Pages

Saturday, January 21, 2017

शहर स्‍वच्छता मोहिमेत वनामकृविच्या विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु

वनामकृविच्‍या वतीने परभणी शहर स्‍वच्‍छ सर्वेक्षण मोहिमेसाठी जनजागृती रॅलीचे आयोजन


शहर व परिसर स्‍वच्‍छतेसाठी प्रत्‍येक नागरिकांनी आपली जबाबदारी उजलली पाहिजे. स्‍वच्‍छता मोहिम केवळ कार्यक्रमापुरतीच सीमीत न राहता, स्‍वच्‍छता ही सवयीचा भाग झाला पाहीजे. परभणी शहर स्‍वच्‍छता मोहिमेत वनामकृविच्‍या विद्यार्थ्‍यांचा सहभाग निश्चितच मोलाचा ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी शहर महानगरपालिका यांचे संयुक्‍त विद्यमाने स्‍वच्‍छता मोहिमेचे कृषि महाविद्यालयात आयोजन दिनांक २१ जानेवारी रोजी करण्‍यात आले होते, याप्रसंगी अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन जिल्‍हाधिकारी मा. श्री. राहुल रंजन महिवाल, माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस. कदम, महापौर मा. संगिताताई वडकर, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. प्रल्‍हाद शिवपुजे, हे उपस्थित होते तर शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. पी एन सत्‍वधर, प्राचार्य डॉ अशोक कडाळे, प्राचार्य डॉ अरूण कदम, प्रा. हेमा सरंबेकर, मनपा अतिरिक्‍त आयुक्‍त श्री. अजिज कारचे, केंद्र शासनाचे स्‍वच्‍छता सर्वेक्षण समिती सदस्‍य श्री सिंतेंद्र त्रिवेदी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, विद्यापीठाचे विद्यार्थी गेल्‍या दोन वर्षापासुन सातत्‍याने स्‍वच्‍छता मोहिम राबवुन स्‍वच्‍छतेप्रती जनजागृतीत सहभाग नोंदवीत आहेत, याची दखल राज्‍याचे माननीय राज्‍यपाल महोद्यांनी देखिल वेळोवेळी घेतली आहे. कृषिचे विद्यार्थ्‍यीचे हे कार्य निश्चितच कौतुकास पात्र आहे.
जिल्‍हाधिकारी मा. श्री. राहुल रंजन महिवाल आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, वनामकृविच्‍या विद्यार्थ्‍यांनी शहर स्‍वच्‍छता मोहिमेत गेली दोन वर्षापासुन भरीव योगदान दिले असुन स्‍वच्‍छता मोहिमेत प्रत्‍येक नागरिकाचा सहभाग महत्‍वाचा आहे. सांडपाणी व्‍यवस्‍थापन, कच-यांचे योग्‍य विल्‍हेवाट आदी तांत्रिक गोष्‍टीत सुधारणा करण्‍यास मोठा वाव आहे. परभणी स्‍वच्‍छ सर्वेक्षण मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्‍याच्‍या सहकार्याने शहराच्‍या क्रमांकात निश्चितच सुधारणा होत आहे.  
माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस. कदम व शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी गेल्‍या दोन वर्षापासुन सातत्‍याने स्‍वच्‍छता मोहिमे योगदान देत असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सुषमा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.  
यावेळी स्‍वच्‍छता जनजागृती प्रभात फेरीची सुरवात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा दाखवुन करण्‍यात आली. प्रभात फेरीची सांगता स्‍टेडियमवर स्‍वच्‍छतेवर आधारित पथनाटयाच्‍या सादरीकरणाने झाली. कार्यक्रमास कृषि महाविद्यालय, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजना व राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या स्‍वयंसेवकासह विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.