Pages

Sunday, December 4, 2016

दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर पीक पध्दतीत बदल आवश्यक…..कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू

मानवत तालुक्‍यातील मौजे निलवर्ण टाकळी येथे रबी शेतकरी मेळावा संपन्‍न
इतिहास पाहाता मराठवाडयात मागील शंभर वर्षामधील साधारणत: पन्‍नास वर्ष हे कमी पर्जन्‍यमानाची आहेत. दुष्काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर मराठवाडयातील शेतक-यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला पाहिजे, यात कमी पाण्यात येणारी पीके अंतर्भत केली पाहिजे. शेतीस दुग्धव्यवसाय, शेळीपालन, शेतमाल प्रक्रियाउद्योग आदींची जोड दिली पाहिजेत, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, रिलायन्स फांऊडेशन व महाराष्ट्र शासनाचे कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मानवत तालुक्‍यातील मौजे टाकळी (निलवर्ण) येथे राष्ट्रीय कृषि विकास योजना एकात्मिक तंत्रज्ञान प्रसार प्रकल्पांतर्गत दिनांक 3 डिसेंबर रोजी आयोजित रबी शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित नागरिक भास्करराव देशमुख हे होते तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कृषिभूषण श्री. मधुकररावजी घुगे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, कृषि विकास अधिकारी श्री. बी. एस. कच्छवे, आत्माचे प्रकल्प संचालक श्री. एम. एल. चपळे, प्रकल्प उपसंचालक श्री. नादरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्हणाले की, बाजरी, मुग, पिवळी ज्वारी, चारा पिके आदींचा समावेश पीक पध्‍दतीत केला पाहिजे. शेतक-यांना फळबाग लागवडी व बिजोत्पादनाव्दारेही अधिक नफा कमवता येऊ शकतो. गुजरातमधील कच्छ व राजस्थान या दुष्काळी भागातील शेतकरी मोठया उमेदीनी शेती करतात, मराठवाडयातील शेतक-यांनीही खचून न जाता नव्या उमेदीनी शेती करावी, शासन, विद्यापीठ व समाज सदैव आपल्या सोबत आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले आपल्‍या मार्गदर्शनात म्हणाले की, शेतक-यांनी शेतीवरील अनावश्यक खर्च टाळावा, विनाकारण होणारा फवारणीवरील खर्च कमी करावा, आवश्यकता असेल त्याचवेळेस फवारणी करावी. विद्यापीठातील तंत्राचा वापर करुन शेती करावी जेणे शेतीत  शाश्वत उत्पादन मिळेल. यावेळी कृषिभुषण मधुकरराव घुगे यांनी भुईमुग बिजोत्पादनाविषयी त्यांचे अनुभव सांगितले. कृषि विकास अधिकारी श्री. बी. एस. कच्छवे यांनी शेतीत चांगल्या प्रतीच्‍या निविष्ठांचा वापर करण्‍याविषयी शेतक-यांना मार्गदर्शन करून जिल्हा परिषदेच्या विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्याचे शेतक-यांना आवाहन केले. प्रकल्प संचालक श्री. एम. एल. चपळे यांनी आत्मा प्रकल्‍पाच्‍या विविध योजना, सेंद्रिय शेतीगट याविषयी शेतक-यांना माहिती दिली. गहू लागवड तंत्रज्ञानावर डॉ. व्ही. डी. सोळंके यांनी तर ज्वारी व हरभरा व्यवस्थापनावर डॉ. यु. एन. आळसे व रबी पीक संरक्षणाबाबत प्रा.डी.डी. पटाईत यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी गावातील कृषि वाचनालयाचे मा. कुलगुरु यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वनामकृवि व रिलायन्स फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या व्हाईस एसएमएस सेवेचा विस्तार परभणी सोबत हिंगोली जिल्हयातील सोळा हजार शेतक-यांपर्यंत करण्याच्या सेवेचे उद्घाटन मा. कुलगुरु यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्‍यात राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत विद्यापीठातर्फे देवेगांव (ता. पाथरी) येथे घेण्यात आलेल्या सोयबीन अधिक तुर आंतरपिक प्रात्यक्षिकाव्दारे सोयबीनचे अधिक उत्पादन घेणारे गटप्रमुख पांडुरंग भांबळे व लक्ष्मण मगर यांचा तसेच गावातील प्रगतशिल शेतकरी अंकुश जगताप व बाबासाहेब निलवर्ण यांचा मा. कुलगुरु यांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका कृषि अधिकारी आर. एस. माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. बी. जाधव, विलास सवणे, अंकुश जगताप, हनुमान बनसोडे, राम राऊत, एस. आर. बोराडे, गणेश कटारे, मनोज काळे, उत्तम बेद्रे आदीसह समस्त गावकरी मंडळीनी परिश्रम घेतले.