस्‍ती, रंगरंगाटी आदी कामे अंतिम टप्‍प्‍यात आहेत. राज्‍यातुन व स्‍थानिक पातळीवर दोनशे पंच व तीनशे संघ व्‍यवस्‍थापक सहभागी होणार आहेत. येणा-या खेळाडुंसह व्‍यवस्‍थापक, पंच, अधिकारी व सहभागी यांची निवासाची व भोजनाची विशेष व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.
स्‍पर्धेचा समारोप दिनांक  डिसेंबर रोजी होणार असुन जागतिक दिनानिमित्‍त महाविद्यालयीन युवकांत एड्स रोगाविषयी प्रबोधनाचे कार्य करण्‍यात येणार आहे. या दिवशी एड्स विषयी प्रबोधनपर प्रदर्शनीचे तसेच रॅलीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम नांदेड येथील स्‍वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डॉ. पंडित विद्यासागर यांच्‍या प्रमुख उपस्थित होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध समित्‍यांचे गठण करण्‍यात आले असुन विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी य्यत तयारी करीत आहेत.