Pages

Friday, December 30, 2016

वनामकृविच्‍या महिला शेतकरी मेळाव्‍याचे तोंडापुर (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्रात आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय, हिंगोली येथील कृषि विज्ञान केंद्र व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग, हिंगोली यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्‍त दिनांक ३ जानेवारी रोजी तोंडापुर (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्रात सकाळी ११­.०० वाजता महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याचे उद्घाटन सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन व अल्‍पसंख्‍याक विकास व वक्फ राज्‍यमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री मा. ना. श्री. दिलीप कांबळे यांच्‍या हस्‍ते होणार असुन हिंगोली लोकसभा संसद मा. खा. श्री. राजीव सातव व हिंगोली जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मा. सौ. लक्ष्‍मीबाई यशवंते हे विशेष अतिथी म्‍हणुन उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु राहणार असुन विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. अब्‍दुला खान दुर्राणी, मा. आ. श्री. विक्रम काळे, मा. आ. श्री. सतीश चव्‍हाण, मा. आ. श्री. रामराव वडकुते, विधानसभा सदस्‍य मा. आ. श्री. जयप्रकाश मुंदडा, मा. आ. श्री. तानाजी मुटकूळे, मा. आ. डॉ. संतोष टारफे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. एच. पी. तुम्‍मोड, कोल्‍हापुर येथील स्‍वयंसिध्‍दा संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्‍या मा. कांचनताई परूळेकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरिल मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात शेतकरी महिलाचे काबाटकष्‍ट कमी करणारे तंत्रज्ञान, अन्‍न व फळप्रक्रिया तंत्रज्ञान, बालकांचा विकास आदी विषयांवर विद्यापीठाचे तज्ञ मार्गदर्शन करणार असुन नाबार्डच्‍या वतीने कॅशलेस प्रणालीबाबत मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. याप्रसंगी कृषि प्रदर्शनाचेही आयोजन करण्‍यात आले असुन यात विद्यापीठ तंत्रज्ञानावर आधारित विविध दालनांचा व महिला बचत गटाच्‍या दालनांचा समावेश राहणार आहे. सदरिल मेळाव्‍यास शेतकरी महिलांनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, माजी खासदार अॅड. शिवाजीराव माने, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री विजय लोखंडे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटनम यांनी केले आहे.

Thursday, December 29, 2016

पालम येथे शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्‍न

टिप - सदरिल बातमी प्राचार्या, गृहविज्ञान महाविद्यालय, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त

Wednesday, December 28, 2016

ऊती संवर्धन तंत्रज्ञान आर्थिकदृष्‍टया किफायतीशीर झाले पाहिजे...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलुक्युलर तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पिक सुधार प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

ऊती संवर्धनाच्‍या माध्‍यमातुन विविध पिकांच्‍या गुणवत्‍तेत व उत्‍पादकतेत सुधारणा करण्‍यास मोठा वाव आहे, पंरतु हे तंत्रज्ञान आर्थिकदुष्‍टया किफायतीशीर झाले पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयातील कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभागाच्‍या वतीने व भारत सरकारच्‍या जैवतंत्रज्ञान विभागाच्‍या सौजन्‍याने चौदा दिवसीय दिनांक २७ डिसेंबर ते ९ जानेवारी दरम्‍यान वनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलुक्‍युलर तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पिक सुधार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक २७ डिसेंबर रोजी स‍दरिल प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपूजे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, विभाग प्रमुख तथा प्रशिक्षणाचे आयोजक डॉ. डि. बी. देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, आज ऊस व केळी ऊती संवर्धीत रोपांपासुन शेतकरी चांगले उत्‍पादन घेत आहेत, परंतु हया तंत्रज्ञानापासुन विकसित रोपांची किंमत अधिक असल्‍यामुळे त्‍याच्‍या वापरावर मर्यादा येत आहे. त्‍याकरिता ऊती संवर्धन तंत्रज्ञान कमी खर्चिक करण्‍यासाठी शास्‍त्रज्ञांनी प्रयत्‍न करावा. आज मर्यादीत पिकांतच याचा वापर होत असुन तुर, हरभरा व इतर फळपिकांत याचा वापर शक्‍य आहे. देशाच्‍या वाढणा-या लोकसंख्‍येसाठी अन्‍नसुरक्षेचे उदिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्‍याचे प्रतिपादन विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपूजे यांनी आपल्‍या मार्गदर्शनात केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ. डि बी देवसरकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. मीना वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ गोदावरी पवार यांनी केले. सदरिल प्रशिक्षणात राज्‍यातील विविध विद्यापीठातील, महाविद्यालयातील व संशोधन केंद्रातील प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञ सहभागी झाले आहेत. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक व प्रशिक्षणार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Monday, December 26, 2016

