Pages

Saturday, April 1, 2017

आदीवासी शेतक-यांनी विविध पीकांचे बिजोत्पादन घेऊन उत्पन्न वाढवावे......कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू

वनामकृविच्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात आदिवासी शेतकरी प्रशिक्षण व उपकरणे वाटप कार्यक्रम संपन्‍न

आदिवासी शेतक-यांनी आर्थिक फायदा व उत्पन्नातील स्‍थैर्यासाठी विविध पीकांचे बिजोत्पादन करावे, असा सल्‍ला कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्‍या वतीने  आदिवासी शेतकरी प्रशिक्षण व उपकरणे वाटप कार्यक्रम दि. ३१ मार्च रोजी आयोजीत करण्यात आला होता, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. सदरिल केंद्रामार्फत आदिवासी उपयोजनेच्या माध्यमातून मौजे जावरला (ता. किनवट जि. नांदेड) येथील आदिवासी शेतक-यांना पीक संरक्षण उपकरणांचे वाटप करण्यात आले. यावेळी नांदेडचे जिल्हाधिकारी मा. श्री सुरेश काकाणी, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा. श्री केदार साळुंके, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर आदी प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्हणाले की, सध्या कांदा सारख्या पीकाच्या बिजोत्पादनातुन शेतक-यांना चांगला फायदा मिळत आहे. आदिवासी शेतक-यांनी नैसर्गिक संसाधन आधारीत कृषि व्यवसाय सुरू करावे, यात रेशीमपालन, शेळीपालन, कुक्कुट्पालन आदी कृषिपूरक जोडधंदे करण्यास आदिवासी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा. आदिवासी गावातील परिस्थिती जाणुन घेऊन त्यानुसार पीकरचनेबाबत विद्यापीठ शास्त्रज्ञ गावांत येऊन मार्गदर्शन करतील, असे आश्‍वासनही त्‍यांनी दिले.  
जिल्हाधिकारी मा. श्री सुरेश काकाणी आपल्‍या मार्गदर्शनात म्हणाले की, कृषि विद्यापीठ विकसीत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतक-यांनी स्वत:चा विकास साधावा व आपले गाव कृषि विकासाच्या दृष्टीकोनातून आदर्श गाव बनवावे. शासनाच्या विविध योजना एकात्मिकपणे राबवून गावाचा विकास साधावा, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. गावातील संसाधनांचा वापर करून उत्पादीत मधासारख्या पदार्थांचे विपणन अधिक नियोजनपूर्वक करावे. कृषि विद्यापीठाद्वारे आदिवासी गावात राबविण्‍यात येत असलेल्‍या उपक्रमांबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केला.
कृषि विद्यापीठाच्‍या आदिवासी गावात राबविण्‍यात येत असलेले प्रात्यक्षिके, मार्गदर्शन, विविध्‍ निविष्‍ठा वाटप आदी बाबत विद्यापीठ कार्यकारी समिती सदस्य श्री केदार साळुंके यांनी अभिनंदन केले. माननीय राज्यपाल यांनी दत्तक घेतलेले नांदेड जिल्ह्यातील जावरला गावातील कृषि उत्पादन वाढीसाठी विद्यापीठ राबवित असलेल्‍या कार्यक्रमांची संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी माहिती देऊन गावातील विंधन विहीरींची पाणी पातळी वाढविण्यासाठी विद्यापीठ विकसीत विहीर पून:र्भरण पध्‍दतीचा अवलंब करण्‍याचा सल्‍ला दिला.

कार्यक्रमात कापूस लागवडीबाबत विविध विषयांवर शास्त्रज्ञ डॉ. खिजर बेग, प्रा. अरविंद पांडागळे, डॉ. शिवाजी तेलंग, डॉ. पवन ढोके, प्रा. अरुण गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांनी तर सूत्रसंचालन प्रा. अरविंद पांडागळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका कृषि अधिकारी श्री कायंदे, श्रीमती ऐलवाड, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री पटवे यांनी सहकार्य केले.