Pages

Wednesday, September 6, 2017

कृ‍षी पदवीधरांनी एकत्र येऊन तणावग्रस्‍त शेतक-यांना आधार द्यावा.......श्री. विनायक हेगाणा

वनामकृविच्‍या कृषी महाविद्यालयात गणेश उत्‍सवा निमित्‍त व्‍याख्‍यानाचे आयोजन
छायाचित्र : कृषी महाविद्यालयात गणेश उत्‍सवानिमित्‍त घेण्‍यात आलेल्‍या क्रिकेट स्‍पर्धेतील विजयी संघाने पुरस्‍काराची रक्‍कम शिवार संसद युवा चळवळीसाठी देणगी म्‍हणुन देतांना प्राचार्य डॉ डि एन गोखले, श्री विनायक हेगाणा, विद्यार्थ्‍यी व इतर
आज शेतक-यांना विविध संकटांतुन बाहेर पडण्‍यासाठी मानसिक आधाराची गरज असुन कृषी पदवीधरांनी एकत्र येऊन शेतक-यांना आधार द्यावा, वेळ द्यावा, त्‍यांना नैराश्‍यातुन बाहेर काढण्‍याचा प्रयत्‍न करावा. अनेक कृषी पदवीधर शेतक-यांची मुलेच असुन परिस्थितीवर मात करण्‍यासाठी त्‍यांना मदत करा, असे प्रतिपादन शिवार संसद युवा चळवळीचे संस्‍थापक अध्‍यक्ष श्री विनायक हेगाणा यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी महाविद्यालयात गणेश उत्‍सवानिमित्‍त व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले होते, दिनांक 4 सप्‍टेबर रोजी ‘कृषी पदवीधर व दायित्‍व’ या विषयावर श्री विनायक हेगाणा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर व्‍यासपीठावर मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख, डॉ जे व्‍ही एकाळे, प्रा. पी एस चव्‍हाण, डॉ पी एस कापसे, प्रा आर व्‍ही चव्‍हाण, प्रा. व्‍ही बी जाधव, गणेश उत्‍सव समितीचे अध्‍यक्ष औंदुबर निंभोंरेउपाध्‍यक्ष योगेश शिंदे आदींची उपस्थिती होती.
श्री विनायक हेगाणा पुढे म्‍हणाले की, पीक, पाणी, पैसा, प्रतिष्‍ठा, प्रेम अशा सर्वस्‍वाला शेतकरी पारखा झालेला असुन तो तणावात आहे. शासन व समाज यांच्‍या मदतीने आपण ही परिस्थिती बदलु शकतो.
यावेळी महाविद्यालयात घेण्‍यात आलेल्‍या क्रिकेट स्‍पर्धेतील विजयी संघाने पुरस्‍काराची रक्‍कम शिवार संसद युवा चळवळीसाठी देणगी म्‍हणुन दिली. कार्यक्रमाचे प्रास्‍ता‍विक डॉ पी एस कापसे यांनी केले. सुत्रसंचालन राहुल चौंरे यांनी केले तर आभार वैभव ढोकरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
श्री विनायक हेगाणा हे 22 वर्षीय कृषी पदवीधर असुन शेतकरी आत्‍महत्‍या पुर्णपणे रोखण्‍यासाठी युवकांना एकत्रित आणणे व गावापातळीपर्यंत शिवार संसद या युवा चळवळीच्‍या माध्‍यमातुन मराठवाडयातील तणावग्रस्‍त शेतक-यांसाठी कार्य करित आहेत. शेतक-यांना मदतीसाठी संकेतस्‍थळ व हेल्‍प लाईनचा ते वापर करतात. तसेच तणावग्रस्‍त शेतक-यांना प्रत्‍यक्ष भेट देऊन त्‍यांना मदत करतात. आजपर्यंत अनेक तणावग्रस्‍त शेतकरी बांधवानां त्‍यांनी या चळवळीच्‍या माध्‍यमातुन नैराश्‍यातुन बाहेर काढले आहे.