Pages

Sunday, October 1, 2017

समाजात नात्‍यातील ओलावा कमी होत आहे........कवियत्री लेखिका मा. प्रा. विजया मारोतकर

कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्‍यींनी करिता मुलींनो जरा जपुन हा प्रबोधनात्‍मक काव्‍यमय कार्यक्रम संपन्‍न

सावित्रीबाई फुले यांनी रवलेल्‍या स्‍त्री शिक्षणाच्‍या बिजाचे आज वटवृक्ष झाला असुन प्रत्‍येक क्षेत्रात स्‍त्रीया आज नाव कमावत आहेत, अनेक कठिण वाटणारे यश आज स्‍त्रीने संपादित केले आहे. आज कृषि शिक्षणातही मुलींचे प्रमाण वाढले असुन कृषि क्षेत्रात स्‍त्रीया आपला ठसा उमठवत आहेत. हे सर्व असुनही आजही एकटी महिला समाजात सुरक्षित वावरू शकत नाही, ही शोकांतिका आहे, असे प्रतिपादन कवियत्री व लेखिका प्रा. विजया मारोतकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि‍ विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने मुलींनो पोरी जरा जपुन हा विद्यार्थ्‍यींनी करिता प्रबोधनात्‍मक काव्‍यमय कार्यक्रम दिनांक 29 सप्‍टेबर रोजी आयोजित करण्‍यात आला होता, त्‍याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्या प्रा़. विशाला पटणम, प्राचार्य डॉ एम व्हि वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. प्रा. विजया मारोतकर पुढे म्‍हणाल्‍या की, समाजातील अनेक घटनामुळे नात्‍यातील विश्‍वास उडत आहे, नात्‍यातील ओलावा कमी होत आहे. मुलींना समाजात फक्‍त बाईच्‍या नजरेने पा‍हण्‍याची प्रवृत्‍ती वाढत आहे. मुलींनी चारित्र्य जपावे. मित्र असावे, परंतु एका मर्यादित सीमेपर्यंतच. असभ्य अनैतिक व्यवहार टाळावा. मोबाईलमुळे मुलींवरील अत्यांचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे, महाविद्यालयीन युवतींनी मोबाईल पासुन चार हात दुर राहण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी यावेळी दिला. प्रा. विजया मारोतकर यांनी आपल्‍या कवितांच्‍या माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यींनीचे प्रबोधन केले.

यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन रंगोली पडघन हिने केले तर आभार प्रा. रणजित चव्‍हाण यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थ्‍यींनी व प्राध्‍यापक वृंद मोठया संख्‍येने उपस्थित होते.