Pages

Sunday, April 2, 2017

पाण्याचा कार्यक्षम वापर हाच समृद्धीचा मार्ग ........ कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरुलू

रासेयोच्‍या विशेष शि‍बिरात मौजे जांब येथे जल जागृती व उमेद जागृती कार्यक्रमाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे जांब (ता. जि. परभणी) येथे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. विशेष शि‍बिरात मौजे जांब येथे जलजागृती व उमेद जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, शिबिराचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरुलू यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कडाळे, सरपंच श्री. संजयराव स्वामी, उपसरपंच श्री. अजयराव जामकर, मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिमा वाव्हळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरुलू म्‍हणाले की, राज्यातील ८० टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून असुन जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणायचे असेल तर सूक्ष्मसिंचनाचा अवलंब करणे गरजेचे आहे. मानव पाण्याची उत्पत्ती करू शकत नाही, म्हणून पाण्याचा अपव्यय करण्याचा अधिकार मानवाला नाही. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे गरजेचे आहे. पाणी हेच जीवन असून पाणी वाचविणे म्हणजेच पाणी कमविणे होय, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले यांनी दिवसेंदिवस पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य पाहता सांडपाण्याच्या पुनर्वापरा संदर्भातील संशोधनाला चालना देणे गरजेचे असल्‍याचे सांगितले तर प्राचार्य डॉ. अशोक कडाळे यांनी विविध पिकांत सूक्ष्मसिंचनाचा व आच्छादनाचा वापर केला तर ७० टक्के पाण्याची व ५० टक्के खतांची बचत होऊन उत्पादनात २५ टक्के वाढ संशोधानात दिसून आल्‍याचे सांगितले. 
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरुलू यांच्या हस्ते जलदिंडी व उमेद जागृती फेरीस हिरवी झेंडी दाखवून गावात फेरी काढण्‍यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमधिकारी प्रा. विजयकुमार जाधव यांनी केले. कार्यक्रमात कार्यक्रमाधिकारी संजय पवार यांनी स्वयंसेवकांना जलप्रतिज्ञा दिली. शिबिराच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. रविंद्र शिंदे, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. अनंत बडगुजर आदींसह स्‍वयंसेवकांनी परिश्रम घेतले.