Pages

Friday, June 2, 2017

वैविध्‍दपुर्ण अॅग्रोटेक व्‍हीएनएमकेव्‍ही मोबाईल अॅपचे कृषिमंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर यांच्‍या हस्‍ते लोकार्पण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ निर्मित अॅग्रोटेक व्‍हीएनएमकेव्‍ही (AgroTech VNMKV) मोबाईल अॅपचे लोकार्पण राज्‍याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर यांच्‍या हस्‍ते दिनांक २९ मे रोजी संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समिती बैठकीच्‍या उद्घाटन समारंभात करण्‍यात आले. यावेळी व्‍यासपीठावर महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. डॉ. राम खर्चे, कृषि व फलोत्‍पादन विभागाचे अप्‍पर मुख्‍य सचिव मा. श्री. विजय कुमार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. आर जी दाणी, दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ तपस भट्टाचार्य, राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के पी विश्‍वनाथ, कृषि परिषदेचे महासंचालक मा. डॉ. के. एम. नागरगोजे, कृषि आयुक्‍त मा. श्री. सुनिल केंद्रेकर, आमदार मा. डॉ. राहुल पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, जिल्‍हाधिकारी मा. श्री. पी शिवा शंकर, विद्यापीठ कार्यकारी सदस्‍य मा. श्री. केदार साळुंके, मा. श्री अनंतराव चौदे, मा श्री रविंद्र पतंगे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आदीसह अनेक मान्‍यवर उपस्थित होते.

सदरिल अॅपची निर्मिती कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या संकल्‍पनेने विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ प्रशांत देशमुख, डॉ प्रविण कापसे, डॉ नितीन तांबोळी, डॉ उद्य आळसे, प्रा. डी डी पटाईत, डॉ शंकर पुरी आदींनी केली आहे. विद्यापीठाच्‍या कृषि दैनंदिनीतील संपुर्ण माहिती या अॅपवर उपलब्‍ध असुन दर आठवडयात विद्यापीठाच्‍या वतीने प्रकाशित होणारा हवामान अंदाज व कृषि सल्‍ला, विद्यापीठातील चालु घडामोडी, प्रशिक्षण कार्यक्रम, मेळावे, चर्चासत्र, बातम्‍या आदींची माहिती या अॅपवर वेळोवेळी उपलब्‍ध होणार आहे. या अॅप मध्‍ये विविध पिकांचे लागवड तंत्रज्ञान, पिकांचे वाण, कीड-रोग व्‍यवस्‍थापन, तण व्‍यवस्‍थापन, खत व्‍यवस्‍थापन, कोरडवाहु शेती, सेंद्रीय शेती, उद्यानविद्या, गृहविज्ञान, मृद विज्ञान, किफायतशीर पिक पध्‍दती, शेती पुरक जोडधंदे, कृषि अवजारे व यंत्रे, विद्यापीठ शिफारशी, विद्यापीठ अंतर्गत विविध कार्यालय व संपर्क क्रमाक आदी माहितीचा समावेश आहे. या अॅपव्‍दारे व्‍हीडिओ गॅलरी माध्‍यमातुन विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या मुलाखती व विद्यापीठ बातम्‍या देखिल पाहता येणार आहे. हा अॅप गुगल प्‍ले स्‍टोअर वर उपलब्‍ध असुन एकदा डाऊनलोड करून याचा वापर ऑफलाईन देखिल करण्‍यात येऊ शकतो. या वैविध्‍यपुर्ण असा अॅपच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नास उत्‍तर देण्‍याची सेवा विद्यापीठाव्‍दारे लवकरच सुरू करण्‍यात येणार आहे. अॅप वेळोवेळी शेतक-यांच्‍या सुचनेनुसार अद्यावत करण्‍यात येणार आहे. सदरिल अॅप शेतकरी, कृषिचे विद्यार्थ्‍यी, कृषि विस्‍तारक, कृषि अधिकारी, शास्‍त्रज्ञांना उपयुक्‍त असुन जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी याचा वापर करण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी केले.