Pages

Friday, January 13, 2017

तरुणांनी आपल्‍या ज्ञानाचा उपयोग शेतक-यांच्‍या विकासासाठी करावा.... शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालयाच्‍या वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृहात राष्‍ट्रमाता जिजाऊ आणि स्‍वामी विवेकानंद यांची जयंती निमित्‍त दिनांक 12 जानेवारी रोजी व्याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी अधिष्‍ठाता डॉ. अशोक ढवण होते तर विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा. रणजीत चौव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्‍यक्षीय भाषणात डॉ. ढवण म्‍हणाले की, नितीशास्‍त्र आणि युध्‍द शास्‍त्राचा मुळ गुरु म्‍हणजे राष्‍ट्रमाता जिजाऊ होत तर स्‍वामी विवेकानंद म्‍हणजे आजच्‍या युवकांचा आदर्श होत. कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी त्‍यांच्‍या बुध्‍दीचा व शक्‍तीचा उपयोग  देशाच्‍या विकासासाठी करावा. तल्‍लक बुध्‍दी व कुशाग्र तरुणांचे मुर्तीमंत उदाहरण म्‍हणजे स्‍वामी विवेकानंद होत. विवेकानंदानी भारतीय संस्‍कृती व तत्‍वज्ञानाचा गाडा अभ्‍यास केला. त्‍यांनी भारत भ्रमणकरुन संस्‍थानांशी संपर्क साधुन समाजामध्‍ये जनजागृतीचे कार्य केले. आजच्‍या तरुणांनी ज्ञानलालसा अंगीकृत करुन शेतक-यांच्‍या विकासासाठी या ज्ञानाचा वापर करावा. प्रास्‍ताविकात डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्‍हणाले की, आजचा तरुण हा कार्यक्षम, उत्‍साही व अहंम जागृत असणे आवश्‍यक आहे. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी स्‍पर्धामंचचे अध्‍यक्ष जितेंद्र गायकवाडा, सदस्‍य रवि उगले, सुशांत धवारे, विनोद पवार, महावीर मैद, मनोज बोक्‍से, प्रशांत तोटेवाड, नवनाथ राठोड, पंकज वाघ यांनी परिश्रम घेतले.