गृहविज्ञान महाविद्यालयात बालकांच्‍या सर्वांगिण विकासावर कार्यशाळा संपन्‍न


टिप - सदरिल बातमी प्राचार्या, गृहविज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त

Friday, December 23, 2016

ज्‍वार लागवड व व्‍यवस्‍थापनावरील वनामकृविचे मोबाईल अॅपचे लोकार्पण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्राच्‍या वतीने ज्‍वार लागवड व व्‍यवस्‍थापन नावाचे अॅन्‍ड्राईड मोबाईल अॅप्‍लीकेशनची निर्मिती करण्‍यात आली असुन दिनांक 23 डिसेंबर रोजी महाराष्‍ट्र राज्‍य कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे चे उपाध्‍यक्ष मा. डॉ. राम खर्चे यांच्‍या हस्‍ते लोकार्पण करण्‍यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्रभारी अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे, संशोधन उपसंचालक डॉ जी के लोंढे, डॉ मदन पेंडके आदी उपस्थित होते. या अॅपमध्‍ये ज्‍वार पिकांची विद्यापीठ शिफारशीत विविध वाणे, लागवड तंत्रज्ञान, अन्‍नद्रव्‍य व किड-रोग व्‍यवस्‍थापन आदी बाबतची सविस्‍तर माहिती उपलब्ध असुन इंटरनेट माध्‍यमातुन अॅन्‍ड्राईड मोबाईलधारक शेतक-यांना गुगल प्‍ले स्‍टोअरवर  jwari सर्च केल्‍यास मोफत डाऊनलोड करता येईल. सदरिल अॅपची निर्मिती कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या संकल्‍पनेतुन व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ हिराकांत काळपांडे, डॉ विक्रम घोळवे, डॉ मोहम्‍मद ईलियास, प्रा सुधाकर सोळंके, प्रा अंबिका मोरे, प्रा आर आर धुतमल, प्रशांत अंबिलवादे, ऋषिकेश औढेकर आदींनी तांत्रिक मदनिस योगेश जाधव यांच्‍या सहकार्यानी विकसित केले. सदरिल अॅप वेळोवेळी अद्यावत करण्‍यात येणार असल्‍याची माहिती ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे यांनी दिली.

राज्‍यातील अल्पभुधारक शेतक-यांसाठी वनामकृवि विकसित पशुचलित सुधारित अवजारे उपयुक्‍त........ मा. डॉ. राम खर्चे

