वनामकृविच्या परभणी कृषी महाविद्यालयात ‘झेप
यशाची’ कार्यक्रम संपन्न
विद्यार्थ्यांनी जीवनात उच्च ध्येय ठेवले
पाहिजे, करियर मध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येयावर लक्ष केंद्रीत करावे लागेल,
कष्टाची किंमत विद्यार्थ्यांना कळाली पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ पत्रकार
श्री. संजीवजी लाटकर यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी
महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 27 मार्च रोजी ‘झेप यशाची’
या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण हे होते तर कुलसचिव
डॉ विलास पाटील, राज्याचे उपसचिव (कृषि) श्री प्रकाश शेटे, प्राचार्य डॉ डि एन गोखले श्री. विलास वट्टमवार आदींची
प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात श्री. संजीवजी लाटकर पुढे म्हणाले
की, इच्छाशक्तीच्या जोरावर आपण कोणतेही यश संपादन करू शकतो. वेळ वाया घालु नका,
वेळेचे नियोजन करा. स्वत:च्या विचारांचे निरीक्षण करा, स्वत:शी स्पर्धा करा,
स्वत: मध्ये योग्य ते बदल करावा लागेल. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार.
महाविद्यालयातील केवळ पुस्तिकी ज्ञानापेक्षा कौशल्य विकासावर भर द्यावा लागेल.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंग्रजीचे भाषाचे ज्ञान असणे क्रमप्राप्त
झाले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्हणाले
की, विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात अमर्याद संधी आहेत, परंतु उद्योग क्षेत्रास
आवश्यक गुणवैशिष्टे विद्यार्थ्यांना विकसित करावी लागतील.
कुलसचिव डॉ विलास पाटील यांनीही मार्गदर्शन
केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले.
सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ मेधा जगताप यांनी मानले.
प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रा. पी के वाघमारे यांनी करून दिला. कार्यक्रमास
विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.