Pages

Friday, January 27, 2017

जिजाऊ व सावित्रीबाई यांच्‍या विचारांची आजही गरज.....प्रख्‍यात वक्‍त्‍या मा. अॅड. सौ. वैशालीताई डोळस

वनामकृविच्‍या कृषि महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त व्‍याख्‍यानाचे आयोजन

राजमाता जिजाऊनी राजे शिवाजी घडविले, स्‍वराज्‍य स्‍थापन केले. आज जिजाऊचे स्‍वराज्‍याचे स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. समाजात आजही अनेक अंधश्रध्‍दा आहेत, आपण कृत्रिम गोष्‍टींवर भर देत आहोत, समाजात मुलभूत परिवर्तन करण्‍यासाठी वास्‍तववादी झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्‍यात वक्‍त्‍या मा. अॅड. सौ. वैशालीताई डोळस यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि म‍हाविद्यालयाच्‍या वतीने राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त व्‍याख्‍यानाचे आयोजन दिनांक २७ जानेवारी रोजी करण्‍यात आले होते, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य प्रा पी एन सत्‍वधर, प्राचार्य डॉ अशोक कडाळे, डॉ हेमा सरंबेकर, विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी कृष्‍णा होगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. अॅड. सौ. वैशालीताई डोळस पुढे म्‍हणाल्‍या की, देशाला व राज्‍याचा मोठा इतिहास असुन समाज घडविण्‍यात अनेक समाजसुधारकांनी आपले योगदान दिले आहे, इतिहासाची पाने युवकांनी चाळली पाहिजे. सुसंस्‍कत समाज घडविण्‍यासाठी जिजाऊ व सावित्रीबाई यांच्‍या विचारांची आजही गरज आहे. अनेक स्‍त्रीयांनी त्‍यांच्‍या चरित्रपासुन प्रेरणा घेऊन समाजहितांची कर्तव्‍य केले आहे. आज राजकारणात महिला पुढे येत आहेत, परंतु त्‍यांच्‍या वतीने पुरूषच कारभार करित आहेत, आजही सावित्रीबाईना अपेक्षित स्‍त्री-पुरूष समानता प्राप्‍त करू शकलो नाही. उच्‍च शिक्षणात स्‍त्रीचा सहभाग वाढवावा लागेल. आज सावित्रीबाईनाच्‍या चिकित्‍सक शिक्षण पध्‍दतीची समाजास आवश्‍यकता आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. 
अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, जिजाऊ व सावित्रीबाई यांचे विचार काळाच्‍या पुढचे होते. आजही स्‍त्री शिक्षणात आपणास मोठा पल्‍ला गाठावयाचा आहे. 
कार्यक्रमाचेे प्रास्‍तविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. वक्‍त्‍यांचा परिचय डॉ नंदकिमोर भुते यांनी करून दिला तर सुत्रसंचालन संदिप खरबळ यांनी केले व आभार कृष्‍णा होगे यांनी मानले. कार्यक्रमात कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने आंतरराष्‍ट्रीय धावपटू ज्‍योती गवते हिचा सत्कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यानिमित्‍त रक्‍तदान शिबीराचे ही आयोजन करण्‍यात आले होते, यात एकशेसात विद्यार्थी-विद्यार्थींनी रक्‍तदान केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्‍यापक व विद्यार्थ्‍यीनी परिश्रम घेतले.