अखिल भारतीय समन्वयित संशोधन पशु शक्तीचा योग्य वापर प्रकल्पास मा. डॉ. राम खर्चे यांची भेट
पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. डॉ. राम खर्चे यांनी रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या अखिल भारतीय समन्वयित संशोधन पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पास दि. २३ डिसेंबर रोजी भेट दिली. यावेळी कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. एस. कडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या योजनेंतर्गत विकसीत विविध सुधारीत औजारे व यंत्राची माहीतीचा समावेश असलेल्‍या सन २०१७ या वर्षीच्‍या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोजन करण्यात आले. योजनेने विकसीत केलेल्या बहुपीक टोकण यंत्र, मका सोलणी यंत्र, हळद व अद्रककाढणी यंत्र, कापुस टोकण यंत्र व एक बैलचलित टोकण यंत्र व आंतरमशागतीचे अवजारांची पाहणी मान्‍यवरांनी केली. राज्‍यातील उत्कृष्ट पशुधन असलेल्या अल्पभुधारक शेतक-यांसाठी वनामकृवि विकसित पशुचलित सुधारित अवजारे उपयुक्‍त असुन सदरील अवजारांचा वापर शेतक-यांनी केलेल्‍यास मशागतीवरील खर्च कमी करता येईल, असे मत मा. डॉ. राम खर्चे यांनी व्‍यक्‍त केले. योजनेअंतर्गत अल्पावधीत विकसित केलेल्‍या सुधारित अवजारांबाबत मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. भेटी दरम्यान संशोधन अभियंता प्रा. एस. एन. सोलंकी यांनी पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाची माहिती देऊन सांगितले की, भारतात याप्रकारची एकुण १४ संशोधन केंद्र असून महाराष्ट्राकरीता वनामकृवि, परभणी हे एकमेव केंद्र आहे. यावेळी मान्‍यवरांना योजनेंतर्गत विकसीत केलेल्या विविध बैलचलित सुधारित अवजारे व यंत्राची तसेच रोटरी मोडच्या सहाय्याने चालणारे कृषि उद्योग, बोअरमधील पाणी उपसण्याचे यंत्र तसेच बैलचलित फवारणी यंत्राचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक संशोधन मा. डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. स्मिता सोलंकी, प्रा. आर. टी. रामटेके, प्रा. डी. डी. टेकाळे, प्रा. पी. ए. मुंडे, वाघमारे अजय, पवार रमेश, डी. बी. यंदे, वडमारे, खटींग, काकडे, आव्हाड आदींनी परिश्रम घेतले. 

Thursday, December 22, 2016

वनामकृविचे डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांना उत्‍कृष्‍ट समिक्षक पुरस्‍कार प्राप्‍त


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांना कर्नाल (हरीयाना) येथील कृषि विषयक संशोधन संप्रेशन केंद्राच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्षानिमित्‍त त्‍यांच्‍या भारतीय प्राणी संशोधन व एशियन दुग्‍ध आणि खाद्य संशोधन या नियतकालिकातील विविध संशोधन लेखांचे समिक्षण केले, या कार्याची दखल घेवुन या केंद्राने डॉ बाबासाहेब ठोंबरे यांना उत्‍कृष्‍ट समिक्षक म्‍हणुन सन्‍मानित करण्‍यात आले. देशी गोवंशाच्‍या विविध जातींचा अनुवंशिक अभ्‍यास, मराठवाडयातील देवणी व लाल कंधारी गोवंश व होलदेव संकरित गोवंश, मराठवाडी म्‍हैश, उस्‍मानाबादी शेळी या पशुधनाच्‍या पैदास, आहार, व्‍यवस्‍थापन, संशोधन व विकासासाठी डॉ. ठोंबरे यांचे भरीव योगदान आहे. तसेच कृषि पदवी, पशुवैद्यकीय पदवी, उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळ, पशुसंवर्धन लेखन व कृषि पदविका आदी अभ्‍यासक्रमांचे क्रमीक व संदर्भीय पुस्‍तकांचे लिखान केले आहे. विविध विषयावर राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय नियतकालीकामध्‍ये लेख प्रकाशीत झाले आहेत. कृषि पदव्‍युत्‍तर व आचार्य पदविच्‍या स्‍नातकांना मुख्‍य संशोधन मार्गदर्शक तसेच विविध शेतकरी-पशुपालक मेळावे, कृषि प्रदर्शने, शेतकरी व गुंराखी प्रशिक्षणे, आकाशवाणी व दुरदर्शन आदि माध्‍यमातुन शेतक-यांना पशुसंवर्धन व दुग्‍धव्‍यवसायाबाबत जनजागृती व मार्गदर्शनाचे कार्य केले आहे. त्‍यांना यापुर्वी आदर्श शिक्षक पुरस्‍कार, राष्‍ट्रीय सेवा योजनेचा उत्‍कृष्‍ट कार्यक्रम अधिकारी पुरस्‍कार, मलकलपट्टे स्‍मृति प्रतिष्‍ठानचा पुरस्‍कार व संजीवनी कृषि पुरस्‍कारने ठरविण्‍यात आले आहे. त्‍यांनी रक्‍तदान शिबीर आयोजन व रक्‍तदान कार्यक्रमात सामाजिक कार्य ही केले आहे. या पुरस्‍काराबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंक्टेश्‍वरलू, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. अशोक ढवण, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, डॉ. अनंत शिंदे, डॉ. शंकर नरवाडे, प्रा. दत्‍ता बैनवाड, डॉ. राकेश आहिरे, डॉ. धिरज कदम व डॉ. अनिल धमक आदींनी अभिनंदन केले आहे.

