Pages

Monday, April 3, 2017

कृषि महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील रासेयोच्‍या सत्‍तर स्‍वयंसेवकांनी केले रक्‍तदान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे जांब (ता.जि. परभणी) येथे आयोजित करण्यात आले होते. सदरिल शिबिराच्‍या समारोपाप्रसंगी रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. समारोपीय कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण होते तर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कनकदंडे, सरपंच श्री. संजय स्वामी, उपसरपंच श्री. अजय जामकर, मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिमा वाव्हळे, प्रगतशील शेतकरी सुभाषराव लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिरचे उद्घाटन विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवन यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अशोक ढवन म्‍हणाले राष्‍ट्रीय सेवा हि एक निरंतर चालणारी संस्कारप्रक्रिया असल्याचे मत त्‍यांनी व्यक्त केले. रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कनकदंडे यांनी रक्तदानाचे महत्व विषद केले व रक्तदान शिबिरांची संख्या शहरात कमी झाली असल्‍यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा करताना रक्तपेढ्यांना कसरत करावी लागत आहे, अशी खंत व्यक्त केली. थॅलसेमिया ग्रस्त रुग्णांना तर सतत रक्ताचा पुरवठा करावा लागतो. त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींनी रक्तदानात सहभाग नोंद्वावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शिबिरात ७० स्वयंसेवकांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी विजयकुमार जाधव पवार यांनी केले. सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. पपीता गोरखेडे यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेकरिता कार्यक्रमाधिकारी प्रा. संजय पवार, प्रा. विजयकुमार जाधव, प्रा. रवींद्र शिंदे, डॉ. अनंत बडगुजर आदींसह स्‍वयंसेवकांनी परिश्रम घेतले.