Pages

Sunday, May 28, 2017

वनामकृवीतील संकरीत गो पैदास प्रकल्‍पावर चारापिके प्रक्षेत्र विकसीत

फुले जयवंत व धारवाड-६ चारापिकांची ठोंबे उपलब्‍ध
प्रक्षेत्राचे संग्रहित छायाचित्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील संकरीत गो पैदास प्रकल्‍पावर चारापिके प्रक्षेत्र विकसीत केले आहे. फुले जयवंत, फुले गुणवंत व धारवाड-६ या बहुवार्षिक चारापिकाची ठोंबे उपलब्‍ध असुन स्‍टायलो व रूचिरा चारापिकाचे बियाणे नाममात्र शुल्‍कामध्‍ये संकरीत गो पैदास प्रकल्‍प, परभणी येथे उपलब्‍ध असुन शेतकरी बांधव व पशुपालकांनी याचा लाभ घ्‍यावा असे आवाहन संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संकरीत गो पैदास प्रकल्‍पाचे जेष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह चौहान (९४२३१७१७१५) व पशुवैदयकीय अधिकारी डॉ. संदेश देशमुख (९८५०१७७२३१) यांच्‍याशी संपर्क साधावा. फुले जयवंत व धारवाड-६ या बहुवार्षिक चारापिकाची विशेष वैशिष्टये म्‍हणजे या चारापिकाची वाढ २४ ते ४० अंश सेल्सिअस या तापमानास उत्‍तम होते. ही चारापिके दुष्‍काळात कमी पाण्‍यात तग धरून राहतात व सिंचनाची सोय असल्‍यास या गवताची लागवड ३ वर्षापर्यंत टिकते. या वाणात प्रथिनांचे प्रमाण १०.५६ टक्‍के व पिष्‍टमय पदार्थाचे प्रमाण ४१ टक्‍के इतके असुन प्रती वर्षी एकुण ८ ते ९ कापण्‍यामध्‍ये २००० ते २५०० क्विंटल हिरवा चारा प्रती वर्षी प्रती हेक्‍टरी उत्‍पादन मिळते.
वातावरणात होणा-या बदलाचा विचार करता मागील चार वर्षापासून मराठवडयात पावसाचे प्रमाण असमान असुन हिरव्‍या चा-याची उपलब्‍धता फारच कमी होत असल्‍याकारणाने शेतक-यांना जनावरे चारा छावणीमध्‍ये पाठविण्‍याची वेळ येत आहे. मराठवाडयातील शेतक-यांना चारापिकाची ठोंबे व बियाण्‍याची उपलब्‍धता होत नसल्‍या कारणाने संकरीत गो पैदास प्रकल्‍पावर चारापिक प्रक्षेत्र उभारण्‍याचा निर्णय कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या मार्गदर्शानुसार व संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांचे सुचनेनुसार सन २०१५ मध्‍ये घेण्‍यात आला. प्रकल्‍पावरील पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्‍ध व्‍हावा तसेच शेतकरी व पशुपालकांना चारा पिकांची ठोंबे व बियाणे उपलब्‍ध व्‍हावे या दृष्‍टीने विचार करून अधिक उत्‍पादन देणा-या संकरीत नेपीयर गवताच्‍या विविध जातीचे वाण भारतीय कृषी संशोधन संस्‍थेअंतर्गत (आयसीएआर) भारतातील विविध विदयापीठे, संशोधन केंद्रावरून तसेच चारापिक अनुसंसाधान केंद्र, झांसी व धारवाड येथुन आणुन संकरीत गो पैदास प्रकल्‍पाच्‍या प्रक्षेत्रावर लागवड करण्‍यात आली. भारतीय चारापिक संशोधन संस्‍था, धारवाड येथुन धारवाड-६, आयजीएफआर-७, साओबीएन-५ या बहुवार्षिक नेपीयर गवताची ठोंबे आणुन २०१६ मध्‍ये चारा प्रक्षेत्रावर लागवड करण्‍यात आली. या व्‍यतिरीक्‍त भारतातील विविध संस्‍था जसे की, अविका नगर, झांसी, राष्‍ट्रीय कृषी संशोधन संस्‍था (एनएआरआय) फलटण व इतर संस्‍थेकडून बहुवार्षिक ज्‍वारी, अंजन गवत, धामण गवत, बाजरी, न्‍युट्रीफिड, शुगरगेज, ल्‍युर्सन, ओट, स्‍टायलो, मारवेल तसेच पॅराग्रास या पिकाची बियाणे व ठोंबे आणुन लागवड करण्‍यात आली आहे. आतापर्यंत या चारा प्रक्षेत्रावरून ४१८ शेतक-यांना एकुण २,१६,८५० फुले जयवंत व धारवाड नेपीयर गवतांच्‍या ठोंबाची विक्री करण्‍यात आली, तसेच मारवेल, पॅराग्रास, फुले रुचिरा, स्‍टायलो व ओट या चारापिकाची ठोंबे व बियाणे विकण्‍यात आली. यापुढेही मराठवाडयातील शेतक-यांना विविध चारा पिके जसे की ओट, स्‍टायलो, बरसीम, ज्‍वार, मका, दशरथ याची बियाणे तयार करून विकण्‍याचे प्रस्‍तावित आहे. सन २०१५ पासुन या चारापिक प्रक्षेत्रास भारतीय अनुसंधान परिषद तसेच भारतातील नामवंत संस्‍थेच्‍या संशोधकांची भेट दिली आहे.
प्रक्षेत्राचे संग्रहित छायाचित्र