Pages

Friday, December 23, 2016

राज्‍यातील अल्पभुधारक शेतक-यांसाठी वनामकृवि विकसित पशुचलित सुधारित अवजारे उपयुक्‍त........ मा. डॉ. राम खर्चे

अखिल भारतीय समन्वयित संशोधन पशु शक्तीचा योग्य वापर प्रकल्पास मा. डॉ. राम खर्चे यांची भेट
पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. डॉ. राम खर्चे यांनी रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या अखिल भारतीय समन्वयित संशोधन पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पास दि. २३ डिसेंबर रोजी भेट दिली. यावेळी कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. एस. कडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या योजनेंतर्गत विकसीत विविध सुधारीत औजारे व यंत्राची माहीतीचा समावेश असलेल्‍या सन २०१७ या वर्षीच्‍या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोजन करण्यात आले. योजनेने विकसीत केलेल्या बहुपीक टोकण यंत्र, मका सोलणी यंत्र, हळद व अद्रककाढणी यंत्र, कापुस टोकण यंत्र व एक बैलचलित टोकण यंत्र व आंतरमशागतीचे अवजारांची पाहणी मान्‍यवरांनी केली. राज्‍यातील उत्कृष्ट पशुधन असलेल्या अल्पभुधारक शेतक-यांसाठी वनामकृवि विकसित पशुचलित सुधारित अवजारे उपयुक्‍त असुन सदरील अवजारांचा वापर शेतक-यांनी केलेल्‍यास मशागतीवरील खर्च कमी करता येईल, असे मत मा. डॉ. राम खर्चे यांनी व्‍यक्‍त केले. योजनेअंतर्गत अल्पावधीत विकसित केलेल्‍या सुधारित अवजारांबाबत मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. भेटी दरम्यान संशोधन अभियंता प्रा. एस. एन. सोलंकी यांनी पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाची माहिती देऊन सांगितले की, भारतात याप्रकारची एकुण १४ संशोधन केंद्र असून महाराष्ट्राकरीता वनामकृवि, परभणी हे एकमेव केंद्र आहे. यावेळी मान्‍यवरांना योजनेंतर्गत विकसीत केलेल्या विविध बैलचलित सुधारित अवजारे व यंत्राची तसेच रोटरी मोडच्या सहाय्याने चालणारे कृषि उद्योग, बोअरमधील पाणी उपसण्याचे यंत्र तसेच बैलचलित फवारणी यंत्राचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक संशोधन मा. डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. स्मिता सोलंकी, प्रा. आर. टी. रामटेके, प्रा. डी. डी. टेकाळे, प्रा. पी. ए. मुंडे, वाघमारे अजय, पवार रमेश, डी. बी. यंदे, वडमारे, खटींग, काकडे, आव्हाड आदींनी परिश्रम घेतले.