Pages

Saturday, March 18, 2017

मराठावाडा भागात अवकाळी पाऊस परिस्थितीत विविध पिकांत वनामकृविने सुचविलेल्‍या उपाययोजना

मराठवाडयातील परभणी, लातूर, बीड आणि उस्‍मानाबादच्‍या परिसरात मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस दिनांक १५ मार्च रोजी झाला. तसेच बीड, लातूर, उस्‍मानाबादच्‍या काही भागात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे हरभरा, गहू, ज्‍वारी, कांदा, मोसंबी, द्राक्ष आणि आंबा पिकात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस झाल्‍यानंतर हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढत आहे तसेच बहुतांश ठिकाणी गारपीटीमुळे झाडांना आणि फळांना मार लागल्‍यामुळे त्‍या ठिकाणी बुरशी वाढण्‍याची दाट शक्‍यता आहे. अशा परिस्थितीमध्‍ये शेतावर उभ्‍या असलेल्‍या विविध फळपिके व वेलवर्गीय भाजीपाल्‍यामध्‍ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठाने सुचविलेल्‍या उपाययोजनेचा अवलंब करण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॅा. बी. बी. भोसले व विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता प्रा ए. व्‍ही. गुट्टे यांनी केले आहे.
१) मोसंबी : वादळी वा-यामुळे ज्‍या ठिकाणच्‍या फांदया मोडल्‍या आहेत, अशा फांदया काढून टाकाव्‍यात व त्‍या ठिकाणी त्‍वरीत बोर्डो पेस्‍ट लावून घ्‍यावे. झाडांना व फळांना मार लागल्‍यामुळे ब-याच ठिकाणी जखमा तयार झाल्‍या आहेत. अशा ठिकाणी बूरशी वाढू नये म्‍हणून झाडावर कार्बेन्‍डॅझीम १० ग्रॅम किंवा मेटॅलॅक्‍झील ८ टक्‍के अधिक मॅन्‍कोझेब ६४ टक्‍के (रेडोमिल) २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात घेऊन फवारणी घ्‍यावी.
) डाळींब : अवकाळी पावसानंतर निर्माण झालेल्‍या ढगाळ वातावरणामुळे डाळींब पिकांवर सरकोस्‍पोरा व पानावरील अल्‍टरनेरियाचे ठिपके या बुरशीजन्‍य रोगांची वाढण्‍याची शक्‍यता असते. यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून कोसार्इ्रड – १०१ किंवा थायोफेनेट मिथाईल (रोको) २० ग्रॅम अधिक बॅक्‍टीनाशक ५ ग्रॅम (२ ब्रोमो, २ नायट्रोप्रोपीन १ – ३ डायोल) प्रति १० लिटर पाण्‍यात घेऊन फवारणी करावी. आंबे बहारात ज्‍या डाळींब पिकांवरील मादी फुलाची गळ मोठया प्रमाणावर झालेली आहे, अशा परिस्थितीत शेतक-यांनी तापमानातील वाढ होण्‍याची वाट बघावी. तापमानातील वाढीबरोबर नवीन कळी फुटते तोच उशिराचा आंबेबहार कायम कारावा.
) द्राक्ष : द्राक्षपिकात अवकाळी पावसानंतर वाढणारी बुरशी व फडसड टाळण्यासाठी कार्बेन्‍डॅझीम १० ग्रॅम अधिक डायक्‍लोरव्‍हास २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात घेऊन फवारणी करावी. बागेमध्‍ये थोडाफार मार बसल्‍यामुळे मणी चिरले असतील, अशा परिस्थितीत चिरलेले मणी काढून टाकावेत त्‍यामुळे मणी सडण्‍याची समस्‍या टळेल. बाग स्‍वच्‍छ ठेवावी.
) आंबा : भुरी व तुडतुडयाच्‍या नियंत्रणासाठी डायमिथोएट १५ मिली अधिक कार्बेन्‍डॅझीम १० ग्रॅम लिटर पाण्‍यातून फवारणी  करावी. फळगळ थांबवण्‍यासाठी लिंबाच्‍या आकाराची फळे असताना एन.ए.ए. (फ्लॅनोफिक्‍स) २ मिली प्रति १० लिटर पाण्‍यात घेऊन फवारणी करावी. फळाची प्रत सुधारण्‍यासाठी युरिया १०० ग्रॅम अधिक पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातून फवारणी फवारणी करावी.
) कलिंगड / खरबूज : भूरीच्‍या नियंत्रणासाठी हेक्‍झाकोनॅझॉल (कॉन्‍टॉप) १० मिली किंवा ट्रायडेमार्क (कॅलॅक्‍झीन) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात फवारणी घ्‍यावी. डावणी / केवडा रोगाच्‍या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्‍झील ८ टक्‍के अधिक मॅन्‍कोझेब ६४ टक्‍के (रेडोमिल गोल्‍ड) हे मिश्रण २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातून फवारावे.
) कांदा : करपा व फुलकिडे यांच्‍या नियंत्रणसाठी फिप्रोनिल ५ टक्‍के (रिजेन्‍ट) १५ मिली अधिक क्‍लोरोथॅलोनिल (कवच) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातून फवारणी करावी.
) उन्‍हाळी भुईमूग : बुरशीजन्‍य रोगाच्‍या नियंत्रणासाठी डायथेन – एम – ४५, २५ ग्रॅम प्रति १० पाण्‍यातून फवारणी घ्‍यावी.