Saturday, December 17, 2016

कापसाची फरदड न घेण्याचे वनामकृविचे आवाहन

वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांचा सल्‍ला
शेंदरी बोंडअळी ही कपाशीवरील अतिशय घातक कीड असुन बी. टी. कपाशीमुळे या बोंडअळीचे यशस्वीरीत्या व्यवस्थापन होईल असा विश्वास होता. पण मागील गेल्‍या चार ते पाच वर्षाचा अनुभव लक्षात घेता हा विश्वास खोटा निघाला. आजच्या घडीला शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव बी टी कपाशीवर मोठया प्रमाणात जवळपास ७५-८० टक्के आढळुन येत आहे.
प्रादुर्भावाची प्रमुख कारणे :
Ø  कपाशीच्या फरदडीखाली क्षेत्रात वाढ झाल्यामुळे किडीच्या जीवनक्रमात खंड पडलेला नाही.
Ø  हंगाम संपल्यानंतर कपाशीच्या पऱ्हाटया अवशेष शेतात किंवा शेताजवळ तसेच रचून ठेवणे वेळेवर विल्हेवाट लावणे.
Ø  बीटी जनुकास प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे बीटी कपाशीवर या बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे.
Ø आश्रय पिकाच्या ओळी लावणे.
Ø योग्यवेळी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव कांही भागात लवकरच दिसुन आला होता शेतकऱ्यांचे व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झालेले आहे.
उपाययोजना :
Ø  कपाशीचे फरदड घेऊ नये. वेळेवर कपाशीची वेचणी करून डिसेंबरनंतर शेतामध्ये कपाशीचे पीक घेऊ नये.
Ø  हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळया, मेंढया, चरण्यासाठी सोडाव्यात.
Ø शेतातील प्रादुर्भावग्रस्त पिकांचे अवशेष वेचून जाळून टाकावेत.
Ø  हंगामात संपल्यावर ताबडतोब पऱ्हाटीचा वापर करावा किंवा बंदोबस्त करावा. शेतात किंवा शेताजवळ पऱ्हाटी रचून ठेवू नये.
Ø येत्या खरीप हंगामात कमी कालावधीचे वाण निवडावेत.
Ø शेतामध्ये कामगंध सापळे लावून नियमित निरीक्षण करावे.
सध्या बीटी कपाशीवरील शेंदरी बोंडबळीचा प्रादुर्भाव ही धोक्याची घंटा आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या चांगल्या पाऊसामुळे जमिनीमध्ये मोठया प्रमाणावर ओल आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी मोठया प्रमाणावर कपाशीचे फरदड (पुर्नबहार) चांगल्या दराच्या अपेक्षेने घेत आहेत. याचा परिणाम येत्या खरीप हंगामात या शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव लवकर मोठया प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तसेच यापुढे फरदड ठेवलेल्या कपाशीची येणारी बोंडे मोठया प्रमाणावर किडीकीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच जागरूक होऊन शेतकऱ्यांनी फरदड घेण्याचे टाळावे असे वाहन वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर प्रा. बी. व्ही. भेदे यांनी केले आहे.