Pages

Tuesday, June 6, 2017

कोरडवाहु शेती तंत्रज्ञानावरील मोबाईल अॅप शेतक-यांच्‍या सेवेत

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पामार्फत कोरडवाहु शेती तंत्रज्ञान विकसीत करण्‍यासाठीचे संशोधन कार्य केल्‍या जाते. कोरडवाहु शेती यशस्‍वी करण्‍यासाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसीत करण्‍यात आलेले आहे. यात कोरडवाहु शेतीत आंतरपिक पध्‍दती, पिक पध्‍दती, खतांची मात्रा, व्‍यवस्‍थापन, लागवडीचे अंतर, पीक पेरणीचा कालावधी, आपत्‍कालीन पीक नियोजन, आपत्‍कालीन पीक व्‍यवस्‍थापन, मृद व जलसंधारण, शेततळे, लागवड पध्‍दती, विहिर व कुपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान यांचा प्रामुख्‍याने समावेश होतो.
सदरील तंत्रज्ञान हे शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्‍वाचे असुन त्‍यातील प्रत्‍येक तंत्रज्ञान व घटकांची अंमलबजावणी योग्‍य वेळेवर, योग्‍य पध्‍दतीने होणे गरजेचे आहे. त्‍यादृष्‍टीने या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार विद्यापीठाचे खरीप, रब्‍बी व महिला मेळावे, विविध शेतकरी चर्चासत्रे, प्रशिक्षणे वर्ग तसेच वृत्‍तपत्रे, मासिके व आकाशवाणी, दुरदर्शन यांच्‍या माध्‍यमातुन वेळोवेळी शेतकरी, कृषि विभाग यांचे पर्यंत पोहचविण्‍यात येते.
आज मोबाईलचा वापर शेती क्षेत्रात वाढत आहे. शेतकरी मोबाईलवर शेतीची माहिती घेत आहेत. अशा वेळी त्‍यांना तसेच कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कोरडवाहु शेती तंत्रज्ञानाची तसेच जलसंधारण, विहिर व कुपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञानाची माहिती अतिशय नेमक्‍या पध्‍दतीने तसेच संबंधित छायाचित्रे, चित्रफितीच्‍या माध्‍यमातुन पोहचविण्‍यासाठी कोरडवाहु शेतीचे सुधारीत तंत्रज्ञान तसेच  जलसंवर्धन व जल पुर्नभरण या दोन अॅपची निर्मिती अखील भारतील समन्‍वीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पातर्फे या करण्‍यात आली आहे.
या दोन्‍ही अॅपचे लोकार्पण संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समिती बैठकीच्‍या उद्घाटन प्रसंगी दि. २९ मे २०१७ रोजी कृषि व फलोत्‍पादन मंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर, महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. डॉ. श्री. राम खर्चे, कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु यांचे हस्‍ते तर कृषि परिषदेचे महासंचालक डॉ. नागरगोजे, कुलगुरु मा. डॉ. तपस भट्टाचार्य, कुलगुरु मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथा, कुलगुरु मा. डॉ. आर. जी. दाणी, कृषि आयुक्‍त मा. श्री. सुनिल केंद्रेकर, संशोधन संचालक मा. डॉ. दत्‍तप्रसाद वासकर व चार ही कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या उपस्थितीत पार पडले.

सदरील अॅप मध्‍ये कोरडवाहु शेती तंत्रज्ञान व जलसंधारण व विहिर आणि कुपनलिका पुनर्भरणावर तंत्रज्ञानाची माहिती विविध शिर्षकाअंतर्गत बोटाच्‍या एका स्‍पर्शावर उपलब्‍ध करुन देण्‍यात आली असुन विविध तंत्रज्ञानाची छायाचित्रे, चित्रफिती यामुळे शेतक-यांना संबंधित तंत्रज्ञान समजण्‍यास सोपे आहे. सदरील अॅप शेतकरी बंधु भगिनी आपल्‍या स्‍मार्ट मोबाईल हॅन्डसेट मध्‍ये – गुगल प्‍ले स्‍टोअर – व्हिएनएमकेव्‍ही – कोरडवाहु व व्हिएनएमकेव्‍ही जलसंवर्धन लिंग वरुन डाऊनलोड करु शकतात. सदरील अॅप हे कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु व मा. संचालक संशोधन मा. डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांचे मार्गदर्शनाखाली तयार करण्‍यात आले असुन यासाठी डॉ. बी. व्‍ही. आसेवार, प्रा. मदन पेंडके, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. आनंद गोरे, श्री. माणीक समिंद्रे, श्री. अभिजीत कदम यांनी परिश्रम घेतले आहेत. तरी शेक-यांनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येंने या अॅपचा उपयोग व त्‍यातील तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे अवाहन कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पातर्फे करण्‍यात येत आहे.