आज कृषी विद्यापीठापुढे शिक्षण, संशोधन व
विस्तार शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. कोणत्याही संस्थेच्या
प्रगतीसाठी संस्थेत कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांच्या कार्यावर अवलंबुन असते. विद्यापीठाच्या
प्रगतीसाठी सर्वांना पुर्ण कार्यक्षमतेसह परिणामकारक कार्य करावे लागेल, असे
प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठाचे नुतन संचालकांचा सत्कार
व माजी संचालकांच्या निरोप समारंभ दिनांक 20 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता,
त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नुतन शिक्षण संचालक डॉ विलास
पाटील, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप
इंगोले, माजी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी
भोसले, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आदीची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु पुढे
म्हणाले की, विद्यापीठास प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांना हार्ड वर्क सोबतच स्मार्ट
वर्क करावे लागेल. कार्यक्रमात नुतन संचालकांनी सर्वांच्या सहकार्यांनी कृषी
शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचे विद्यापीठ कार्य उंचावण्याचा मानस व्यक्त
केला तर माजी संचालक डॉ अशोक ढवण व माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले
यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांचे ऋणनिर्देश व्यक्त
केले. कार्यक्रमात नुतन संचालक व माजी संचालक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन डॉ बी एम ठोंबरे यांनी केले तर आभार डॉ पी आर झंवर यांनी मानले.
कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.